23 October 2017

News Flash

Jab Harry Met Sejal Review : रिंग सापडली पण केमिस्ट्री हरवली

स्वत:ला शोधण्यासाठी हॅरी आणि सेजलचा प्रवास

Updated: August 4, 2017 2:48 PM

जब हॅरी मेट सेजल

शाहरुख आणि अनुष्का शर्माचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनोखे फंडे वापरण्यात आले आणि अगदी प्रदर्शित होणाच्या आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शाहरुख आणि अनुष्का करत होते. चित्रपटातील हॅरी आणि सेजलचा प्रवास तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यात नक्कीच यशस्वी होईल.

याआधी शाहरुख आणि अनुष्काच्या जोडीला ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’मध्ये पाहिलं गेलं. मात्र ‘जब हॅरी मेट सेजल’मध्ये दोघांची विशेष केमिस्ट्री दिसत नाही. इम्तियाजच्या चित्रपटांमधील सर्व घटक यामध्येही पाहायला मिळतात. ‘जब वी मेट’ आणि ‘तमाशा’मध्ये दाखवल्याप्रमाणेच नयनरम्य स्थळं, दृष्य यांसोबतच स्वत:चा शोध घेण्याचा प्रवास उलगडला जातो. यावेळी ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणजेच शाहरुखचा थोडा वेगळा अंदाज पाहायला मिळतोय. चित्रपटात शाहरुख पंजाबी गाइड हॅरीची भूमिका तर अनुष्का गुजराती गर्ल सेजलची भूमिका साकारताना दिसते. अनुष्काने गुजराती बोलीसाठी घेतलेली विशेष मेहनत स्क्रिनवर पाहायला मिळते.

हॅरी आणि सेजलची भेट एका युरोप ट्रिपदरम्यान होते जेव्हा अनुष्काची साखरपुड्याची अंगठी हरवते आणि अंगठीशिवाय ती भारतात परतण्यास नकार देते. अशा वेळी कोणताच पर्यात न उरल्याने अंगठी शोधण्यासाठी हॅरी तिची मदत करत असतो. ट्रिपदरम्यान सेजल ज्या ज्या ठिकाणांना भेट देते तेथे हे दोघे पुन्हा एकदा अंगठी शोधण्यासाठी जातात. मात्र या वेळी सेजल त्या ठिकाणांना मुक्तपणे अनुभवते. तिच्या सहवासात हॅरीलाही आपण कुटुंबापासून किती लांब आलोय याची अनुभूती होते. अंगठी शोधण्यासाठी सुरु झालेल्या या प्रवासाचा शेवट स्वत:ला शोधण्याने होते.

हॅरी आणि सेजलचा हा प्रवास पाहताना अनेकदा इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’, ‘तमाशा’ आणि ‘लव आज कल’ चित्रपटांमधील बऱ्याच दृष्यांची आठवण येते. त्यामुळे वेगळेपण जपण्यात चित्रपटाने मार खाल्ला असं म्हटल्यास हरकत नाही. यामध्ये शाहरुखचे वय कमी दाखवण्याचा प्रयत्नही फसला आहे. यामुळेच दोघांच्या केमिस्ट्रीवर परिणाम झालेला पाहायला मिळतो. उल्लेखनीय ठरतात ती चित्रपटातील गाणी आणि सिनेमॅटोग्राफी. ‘राधा’, ‘बटरफ्लाय’ आणि ‘फुर्र’ ही गाणी विशेष लक्ष वेधून घेतात. एकंदरीत चित्रपटात नाविन्य नसलं तरी शाहरुख आणि अनुष्काचा अभिनय प्रेक्षकांना चित्रपटाशी जोडून ठेवतो. त्यामुळे ‘जब हॅरी मेट सेजल’ तुम्हाला अगदीच निराश करणार नाही.

First Published on August 4, 2017 2:45 pm

Web Title: shah rukh khan and anushka sharma jab harry met sejal movie review