आपण कर्तव्यबुद्धीने एखाद्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि तो नेमका कुणा वरिष्ठाचा नातेवाईक असावा, अशी भीती सध्या पोलीस दलात पसरली आहे. पोलिसांवरच हात उगारण्याचे प्रकार वाढत असताना राज्याचे गृह खाते उपाययोजना करीत नाही. यातून कायदा पायदळी तुडवण्याची मानसिकता आणखीच वाढते..

kerala moves supreme court against dispute over states borrowing powers
लेख : राज्यांच्या कर्जमर्यादेला केंद्राचा चाप?
MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
panvel tdr marathi news, cidco area of ​​panvel municipal corporation marathi news
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सिडको हद्दीत टीडीआर लागू होणार, ३० दिवसांत नागरिकांना हरकतींची मुभा 
supreme court caa
“हा कायदा मुस्लिमांशी भेदभाव करतो”, CAA ला विरोध करणाऱ्या २३७ याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

डावीकडे वळण्यास मनाई असतानाही नियम तोडणाऱ्या दुचाकीस्वाराच्या मुलीने अडवणाऱ्या पोलिसाविरुद्ध विनयभंगाची तक्रार करणे, हे सध्याच्या सभ्य समाजातील अतिरंजित वाटेल, असे वास्तव आहे. बेदरकारपणे वाहने चालवणे किं वा वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी असतात, अशा आविर्भावात अनेक जण सर्रास नियम धुडकावून वाहने चालवितात. त्यांना तो जन्मसिद्ध अधिकारच वाटतो. अलीकडेच पुण्यात घडलेल्या घटनेत गजबजलेल्या कर्वे रस्त्यावर नियम मोडून निघालेल्या न्यायाधीश महिलेच्या पतीला वाहतूक पोलिसाने अडविल्यानंतर पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करणारा दुचाकीस्वार आणि त्याच्या वीस वर्षीय मुलीविरुद्ध पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायाधीश महिलेच्या मुलीने हवालदाराने मला धक्काबुक्की केली अशी तक्रार केल्यानंतर त्या पोलीस हवालदाराविरुद्ध थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सत्तेचा, पदाचा आणि अधिकाराचा असा माज सध्या राज्यातील सगळय़ा शहरांमध्ये थेट रस्त्यावर दिसू लागला आहे. पोलिसाच्या वर्दीबद्दल असलेला दरारा तर कधीच संपला आहे, उलट त्याच्यावर हात उगारणे हेच सध्याच्या पुरुषार्थाचे व्यवच्छेदक लक्षण बनले आहे. गेल्याच आठवडय़ात नालासोपारा येथे पोलिसावर हात उगारण्याची हिंमत दाखवून आपण कसे शूर आहोत, याचे दर्शन एका बहाद्दराने घडवले होते. मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील सगळय़ा शहरांमध्ये भर रस्त्यावर पोलिसाला बदडून काढण्याच्या घटनांची मालिकाच दिसून येते. तरीही राज्याचे गृह खाते आपल्याच पोलीस कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या या हल्ल्यांकडे मात्र मख्खपणे पाहत बसले आहे. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक, राजकारण्यांचे अतिदूरचे नातेवाईक, न्यायाधीशांचे नातेवाईक अशा सगळय़ांना आता पोलिसांची भीती राहिलेली नाही. एरवी चौकात पोलीस नाही याची खात्री केल्यानंतरच सिग्नल तोडण्याची हिंमत करणारा सामान्य नागरिक दिवसाढवळय़ा पोलिसांना मारणाऱ्या या शूर योद्धय़ाकडे अतिशय आदराने पाहू लागला आहे. जरब, धाक, भीती हे शब्द अशा सगळय़ांच्या डोक्यातून कधीच हद्दपार झाल्याचे हे लक्षण आहे. आपल्या वपर्यंत ओळखी आहेत, आपल्याला कोणी कधीच हात लावू शकणार नाही, आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्याची गडचिरोलीच्या जंगलात बदली करण्याची आपली ताकद आहे, असा समज असणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढते आहे आणि ते अतिशय धोकादायक आहे.

पोलीस हे आपले घरगडी आहेत आणि आपण त्यांचे मालक आहोत, असा समज दृढ होतो याचे कारण अशांना आजवर कधीही जाब विचारला गेला नाही. नियम मोडणाऱ्याच्या ओळखी त्या पोलिसाच्याच मुळावर येतात आणि त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना अडवणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण असा समज पसरण्यास मदत होत आहे. पोलीस नावाची यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करीत असेल, तर त्या कामात अशा प्रकारचे अडथळे रोजच येत आहेत आणि त्यामुळे सामान्यांनाही या यंत्रणेबद्दल जरब राहिलेली दिसत नाही. पुण्यात गेल्या आठवडय़ात घडलेली घटना याबाबत अतिशय बोलकी म्हणता येईल अशी होती. गजबजलेल्या कर्वे रस्त्यावर नियम मोडून निघालेल्या न्यायाधीश महिलेच्या पतीला वाहतूक पोलिसाने अडविल्यानंतर पोलिसाला धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली. मारहाण करणारा दुचाकीस्वार आणि त्याच्या वीस वर्षीय मुलीविरुद्ध पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायाधीश महिलेच्या मुलीने हवालदारानेच मला धक्काबुक्की केली, अशी तक्रार केल्यानंतर त्या पोलीस हवालदाराविरुद्ध थेट विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरे प्रकरणही असेच. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या मोटारीवर कारवाई केल्यानंतर बालवडकर यांनी कारवाई करणारे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी मद्यसेवन केल्याची तक्रार केली. त्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक डामसे यांना शिवाजीनगर वाहतूक शाखेत बोलावून त्यांची बालवडकर यांच्यासमोर मद्यसेवन चाचणी घेण्यात आली. या प्रकरणात जंगली महाराज रस्त्यावर मोटार उभी केल्यानंतर नगरसेवक अमोल बालवडकर आणि त्यांचा मोटारचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर डामसे यांनी या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही कारवाई सुरू असताना बालवडकर यांनी वाहतूक शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्या पोलीस निरीक्षकाने डामसे यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. बालवडकर माझे मित्र आहेत. त्यांच्या मोटारीवर कारवाई करू नका, असे त्यांनी डामसे यांना सांगितले. हा सर्व प्रकार सुरू असताना बालवडकर यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक डामसे यांनी मद्यसेवन केले आहे, त्यांच्यावर कारवाई करा, असे बालवडकर यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले. या घटनेनंतर वाहतूक विभागाच्या सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकारी महिलेने डामसे यांची सर्वासमक्ष मद्यसेवन चाचणी घेतली. या घटनेवरून पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करीत आहेत, याची जाणीव सामान्यांना होईल. गेल्या वर्षी कल्याणमध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी एका मंडळाच्या कार्यकर्त्यांने पोलीस शिपायाला विसर्जन घाटावरील पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आली होती. त्याहीआधी ठाण्यात, शिवसेनेशी संबंध असलेल्या एका रिक्षाचालकाने महिला पोलिसाच्या श्रीमुखात भडकावली होती.

कायद्यासमोर सगळे सारखे असतात, असे सांगणाऱ्या या देशात त्याच कायद्याचा रोज खून पडत असताना, त्याला आवरण्याची जबाबदारी असलेली पोलीस यंत्रणा अतिशय ढिम्म असणे, हे अधिक भयावह आहे. गृह खात्यातील कोणताही वरिष्ठ अधिकारी अशा प्रकरणांत सामान्य पोलिसाच्या बाजूने उभे राहण्याची तसदी घेत नाही. परिणामी, संपूर्ण यंत्रणा किडण्यास सुरुवात होते आणि तिचे खच्चीकरण होते. गुन्हेगाराला पकडण्यासाठी तपास करण्याचे काम करण्यास पोलीस हल्ली धजावत नाहीत, याचे कारण कोण कोणाचा नातेवाईक असेल, हे सांगता येत नाही. आपण कर्तव्यबुद्धीने एखाद्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा आणि तो नेमका कुणा वरिष्ठाचा नातेवाईक असावा, अशी अनामिक भीती सध्या पोलीस दलात पसरलेली आहे. नव्याने सत्तेत आलेल्या सगळय़ांना याची जाणीव असल्याने हे राज्य कायद्याचे आहे, यावरचा सामान्यांचा विश्वासही उडू लागलेला आहे. पोलीस म्हणजे उद्धट, पैसे उकळणारा असा समज आहे, पण एक दिवस कुठल्याही चौकात पोलिसांसोबत उभे राहून वाहतुकीचे नियमन करा म्हणजे पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची जाणीव सामान्यांना होईल. पोलिसांवर सामान्यांकडून होणारे हल्ले किंवा मारहाणीच्या घटना पाहता अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. एकंदरच कायदा पायदळी तुडवण्याची मानसिकता समाजात वाढीस लागल्याचे हे द्योतक मानावे लागेल. सत्ता, पद, पैसा आल्यानंतर माणसात एक प्रकारचा अहंगंड तयार होतो. माझे कोण वाकडे करणार आहे, अशा आविर्भावात तो वावरू लागतो. कमी श्रमात मिळणारा पैसा, त्यानंतर एखाद्या राजकीय पक्षाची झूल अंगावर मिरवून समाजात वावरण्याची हौस भागविणारे अनेक जण राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसतात. सत्ताधारी पक्षाची सलगी असल्याचे दाखवून मोटारीवर राजकीय पक्षाचे चिन्ह वापरून समाजात दहशत निर्माण करणारे अनेक जण पाहायला मिळतात. सध्या पुणे, मुंबईसह राज्यातील अगदी छोटय़ा शहरात मोटारी तसेच दुचाकी वाहनांवर कमळ चित्र उगवल्याचे चित्र पाहायला मिळते. वाहनांवर उमललेले घडय़ाळ, कमळ किंवा धनुष्यबाण पाहताच कारवाई करणारा पोलीसदेखील चपापतो आणि त्या कथित राजकीय नेत्याचा माज आणखीनच वाढतो.

राज्यातील पोलीस दल बिचारे झाले असताना, त्यांच्या अधिकाराचे रक्षण करण्याची जबाबदारी खरे तर गृह खात्याची. पण ती पार पाडली जाताना दिसत नाही. पोलिसाशी उद्दाम वर्तन करण्यातच पुरुषार्थ मानण्यास मिळत असलेली समाजमान्यता त्याला कारणीभूत आहे. हे असेच सुरू राहिले तर येत्या काही काळात जागोजागी पोलीस केवळ नावापुरते दिसतील. पुढेमागे पोलीस असणे, हेच मोठेपणा मिरवण्याचे लक्षण मानले जाऊ लागले तर पोलीस नावाची यंत्रणा घरगडय़ासारखी काम करू लागेल आणि समाजात धाक, जरब, भीती या शब्दांना अर्थही राहणार नाही. कोणीही उठतो आणि पोलिसाच्या कानशिलाखाली वाजवतो, हे काही समर्थ समाजाचे लक्षण नव्हे, हे गृह खात्यातील सगळय़ाच वरिष्ठांनी समजून घ्यायला हवे आणि रसातळाला जात असलेली पोलिसांची प्रतिष्ठा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी कामाला लागायला हवे.

rahul.khaladkar@expressindia.com