. भा. मराठी साहित्य  संमेलनाकडून फारशा अपेक्षा आता सामान्य वाचकालाही नाहीत! या जत्रांमध्ये आयोजक आपापल्या पिपाण्या वाजवतातच, हे काही लहान संमेलनांतही दिसते. यात बदल करण्याचा प्रयत्न गांभीर्याने होत नाही.. अक्षर मानव, झाडीपट्टी, औदुंबर साहित्य संमेलनांकडून कोणी काही शिकत नाही.. 

पेरलेल्या शेतीने हाती पैसाअडका दिला की मग जरा मौजमजा करण्यासाठी, रोजच्या आयुष्यातील तापत्रय काही काळ विसरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पर्याय असतो जत्रा वा तत्सम सामाजिक वा इतर काही हेतूंनी आयोजित केल्या जाणाऱ्या जत्रांचा. अशा जत्रांमध्ये सहभागी होऊन मनाभोवतीचे काच सैल करून घ्यायचे आणि नव्या जोमाने, नव्या दमाने रोजच्या कामाला लागायचे ही त्यांची रीत. सध्या राज्यात दिवस आहेत ते साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे. तशी साहित्याची शेती बारमाही चालू असली तरी दिवाळीत त्यास विशेष जोर येतो तो दिवाळी अंकांमुळे. या अंकांच्या जमिनीवर कथा, कवितादी साहित्याचे भरघोस पीक निघते. या भरघोस पिकानंतर साहित्यविषयक कार्यक्रम जोमाने व्हावेत, हा रंजक योगायोग! दिवाळीनंतर निदान दोन-तीन महिने तरी असे कार्यक्रम, संमेलने, सोहळे चालू असतात. त्यांची यादी काढली तर भलीमोठी होईल. अक्षर मानवची विविध संमेलने, औदुंबर साहित्य संमेलन, अंकुर मराठी साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, ई-साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, विदर्भातील झाडीपट्टी संमेलन, महानगर साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, शिक्षक साहित्य संमेलन, ठिकठिकाणी होणारी विभागीय साहित्य संमेलने, प्रकाशन संस्था आयोजित करीत असलेले साहित्यिक कार्यक्रम, अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन आणि अर्थातच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होत आहे. त्याच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे आणि त्यानिमित्ताने सुरू झाले आहेत नेमेचि होणारे वाद. दरवर्षी निवडणुकीच्या तोंडावर समोर येणारे मुद्दे यंदाही पुढे आले आहेत, येत आहेत. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप कसे असावे, कसे नसावे यावर चर्चा झडू लागल्या आहेत. दुर्दैव हे की यंदाच्या संमेलनाचा समारोप झाला की या चर्चावरही पडदा पडेल आणि समस्त मराठी मुलूख या मुद्दय़ावर पुन्हा तोंड उघडेल तो थेट पुढील वर्षीच्या संमेलनाआधी.

डोंबिवली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील एक उमेदवार प्रवीण दवणे यांनी या संदर्भात केलेली टिप्पणी बघा.. ‘‘साहित्य संमेलनांना जत्रेचे स्वरूप येऊ  लागले आहे. साहित्य संमेलनांत पुस्तकांपेक्षा जत्रेतले पाळणे, पिपाण्या असे वेगळेच काही दिसू लागले आहे. त्यामुळे संमेलनांचा मूळ हेतूच साध्य होत नाही..’’

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा हेतू, त्याच्या आयोजनाचे स्वरूप याबाबत प्रश्न निर्माण करण्याची प्रथा जुनीच आहे. आता अशा संमेलनाच्या निमित्ताने साहित्यातील काही बाजारबुणग्यांची चलती होते, हे बऱ्याच प्रमाणात खरे आहे. आपापले पाळणे फिरवणाऱ्यांना, आपापल्या पिपाण्या वाजवणाऱ्यांना ही नामी संधी असते, हेही खरे. पण ते सुधारण्याची जबाबदारी कुणाची? तर अर्थातच प्रामुख्याने साहित्यिकांची.

पण, अध्यक्षपदाच्या प्रचारात आदर्शवत व्यवस्था हवी असा घोष करायचा आणि समजा नंतर अध्यक्षपद मिळाले तर प्रवाहगत व्हायचे किंवा किनाऱ्यावर बसून राहायचे, असेच चित्र असंख्य साहित्यिकांबाबत आजवर अनेकदा दिसले आहे. यात नेहमी टीका होणारा विषय म्हणजे अध्यक्षीय निवडणूक पद्धतीचा. सध्याच्या पद्धतीमुळे अनेक चांगले, ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले हे अगदी खरे. (म्हणजे निवडून आलेले सगळेच कमअस्सल, असे सरधोपट विधान करण्याची गरज नाही.) या निवडणूक प्रक्रियेत अनंत दोष आहेत, हेही अगदी खरे; पण जोवर त्यास ठोस पर्याय उपलब्ध होत नाही तोवर आहे हीच पद्धती लागू राहणार. अशा वेळी सध्याच्या पद्धतीतील दोष दूर करण्यावर, ती अधिक पारदर्शी करण्यावर भर द्यायला हवा.

तो दिला जात नाही. अशा सुधारणा झाल्यास निवडणूक प्रक्रियेवरील आपले वर्चस्व संपुष्टात येईल, अशी भीती या निवडणुकांचे संचालन करणाऱ्या यंत्रणांना वाटते का, ते कळण्यास मार्ग नाही.

दुसरा टीकेचा विषय संमेलनास आलेले भपकेबाज स्वरूप. या संमेलनांना येणारा खर्च अचाट असतो. स्थानिक सत्ताधारी, राजकारणी, स्थानिक स्वराज्य संस्था, बडय़ा शिक्षणसंस्था, कंपन्या यांच्या मदतीशिवाय त्यासाठीचा पैसा उभा करणे ही निव्वळ अशक्य कोटीतील बाब. मग हे घटक संमेलनावर आपले वर्चस्व गाजवू पाहतात. तारतम्य न बाळगणे हा आपल्याकडील मोठा दोष. तो येथेही दिसतो. मग, ‘आम्ही पैसा दिलाय तर आमच्या पिपाण्या वाजवणारच’, अशी दडपशाही धनको करतात आणि त्यापुढे मान तुकवण्याचे काम इतर. म्हणजे येथे दोष व्यवस्थेपेक्षा माणसांचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे. आज आपल्याकडे अनेक बडय़ा कंपन्यांचे प्रायोजकत्व असलेले साहित्यिक ‘फेस्टिव्हल’ इतर भाषांत साजरे होत असतात. त्यांचा दर्जाही उत्तम असतो. त्यामुळे अशा पैशाकडे बघून, तत्त्वनिष्ठेचा वावदूक आव आणत नाके मुरडणे योग्य नाही. गरज आहे ती स्वत्व टिकवून आणि परस्पर आदर राखून संमेलने करण्याची आणि भपका असला म्हणून कार्यक्रमांचा दर्जा कमीच हवा, असा काही लिखित वा अलिखित नियम नाही. त्यामुळे, कमअस्सल दर्जाच्या बचावासाठी भपक्याची ढाल वापरणे हा गणंगपणा ठरेल.

या अशा अखिल भारतीय पाश्र्वभूमीवर अखिल महाराष्ट्रात जी संमेलने होतात, जे कार्यक्रम होतात, त्यांचे मूल्यमापन कसे करणार? या अशा संमेलनांची, कार्यक्रमांची यादी (जी संपूर्ण व परिपूर्ण खचितच नाही) वर दिलीच आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तुलनेत या संमेलनांचा व्याप, व्याप्ती खूपच छोटी; मात्र आवश्यकता मोठी. अशा संमेलनांच्या आयोजनात काही ठिकाणी भाबडेपणा दिसत असला तरी बनचुकेपणापेक्षा तो परवडला. स्थानिक मंडळींना, स्थानिक प्रेरणांना, स्थानिक अभिव्यक्तींना व्यक्त होण्याची संधी देणाऱ्या व्यासपीठांची आवश्यकता असतेच आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न ही संमेलने करतात. त्यांच्यातील अनौपचारिकपणा, साधेपणा ही वैशिष्टय़े आहेतच. मग ती अक्षर मानव या संस्थेतर्फे विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणारी संमेलने असोत, सांगलीतील औदुंबर येथे दरवर्षी संक्रांतीला होणारे औदुंबर साहित्य संमेलन असो, विदर्भात दरवर्षी होणारे झाडीपट्टी संमेलन असो.. त्यांची ही वैशिष्टय़े सांगता येतील. त्यापैकी औदुंबर साहित्य संमेलनाचे तर यंदाचे ७४वे वर्ष आहे. एक किमान लोकप्रतिसाद असल्याखेरीज इतकी वर्षे अशी परंपरा चालू राहू शकत नाही, हे ध्यानात घ्यायला हवे.

प्रचंड खर्चाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि छोटय़ा पातळ्यांवर आयोजित केली जाणारी इतर संमेलने यांची परस्पर तुलना करताना एक मुद्दा समोर येतो तो सामान्य वाचक त्यांकडे कसे बघतो हा. त्यातील विचार करण्याजोगा कोन असा की, या दोन्हीकडे बघण्याची त्याची दृष्टी वेगवेगळी असते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे निव्वळ भपका आणि पोकळ डोलारा, असा एक रूढ आणि दृढ झालेला दृष्टिकोन. मात्र छोटय़ा संमेलनांकडे तो अधिक गांभीर्याने बघतो. त्यातून काही तरी आपल्या हाती लागेल, असा विश्वास बाळगून असतो. अखिल भारतीय संमेलनाबाबत दृढ झालेला हा दृष्टिकोन शंभर टक्के खरा आहे का, हा मुद्दा नाहीच. वाईट गोष्ट अशी की, या संमेलनाकडून फारशा अपेक्षा न राखणे हाच सामान्य वाचकाचा स्वभाव झाला आहे. त्यामुळे अपेक्षाभंग होण्याचा प्रश्न उद्भवत नाही, हा मुद्दा आहे.

संमेलनवाल्यांना याबाबत काय वाटत असेल याची कल्पना नाही, पण मराठी साहित्य व्यवहाराच्या दृष्टीने हे दुर्दैवी आहे. इतक्या मोठय़ा प्रमाणात साजरा होणारा हा सोहळा म्हणजे निव्वळ जत्रा, पाळणे आणि लेखणीऐवजी पिपाण्या असे वाचकाला वाटणे हे संमेलनाचे अपयश आहे. संमेलनाशी संबंधित घटकांनी ते धुऊन काढायला हवे. अर्थात त्यांना ते अपयश वाटत असेल तर.. अन्यथा आहे ते ठीकच आहे!

rajiv.kale@expressindia.com

((((    ‘सम्यक साहित्य संमेलना’चे हे छायाचित्र ‘एक्स्प्रेस संग्रहा’मधले.    ))