विदर्भात यंदा पाऊस नसल्याने गेल्या वर्षीच्या ६८ टक्के पाणीसाठय़ाऐवजी यंदा ३६ टक्केच साठा, तर मराठवाडय़ात जायकवाडी धरण भरल्याचा उत्सवच सुरू! ही स्थिती असताना, उपलब्ध पाण्याच्या नियोजनाकडे लक्ष न दिल्यास पुन्हा पाणीटंचाई भेडसावू शकते, याची कल्पना देणारे वृत्तलेख..

यंदा वैदर्भीय जनतेने पुराचा तडाखा अनुभवला नाही. नदी दुथडी भरून वाहताना बघितली नाही. जेव्हा गरज होती तेव्हा पाऊस पडला नाही. यामुळे पिकांचे जे नुकसान व्हायचे ते झालेच; पण आता उपलब्ध असलेल्या कमी पाणीसाठय़ात अख्खे वर्ष कसे काढायचे, असा गहन प्रश्न सर्वाना पडला आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या पाणीवाटपाच्या नियोजनातून रब्बी हंगामाला पाणी मिळणार नाही हे जवळजवळ स्पष्ट असले तरी पिण्याच्या पाण्याचे काय, हा प्रश्न आतापासूनच आ वासून उभा ठाकला आहे. एकूणच विदर्भावर दुष्काळाची गडद छाया पडायला सुरुवात झाली आहे.

गेल्या वर्षी याच काळात ६८ टक्के पाणीसाठा असलेल्या अमरावती विभागात यंदा केवळ ३६, तर नागपूर विभागात गेल्या वर्षीच्या ६०च्या तुलनेत केवळ ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ८० टक्के पाऊस झाला होता. यंदा केवळ ६० टक्के, तर अमरावती विभागात गेल्या वर्षी सरासरीच्या तुलनेत ९० टक्के पाऊस झाला होता व यंदा केवळ ६७ टक्के. इतक्या कमी पाणीसाठय़ात हिवाळा व उन्हाळा कसा काढायचा, असा प्रश्न प्रशासनासोबतच साऱ्यांना पडला आहे.

अमरावती विभागातील अप्पर वर्धा हे धरण भरलेले आहे, पण वितरणातील गोंधळामुळे त्यातील पाणी अनेक भागांना देता येत नाही अशी अवस्था आहे. पूर्व विदर्भातील गोसीखुर्द धरण भरले असले तरी येथे पाणी वितरणाची व्यवस्थाच अजून तयार झालेली नाही. जी धरणे भरली आहेत, त्यांतील पाणी वापरता येत नाही व ज्यातील पाणी वापरता येऊ शकते अशी इतर धरणे भरलेलीच नाहीत, अशी काहीशी विचित्र अवस्था विदर्भाच्या वाटय़ाला यंदा आली आहे. या महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे तूर आणि कापूस या पिकांना फायदा झाला असला तरी त्यावर किडीचे प्रमाण भरपूर आहे. पश्चिम विदर्भातील सोयाबीन व पूर्व विदर्भातील भाताचे पीक तर हातून गेल्यातच जमा आहे. मुसळधार पाऊसच न झाल्याने ४० टक्के क्षेत्रात भाताची रोवणीच होऊ शकली नाही. खरिपातील पिकांचे असे हाल झालेले असताना रब्बीचा हंगाम पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ विदर्भातील शेतकऱ्यांवर आली आहे.

अशा स्थितीत पिण्यासाठी आवश्यक असलेले पाणी राखून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. अकोला शहराला पाणीपुरवणाऱ्या काटेपूर्णा धरणात यंदा अल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे तेथे आतापासूनच पाणीकपात सुरू झाली आहे. अमरावतीत वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे अनेक भागांत पाणीच पोहोचत नाही. त्यात आता टंचाईची झळ लोकांना सहन करावी लागणार आहे. यवतमाळला गेल्या अनेक वर्षांपासून आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. हे पाणी ज्या निळोणा धरणातून आणले जाते, त्यात यंदा ३० टक्क्यांपेक्षाही कमी पाणी आहे. त्यामुळे आठ दिवसांआड तरी पाणी कुठून आणायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर आतापासूनच उभा ठाकला आहे. चंद्रपूरला पाणी देणाऱ्या इरई धरणात यंदा साठय़ाने तळ गाठला आहे. याच धरणातून वीजनिर्मिती केंद्रालासुद्धा पाणी दिले जाते. यंदा पाण्याअभावी हे केंद्र बंद करण्याची वेळ येणार आहे. सात वर्षांपूर्वी हीच वेळ या केंद्रावर आली होती. सध्या कोळसा व पाणी अपुरे आहे, असे कारण देत या केंद्रातील तीन संच बंद करण्यात आले आहे. दर वेळी भरपूर पाऊस पडणाऱ्या गोंदियालासुद्धा यंदा टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मध्य प्रदेशात चांगला पाऊस झाला की पेंच धरण भरते. यंदा त्याही राज्यात कमी पाऊस पडला. त्यामुळे पेंच धरणात कमी पाणीसाठा आहे. त्याचा फटका उपराजधानीला बसणार आहे. याच धरणातून नागपूरला पाणीपुरवठा होतो. या स्थितीमुळे यंदा पाणीकपात अटळ आहे. राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून जलयुक्त शिवार योजना राबवली. यातून प्रामुख्याने अमरावती विभागात अनेक नवे तलाव निर्माण झाले, पण अपुऱ्या पावसामुळे त्यात पाणीच साठले नाही. पूर्व विदर्भात माजी मालगुजारी तलाव हजारोंच्या संख्येत आहेत. दर वर्षी पावसामुळे या तलावात पाणी असायचे. यातून पशुधन व शेकडो गावांना पाणी मिळायचे. यंदा हे तलाव पावसाअभावी भरलेच नाहीत.

या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने कितीही नियोजन केले तरी यंदा विदर्भाला भीषण टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. आता पुढे पाऊस झाला आणि पाणीसाठय़ात वाढ झाली तरच परिस्थिती सुधारू शकते अन्यथा टंचाई व त्यातून येणाऱ्या दुष्काळाच्या झळा जनतेला सहन कराव्या लागणार आहेत.

devendra.gawande@expressindia.com