सणासुदीचे दिवस असले की त्या दिवसांमध्ये सतत कार्यरत असणाऱ्या काही जणांच्या जेवणाचे वेळापत्रकच बदलते. सणासुदीला सतत कार्यरत असणाऱ्यांमध्ये समावेश होतो तो, या दिवसांत आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचे विक्रेते, सार्वजनिक सुरक्षिततेसाठी दिवसरात्र काम करणारे पोलीस दलातील सर्व कर्मचारी, वाहतूक नियमन शाखेतील कर्मचारी वर्ग, सार्वजनिक शाखेतील कर्मचारी आणि गृहिणीही.

या सर्व लोकांवर या दिवसांमध्ये कामाचा व्याप आणि ताण जास्त असतो. खाण्याच्या वेळा बदलतात कामाचे तास वाढल्याने अनेकदा घरचे जेवण घेणे शक्य होत नाही किंवा कामामुळे ते वेळेवर खाणे शक्य होत नाही. वेळेवर जे उपलब्ध होईल ते खाल्ले जाते. पिण्याच्या पाण्याचे प्रमाण कमी होते आणि या सर्वातून आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. थकवा, डोळ्यांची जळजळ, पित्ताच्या तक्रारी इत्यादी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मधुमेह, रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना तर वाढलेली साखर, वाढलेला रक्तदाब व त्यातून उद्भवणाऱ्या अनेक समस्या येऊन काही जीवघेण्या तक्रारीपण उद्भवू शकतात.

या सर्वानी काही नियम पाळले तर त्यांचे आरोग्य चांगले राहून त्यांचाही सणाचा आनंद द्विगुणित होईल.

* पिण्याच्या पाण्याची बाटली सतत आपल्याबरोबर ठेवावी व दिवसाला ३ लिटर पाणी नक्की प्यावे.

* सरबत, ताक, शहाळे इत्यादी जे उपलब्ध होईल त्या पातळ पदार्थाचा वापरही भरपूर करावा.

* चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्सचा अतिरेक टाळावा.

* मैद्यापासून बनलेल्या पदार्थाचा वापर कमीत कमी करावा तसेच उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळावे.

* पटकन व सहज खाता येतील अशा गोष्टी बरोबर ठेवाव्यात. उदाहरणार्थ चपाती-भाजीचा रोल, नाचणीचा रोल, गव्हाच्या ब्रेडचे सँडविच, मूगडाळीचा डोसा, फुटाणे, फळे, मुरमुरे, राजगिरा लाडू इत्यादी.

* खाण्याच्या वेळांमध्ये जास्त अंतर ठेवू नये.

* सकाळचा नाश्ता करूनच घराबाहेर पडावे. (ज्यांना औषधे सुरू असतील त्यांनी नेहमीची औषधे वेळच्या वेळी घ्यावीत.)

 

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

Dr.sarikasatav@rediffmail.com