श्वसनसंस्थेचे विकार आणि हिवाळा यांचा अगदी जवळचा संबंध आहे. वातावरणातील बदलांमुळे श्वसनसंस्थेचे विकार बळावतात. अ‍ॅलर्जी, सर्दीखोकला, दमा इत्यादी अनेक त्रास या काळामध्ये सुरू होतात किंवा असलेले बळावतात. थंड वातावरण, रूक्षता त्यामुळे हे आजार वाढतात. लहान मुलांना आणि ज्येष्ठांना जास्त प्रमाणात त्रास होतो. कफ जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो बाहेर पडत नाही किंवा चिकट राहतो. त्यासाठी पुढील उपाययोजना कराव्यात, ज्यायोगे हे त्रास होणारच नाहीत किंवा झाले तरी कमीत कमी औषधोपचाराने लवकारात लवकर आटोक्यात येतील.

  • गरम पाण्याचा वापर वाढवावा. डाळीचे पाणी, भाज्यांचे सूप इत्यादी पदार्थ गरम गरम घ्यावेत.
  • तेलकट, मसालेदार पदार्थ कमी वापरावेत.
  • दही, आइस्क्रीम इत्यादी पदार्थ टाळावेत.
  • सुंठ, आले, गवती चहा, तुळशी इत्यादींचा काढा रोज घ्यावा. आले, वेलची, गवती चहा वापरून चहा बनवावा. दूध सुंठ व हळद घालून उकळावे.
  • क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ जास्त वापरावेत. उदाहरणार्थ डाळिंब, संत्री, मोसंबी, आवळा इत्यादी.
  • आवळ्याचा एक तरी पदार्थ रोजच्या आहारात असावा. उदाहरणार्थ आवळा कँडी, च्यवनप्राश, आवळा ज्यूस इत्यादी.
  • ज्येष्ठांनी खूप सकाळी फिरायला जाण्याच्या ऐवजी थोडं ऊन पडल्यानंतर बाहेर पडावे.
  • सुका मेवा, खारीक रोजच्या आहारात ठेवावे
  • जेवण गरम असतानाच खावे. बाजरी वापरावी.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com