हिवाळ्यात जसे आपण वातावरणानुसार आहारात व विहारात बदल करतो. तसेच रुग्णांनी सुद्धा म्हणजे ज्यांची औषधे नियमितपणे चालू आहेत उदाहरणार्थ रक्तदाब, मधुमेह इत्यादींनीही आहारात, वेळेत बदल करणे गरजेचे आहे.

मधुमेहाच्या रुग्णांच्या औषधांचा आणि लक्षणांचा जेवणाच्या वेळेशी आणि प्रमाणाशी खूप जवळचा संबंध आहे म्हणून त्यांनी खाणे-पिणे, व्यायाम यांच्या वेळा अजिबात चुकवू नये. दिवस लहान व रात्र मोठी असल्याने सकाळची न्याहारी लवकर घ्यावी. अन्यथा रक्तातील साखर कमी होण्याची शक्यता जास्त असते. व्यायाम वाढवावा. कारण व्यायाम करण्याची क्षमता वाढलेली असते. कच्चे पदार्थ, सॅलड पचविण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे हे पदार्थ भरपूर खावेत.

रक्तदाबाच्या रुग्णांसाठी तेलाचे व मिठाचे पथ्य महत्त्वाचे. त्यांनी जेवणामध्ये सॅलड व फळांचा वापर भरपूर करावा. मोड आलेली कडधान्ये कच्चे खाण्याचा प्रयत्न करावा. बदाम, अक्रोड इत्यादी सुकामेवा पण वापरू शकतो. जवस, लसूण, भाज्यांमध्ये किंवा चटणीच्या स्वरूपात वापरावे.

किडनीची समस्या असणाऱ्या रुग्णांना पाण्याच्या प्रमाणावर बरेच नियंत्रण ठेवावे लागते. थंड वातावरणात असल्याने पाण्याचे कमी प्रमाण वापरणे रुग्णांना सोयीस्कर जाते, कारण तहान लागण्याची संवेदना या वातावरणामुळे तशी कमी राहते. काविळीच्या रुग्णांनाही आहार लवकर पचवण्यासाठी व मळमळ कमी राहण्यासाठी या वातावरणाची खूप मदत होते.

या वातावरणात घेतले जाणारे भाज्यांचे गरम सूप, डाळीचे पाणी इत्यादी पदार्थ खूप फायदेशीर ठरतात.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ – dr.sarikasatav@rediffmail.com