जूनमधील हुकलेल्या पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी शेती आणि पाणीसाठय़ांना चांगलीच ओढ दिली. दोन वर्षांच्या दुष्काळी पाश्र्वभूमीवर विदर्भ, मराठवाडय़ात यंदा काहीसा दिलासा असला, तरी याही विभागांत सर्वत्र आलबेल नक्कीच नाही. मध्य महाराष्ट्रालाही कोरडा जून यंदा विशेषत्वाने जाणवला..

सलग दोन वर्षांच्या रखरखीतपणानंतर यंदा महाराष्ट्रासाठी पाऊसपाणी चांगले असल्याचे अंदाज तमाम वेधशाळांनी नोंदवले आणि या पावसाची अक्षरश: डोळ्यांत प्राण आणून वाट पाहणे सुरू झाले. पण या पाहुण्याने यायलाच उशीर केला. नेहमीच्या अंदाजानुसार केरळात १ जूनला मान्सून आला, की पुढे तो महाराष्ट्रात येऊन संपूर्ण राज्य व्यापण्यास साधारण पुढील १४ दिवस लागणार असे गृहीत धरले जाते. पण या वेळी मान्सून मुळात केरळातच उशिरा आला. एरवी गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा प्रवास करत येणाऱ्या मान्सूनने या वेळी आपला रस्ताही बदलला आणि तो विदर्भाकडून आला.

कोकणात मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला आणि त्यानंतरही कोकणात मोठा पाऊस सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भाला या वर्षी पावसाने काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी या ठिकाणी सगळीकडे ती परिस्थिती नाही. मध्य महाराष्ट्राला कोरडा जून यंदा विशेषत्वाने जाणवला. जूनमधील या हुकलेल्या पावसाने राज्यभरात ठिकठिकाणी शेती आणि पाणीसाठय़ांना चांगलीच ओढ दिली.

मराठवाडय़ात काही मोजके तालुके वगळता मराठवाडय़ातील दुष्काळाचे सावट अजूनही कमी झालेले नाही. ७६ तालुक्यांपैकी १९ तालुक्यांत अजूनही १०० मिलिमीटरही पाऊस झालेला नसल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर हे वास्तव अजूनही बदललेले नाही. आजही मराठवाडय़ात २०५७ टँकर सुरू आहेत. लातूरमधील औराद शहाजनी, हिंगोलीतील आखाडा बाळापूरमध्ये आणि नांदेड जिल्हय़ातही पावसाने हजेरी लावली. पण सर्वदूर आणि संततधार पाऊस झाला नाही.

लातूर जिल्हय़ात पाऊस झाला असला तरी शहराला ज्या धरणातून पाणीपुरवठा होतो त्याच्या पाणलोटात पाऊस झाला नाही. आभाळ दाटून आले की, आता पाऊस बरसेल असे वाटायचे आणि ढग निघून जायचे हा अनुभव महिनाभरापासून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्हय़ातील परंडा, भूम या काही तालुक्यांत मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद आणि जालना जिल्हय़ात तर पावसाने चांगलाच ताण दिला. औरंगाबाद जिल्हय़ातील फुलंब्री तालुक्यात तर केवळ ४५ मिलिमीटर एवढाच पाऊस झाला असून पेरण्या रखडल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचेही हाल सुरू आहेत. गंगापूर व कन्नड तालुक्यांत पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. औरंगाबाद शहराला पाणी पुरवणाऱ्या जायकवाडीत अजून दीड महिना पुरेल एवढे पाणी असले तरी धरणातील गाळाचा प्रश्न पाहता महापालिकेला पाणीपुरवठय़ासाठी कसरतच करावी लागत आहे.

विदर्भाकडून राज्यात आलेल्या मान्सूनने विदर्भात आतापर्यंतच्या सरासरीच्या ८० टक्के पाऊस दिला. पण तो कुठे कमी तर कुठे अधिक अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे टक्केवारी जरी अधिक दिसत असली तरी ज्या भागात पाऊस झालाच नाही वा कमी झाला अशा ठिकाणी पेरण्यांना फटका बसलाच. अद्यापही पेरण्यांनी अपेक्षित टक्केवारी गाठलेली नाही. गतवर्षीच्या जूनमध्ये विदर्भात ४० टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा ही टक्केवारी निम्मी आहे. पूर्व विदर्भाच्या (नागपूर विभाग) तुलनेत पश्चिम विदर्भात (अमरावती विभाग) पेरणीचे प्रमाण अधिक आहे. जून अखेपर्यंत नागपूर विभागातील मोठय़ा धरणांमध्ये १६ टक्के, तर अमरावती विभागातील धरणांमध्ये ११ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी याच काळात हा पाणीसाठा अनुक्रमे २५ टक्के व ३२ टक्के होता. जुलैच्या सुरुवातीला पाऊस झाल्याने धरणातील पातळीत किंचित वाढ झाली आहे.

हुकलेल्या पावसाची प्रतीक्षा मध्य महाराष्ट्रात चांगलीच जाणवली. नाशिककरांना शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्य़ातील २३ पैकी १८ धरणे कोरडी असून नाशिक शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असणाऱ्या गंगापूर धरणात अवघा १७ टक्के जलसाठा आहे. त्यातच महापालिकेचा आरक्षित जलसाठा १५ ते २० दिवस पुरेल इतकाच असल्याने तोपर्यंत अपेक्षित पाऊस न झाल्यास नाशिकसमोर जलसंकट उभे ठाकणार आहे. जिल्ह्य़ातील धरणांमध्ये केवळ तीन टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच काळात जलसाठय़ाचे प्रमाण १८ टक्के होते. कमी पावसाचा परिणाम जिल्ह्य़ातील पेरणीवरही झाला असून आतापर्यंत केवळ दोन टक्के पेरणीची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्ये नाशिकपेक्षा काहीशी बरी स्थिती आहे. धुळे जिल्ह्य़ात १८ टक्के, जळगावमध्ये ४४ आणि नंदुरबारमध्ये एक टक्का पेरणी झाली आहे. नंदुरबारमध्येही नाशिकप्रमाणेच शनिवार रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्य़ात आतापर्यंत अवघा सात टक्के पाऊस झाला असून १० प्रकल्पांमध्ये जेमतेम जलसाठा शिल्लक आहे. अशीच स्थिती धुळे जिल्ह्य़ात असून जळगावमधील निम्म्याहून अधिक धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा आहे.

सांगलीत मृग नक्षत्र कोरडे गेले, तरी आद्र्रा नक्षत्राच्या मध्यंतरापासून सुरू झालेल्या पावसाने खरिपाची पेरणी ६० टक्के क्षेत्रात पूर्ण झाली. तरीही सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्र नापेर राहण्याची भीती आहे. जतच्या पूर्व भागात आजही टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. जतबरोबर आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळचा पूर्व भागही अद्याप कोरडाच राहिला आहे. मूग, चवळी, मटकी आणि तूर या कडधान्यांच्या लागवडीखालील क्षेत्र विलंबाच्या पावसाने कमी झाले असून याचा फटका डाळवर्गीय उत्पादनांवर होण्याची शक्यता आहे.

सोलापूरमध्ये यंदा पडलेल्या मान्सूनपूर्व रोहिणी नक्षत्राच्या पावसामुळे उत्साह संचारला. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पिकांच्या पेरण्यांची जोमदार तयारी करून ठेवली होती. मृग नक्षत्राने मात्र सर्वाची निराशा केली आणि पाठोपाठ आद्र्रा नक्षत्रामध्येही पावसाने पाठ फिरविल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. पावसावर हवाला ठेवून शेतकऱ्यांनी आतापर्यंत ८१ टक्के क्षेत्रात तूर, मूग, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन वगैरे पिकांच्या पेरण्या करून एक प्रकारे जुगारच खेळला आहे. आतापर्यंत माळशिरस व माढा या दोन तालुक्यांतच पावसाने सरासरी गाठली आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा खूप कमी पाऊसमान आहे. मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, उत्तर सोलापूर या भागांत पावसाने पार निराशा केली आहे.

या वर्षी कोल्हापूरलाही पावसाने ओढ दिली, तरी जूनच्या मध्यापर्यंत ५० टक्के पेरण्या उरकल्या होत्या. आता जूनच्या अखेरीस पावसाचे दमदार आगमन झाले आहे, पण अजून भात, भुईमूग या पिकांसाठी पुरेसा पाऊस नाही. जिल्ह्य़ात २०१६-१७ च्या हंगामासाठी १ लाख ३२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र निश्चित करण्यात आले. गत हंगामात पावसाने ओढ दिल्यामुळे उसाचे तब्बल १२ हजार ६६५ हेक्टर क्षेत्र यंदा घटले आहे.

साताऱ्यात महिना लोटल्यावर आता पाऊस सुरू झाला आहे, परंतु हा पाऊस दुष्काळी पट्टय़ात होताना दिसत नाही. जिल्ह्य़ात सुमारे दोनतृतीयांश क्षेत्रावरील पेरण्या झाल्या आहेत. फलटणमध्ये आदर्की, कोरेगाव तालुक्यांतील वाठार स्टेशन, कराडमधील इंदोली, पाटणमधील चाफळ आणि वाईतील पाचवडमध्ये काहीसा कमी पाऊस झाला आहे. पण पेरण्या पूर्ण होण्याइतपत ओलावा इथल्या जमिनीत असून उगवण वाया जाणार नाही अशी अपेक्षा आहे.

जूनमध्ये पुण्यातही दररोज ढग भरून येत होते, परंतु पाऊस काही कोसळत नव्हता. पाणीटंचाईमुळे पुण्याला एका दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा अजूनही तसाच सुरू आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुण्यात संततधार सुरू झाली आणि धरण क्षेत्रातही प्रथमच दमदार पावसाला सुरुवात झाली आहे.

अहमदनगर जिल्हा अजूनही मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हय़ाचा उत्तर भाग कोरडाच आहे. उत्तर भागातील कोपरगाव, राहाता, नेवासे, श्रीरामपूर व संगमनेर भागांत पावसाचे प्रमाण नगण्य असून, येथे खरिपाच्या पेरण्यांची प्रतीक्षा आहे. या भागात झालेल्या अत्यल्प पावसाने काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्त सुटला आहे, तरी पेरण्यांच्या बाबतीत अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. तुलनेने जिल्हय़ाच्या दक्षिण भागात मात्र पावसाचे प्रमाण बरे आहे.

ठाण्यातही जूनचे सुरुवातीचे पंधरा दिवस पावसाचे टिपूसही दृष्टीस पडले नव्हते. महिन्याच्या उत्तरार्धात या ठिकाणी पावसाने हजेरी दिली. दरवर्षी पहिल्यांदा धरण क्षेत्रामध्ये दाखल झालेला पाऊस यंदा धरण क्षेत्राकडे पाठ फिरवून शहरी भागातच कोसळत होता. धरण क्षेत्रात दाखल होण्यासाठी पावसाने जुलै महिन्याची वाट पाहिली आणि अवघ्या दोन दिवसांमध्ये ठाणे जिल्ह्य़ातील धरण क्षेत्रामध्ये दमदार हजेरी लावली. शहापूर आणि मुरबाड जिल्ह्य़ांतील या धरणांच्या क्षेत्रात जूनमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने शहरातील नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.

माहिती संकलन : चंद्रशेखर बोबडे (नागपूर), सुहास सरदेशमुख (औरंगाबाद), अविनाश पाटील (नाशिक), जयेश सामंत (ठाणे), मनोज पत्की (सातारा), दिगंबर शिंदे (सांगली), दयानंद लिपारे (कोल्हापूर), एजाज हुसेन मुजावर (सोलापूर).

((  इगतपुरी तालुक्यातील दुथडी भरून वाहणारी दारणा नदी.   ))