राज्यासमोरील असंख्य समस्या मुक्तीच्या प्रतीक्षेतअसताना, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणातच सारे नेते रंगले.. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका हे यामागचे एक कारण; तर राज्यात नेतृत्वबदलाच्या चर्चेला मिळालेले खतपाणी हे दुसरे.

गेल्या नोव्हेंबरात बारामतीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तेव्हाचे कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. तूरडाळीच्या महागाईवरून त्याच कार्यक्रमात पवार यांनी मुख्यमंत्र्यांना अनुभवाचे बोल ऐकवत थोडय़ा कानपिचक्याही दिल्या होत्या. ‘‘पवार यांचा सल्ला नेहमीच मोलाचा असतो’’ अशी ग्वाही देत मुख्यमंत्री फडणवीस यांनीही त्या वेळी वादाचा प्रसंग टाळला. याला आता जवळपास एक वर्ष होत आले. नंतरच्या गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात असंख्य वादळे आली. सामाजिक असंतोषाचा उद्रेक सुरू झाला, कायदा-सुव्यवस्थेच्या समस्यांनी डोके वर काढले, नेत्यांमधील कौटुंबिक कलहांनी राजकारणही ढवळून निघाले आणि अशा परिस्थितीतून दिलासा मिळावा यासाठी सामान्य जनता सरकारकडे अपेक्षेने पाहू लागली. गेल्या काही आठवडय़ांत तर परिस्थिती अधिकच बेताल होऊ  लागली असताना सरकार व विरोधक मात्र एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करीत राजकारणाला भलत्याच दिशेला नेऊ  पाहात आहेत. राज्यासमोरील असंख्य समस्या मुक्तीच्या प्रतीक्षेत असताना, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणातच सारे नेते रंगले आहेत. निवडणुकांचे दिवस आले, की हे सारे घडतच असते; पण गेल्या काही दिवसांत मात्र, अशा धुळवडीत सारे प्रश्न अधिकच धूसर झाले  की नेत्यांच्या डोळ्यावर व्यक्तिद्वेषाची झापडे आली, या प्रश्नाने उभा महाराष्ट्र बेचैन आहे.

नगर जिल्ह्यतील कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर महाराष्ट्रातील अस्वस्थतेला वाचा फुटली. गेल्या अनेक वर्षांत राज्यात खून, बलात्कार, दरोडे, हाणामाऱ्यांचे असंख्य प्रकार घडले; पण कोपर्डी प्रकरणानंतर मात्र राज्यातील खदखद बाहेर पडली आणि सारे वातावरण प्रचंड संवेदनशील होऊन गेले. अशी परिस्थिती हाताळण्यासाठी राजकारणात सामंजस्याची गरज असते. सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी सामंजस्याने हे प्रश्न हाताळावेत असे संकेत असतात. कारण अशा अस्वस्थतेतून राज्याचे सामाजिक प्रश्न उग्र होण्याची शक्यता असते. महाराष्ट्रातील नेते हे जाणण्याएवढे प्रगल्भ असतानाही, गेल्या काही दिवसांतील आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध मात्र, मूळ समस्यांना बगल देऊन हमरीतुमरीवर आणि प्रसंगी पदाची प्रतिष्ठा खुंटीला टांगून एकेरी उल्लेखांच्या अपमानास्पद टीकेवर उतरल्याने, जिल्हा परिषदा व महापालिकांच्या निवडणुकीचे वेध लागलेला महाराष्ट्र ऐन दसऱ्याच्या मुहूर्तावर शिमगा साजरा करीत असावा, असे चित्र निर्माण झाले आहे. या चिखलफेकीच्या स्पर्धेत सारे पक्ष आपल्याकडील ठेवणीतल्या शब्दांचा साठा घेऊनच उतरलेले दिसतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप हे सारे पक्ष एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात शत्रू आणि मित्र हा भेदच संपुष्टात आला आहे. शिवसेना- भाजपमधील सत्तास्थापनेपासून सुरू झालेली सुंदोपसुंदी तर कधी संपलेलीच नाही. मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पालिकेतील भ्रष्टाचार, खड्डय़ांचे राजकारण आणि कारभारातील अनेक वादग्रस्त बाबी चव्हाटय़ावर येऊन ती अधिकच उग्र होत जाणार, हेही निश्चित आहे. काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेना-भाजप यांच्यातही शेलक्या शब्दांची फेकाफेक सुरू आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शिवसेनेने सोडलेले बाण त्यांच्या जिव्हारी लागले. शिवसेनेला ‘बिळात लपलेले गांडूळ’ अशी उपमा देत त्यांनी आपल्यावरील टीकेची परतफेड केली. विखे पाटील हे ‘ओसाड गावचे पाटील’ असल्याची टीका शिवसेनेने केल्यावर, ‘ठाकरे यांना तर गावच नाही’ असा टोला विखे पाटील यांनी हाणला. ठाकरे म्हणत असले तरी ते ‘शेषनाग’ नव्हेत, तर ‘विषारी कालिया’ नाग आहेत आणि आपल्या नावातच ‘कृष्ण’ असल्याने ‘कालियामर्दन’ करणारच अशा शब्दांत विखे पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिल्याने, आता भाजपबरोबरच काँग्रेसचे वार परतविण्याचे आव्हानही शिवसेनेच्या नेत्यांना आणि मुखपत्राला पेलावे लागणार आहे. ‘शिवसेना हे भाजपच्या सत्तेतील बांडगूळ आहे’, ही विखे पाटील यांची टीका तर शिवसेनेच्या जिव्हारी लागणारी असल्याने, त्याची परतफेडही शिवसेनेकडून होईल. मात्र अशा भांडणांतून राज्याच्या कोणत्या प्रश्नांची तड लागेल, हा प्रश्न मात्र कायमचा अनुत्तरितच राहणार, हे जनतेने ओळखले आहे.

कोपर्डी घटनेनंतर राज्यात ठिकठिकाणी निघालेल्या मराठा मोर्चामुळे फडणवीस यांच्या सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे, ही बाब उघड आहे. अशा समस्या हाताळण्यासाठी नेतृत्वाचे काही राजकीय निकष असावे लागतात. फडणवीस आडनाव असलेल्या नेत्याच्या त्या निकषातील पात्रतेवर त्यांच्या पक्षातीलच कुजबूज आघाडीतून प्रश्नचिन्हे उमटू लागली आणि फडणवीस यांचे मुख्यमंत्रिपद औट घटकेचे ठरणार की काय, अशी चर्चाही सुरू झाली. खुद्द फडणवीस यांच्या काही वक्तव्यांमुळे राज्यातील या संभ्रमात थोडी भरच पडली. नवी मुंबईतील माथाडी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी स्वत:च या वादाला खतपाणी घालणारी विधाने करून टाकली. ‘‘मुख्यमंत्रिपदावर किती दिवस राहीन याची मला पर्वा नाही, पण जितके दिवस राहीन, तेवढा काळ परिवर्तनासाठी झटून काम करेन,’’ हे मुख्यमंत्र्यांचे वाक्य एरवी महाराष्ट्राला प्रचंड आश्वासक वाटले असते; पण नेतृत्वबदलाची कुजबुज सुरू असताना त्यांनी केलेल्या या विधानामुळे राज्याचे नेतृत्व डळमळणार की काय, या शंका फोफावतच गेल्या.. त्यामुळे राजकीय विरोधकांना अधिकच जोर चढला आणि सरकारवर टीकेचे चौफेर हल्ले सुरू झाले.

असे प्रसंग यापूर्वीही आले आहेत. अध्र्यावरच होणारे नेतृत्वबदल ही प्रथा महाराष्ट्राला कधीच नवी नव्हती. कारण नेतृत्वबदल ही केवळ दिल्लीश्वरांच्या मर्जीनुसार चालणारी प्रक्रिया असते, हे उभा महाराष्ट्र ओळखून आहे. भाजपमध्ये या परंपरेला छेद दिला जाणार की तीच परंपरा पुढे चालणार, असा प्रश्न जनतेच्या मनात असतानाच नेतृत्वबदलाच्या चर्चेला पोषक वातावरण सुरू झाल्याने, विरोधकांना जोर येणे हेदेखील साहजिकच होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या मुख्यमंत्र्यांनी, ‘‘विरोधकांच्या कुंडल्या आपल्याकडे आहेत. वेळ येताच त्या बाहेरही काढल्या जातील,’’ अशा शब्दांत थेट आव्हान दिले आणि राज्यातील राजकारण आणखी वेगाने घसरले. विरोधक संतापले आणि मुख्यमंत्री हे विरोधकांचे व्यक्तिगत लक्ष्य झाले. काँग्रेसचे आमदार व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या वक्तव्यावर पहिला प्रहार केला. ‘‘या कुंडल्या उघड करण्यासाठी कोणता शनी आडवा येतो,’’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांना डिवचत त्यांनी कुंडल्या उघड करण्याचेच थेट आव्हान दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांभोवती भ्रष्टाचाराच्या आरोपांचे वादळ घोंघावते आहे. बारामतीत पवार यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आदराचे उद्गार काढले होते खरे; पण त्यामुळे ‘सिंचन घोटाळ्याच्या तपासावर त्याचा काही परिणाम होणार नाही, असे सूचक वक्तव्यही केले होते. आता  कुंडल्यांची भाषा करून मुख्यमंत्र्यांनी थेट विरोधकांनाच अंगावर घेतले आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर खऱ्या अर्थाने धुळवड सुरू झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस यात आघाडीवर असणार, हे साहजिक होते. या पक्षाचे महाराष्ट्रातील पहिल्या फळीचे नेते असलेल्या अजित पवार यांच्याऐवजी, पक्षाने मुख्यमंत्र्यांविरोधात उघडलेल्या आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्या कन्या व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरावर घेतले आणि त्यांनी व्यक्तिगत पातळीवरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. कोपर्डी प्रकरणामुळे अगोदरच तापलेल्या वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर सुळे यांनी ठिकठिकाणी याच मुद्दय़ाला धरून व आरोपपत्राच्या मुद्दय़ावरून मुख्यमंत्र्यांच्या शैलीवरच आघात करण्यास सुरुवात केली. फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वातील दोष जनतेसमोर आक्रमकपणे आणण्याचा पवित्रा घेतला. ‘‘हा मुख्यमंत्री नळावरच्या बायकांसारखा वसावसा ओरडत असतो,’’ असे सांगत मावळ येथील महिला मेळाव्यात त्यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांच्या या वाक्याला जोरदार प्रतिसादही मिळाला. ‘‘हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्याचा पारा नेहमीच चढलेला असतो, पण त्याच्या धमक्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाही,’’ असे आव्हानात्मक उद्गार काढत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीविरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोहिमेचे नेतृत्व शिरावर घेतले.

या विरोधाची धार आणखीनच तीव्र होणार, कदाचित अधिकच खालची पातळी गाठणार, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. ‘गांडूळ, साप, शेषनाग, कालिया, बांडगूळ’ अशा शेलक्या शब्दांतील धुळवड सुरू झालेली असताना, सुप्रिया सुळे यांनीही त्यात आणखी एका शब्दाची भर घातली. भाजपचे नेते सुडाचे राजकारण करीत असले तरी आम्ही घाबरणार नाही. ही ‘दस नंबरी नागीण’ आहे. ज्या दिवशी तो फारच डिवचायला येईल, त्या दिवशी काय करायचे हे ही दस नंबरी नागीण तुम्हाला सांगेल, अशा शब्दांत त्यांनी महिलांना विरोधाचा वेगळाच ‘कानमंत्र’ दिल्याने, राज्यात आता मुख्यमंत्री विरुद्ध अन्य सारे असे राजकीय युद्धकारण सुरू झाल्याचेच चित्र निर्माण झाले आहे.

या व्यक्तिद्वेषी राजकारणातून महाराष्ट्राच्या पदरी नेमके काय पडणार, राज्याच्या समस्या सुटणार किंवा नाही, राज्यापुढील प्रश्नांची तड कशी लागणार आणि मुख्य म्हणजे, या धुळवडीत रंगलेले राजकीय पक्ष आणि नेते राज्याच्या समस्यांबाबत खरोखरीच जागरूक, गंभीर आहेत किंवा नाहीत असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे देण्यासाठी राजकारणी नेत्यांना सध्या तरी वेळ नाही असेच दिसत आहे. कारण महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि त्याआधी धुळवड ही साजरी करावीच लागते. तरीही, या धुळवडीसाठीदेखील दसऱ्याचाच मुहूर्त निवडला जावा, हे मात्र काहीसे विचित्रच आहे.

दिनेश गुणे

dinesh.gune@expressindia.com