पितृपंधरवडा म्हणजे खाण्याच्या पदार्थाचे भरपूर वैविध्य. खूप प्रकारच्या भाज्या व खूप प्रकारचे इतर अनेक पदार्थ खाण्यात येतात. त्यातही कोहळा, वेगवेगळ्या शेंगा, भेंडीची भाजी, खीर, वडे, कढी हे पदार्थ असतातच. सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या व फळभाज्यासुद्धा या काळात खाण्यामध्ये येतात. काही भाज्या इतर वेळी फारशा खाण्यात येत नाही किंवा मिळतही नाहीत त्या भाज्यासुद्धा पितृपंधरवडय़ात किंवा या दिवसांमध्ये खाण्यात येतात.

पाऊस थोडा कमी झाल्यानंतर वातावरणातील उष्णता थोडी थोडी वाढत जाते. वातावरणात पुन्हा बदल झाल्याने जंतुसंसर्गाची शक्यता जास्त असते. त्यामुळेच नेहमीपेक्षा भरपूर पालेभाज्या, फळभाज्या खाल्ल्याने आणि त्यात वैविध्य असल्याने भरपूर आणि सर्व प्रकारची जीवनसत्त्वे त्यातून आपल्याला मिळतात. अशा प्रकारच्या जीवनसत्त्वामुळे जंतुसंसर्गापासून बचाव होऊ शकतो.

शिवाय या दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रमाण किंवा पातळ पदार्थाचे प्रमाणही कमी होत असल्याने ते जास्तीत जास्त घेण्याकडे लक्ष द्यावे. म्हणूनच कदाचित या दिवसांमध्ये गोड पदार्थामध्ये महत्त्वाची असते ती पचण्यास हलकी अशी तांदळाची खीर. यात महत्त्वाचा घटक तांदूळ असल्याने इतर पदार्थाच्या मानाने तांदूळ पचनास हलका असल्याने त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे कढीचेही सेवन याच कारणासाठी केले जावे. जीवनसत्त्व ‘क’ नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्याला

भरपूर प्रतिकारशक्ती मिळते व विषाणूजन्य आजारांपासून आपण लांब राहू शकतो. सध्या वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य आजार, डेंग्यूचा ताप, सर्दी, खोकला, श्वसनांचे विकार इत्यादी अनेक आजारांची साथ आहे. त्यासाठी फळभाज्या, पालेभाज्यांबरोबरच आवळा, संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू, लिंबू इत्यादी फळे खाल्ल्याने त्याचा नक्कीच फायदा होईल.

 

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com