पक्ष नेमका आहे कुठे याचा कार्यकर्त्यांनाही अंदाज येत नाही, अशा स्थितीतून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडू शकेल, अशी चिन्हे पक्षाने १६ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमात दिसली. कार्यकर्त्यांना संघर्षांचा सल्ला देताना, ‘काहीही होवो, माघार घ्यायची नाहीहे पवारांचे विधान बोलके ठरते. या पक्षाचे सतरावे वर्ष पुनर्बाधणीचे, तर अठरावे प्रौढहोण्याचे असेल का?

पक्षासाठी सोळावे वरीस धोक्याचे आणि चमत्कारिक गेल्याची कबुली पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी १७व्या वर्धापन दिन कार्यक्रमात देऊन राष्ट्रवादीची वाटचाल खडतर मार्गाने होत असल्याचे मान्यच केले. कोणत्याही राजकीय पक्षासाठी चढ-उतार वा हार-जीत ही होतच असते. निवडणुकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचते, नेतेमंडळी पक्ष सोडून जातात ही प्रक्रिया सुरूच राहते. पराभवाचे आत्मपरीक्षण करून पुढील वाटचालीकरिता योग्य पावले टाकावी लागतात. पराभवानंतर विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता तयार व्हावी लागते किंवा विरोधी पक्ष म्हणून प्रभावीपणे काम करावे लागते. स्थापनेपासून अलीकडच्या पावणेदोन वर्षांचा अपवाद वगळता सत्तेत राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पराभव पचविणे कठीण जात आहे. छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांना गैरव्यवहारांच्या आरोपांवरून झालेली अटक, अजित पवार आणि सुनील तटकरे या नेत्यांवर असलेली चौकशीची टांगती तलवार, पक्षाचे प्राबल्य असलेल्या सहकार चळवळीतील राष्ट्रवादीची मक्तेदारी मोडून काढण्याकरिता भाजपने टाकलेली पावले यांमुळे राष्ट्रवादीच्या प्रतिमेला धक्का बसलाच, पण सहकारावरील वर्चस्व टिकविण्याकरिता झगडावे लागत आहे. प्रत्येक पक्षाची विशिष्ट भूमिका ठरलेली असते. सत्ताधाऱ्यांच्या बाजूने किंवा विरोधी पक्ष अशी राजकीय पक्षांची ओळख असते. राष्ट्रवादीबाबत नेमका यातच संभ्रम आहे. पक्ष नेमका आहे कुठे याचा कार्यकर्त्यांनाही अंदाज येत नाही. परिणामी राष्ट्रवादीबद्दल संशय आणि संभ्रमाचे वातावरण तयार झाले. हेच नेमके पक्षाला मारक ठरत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच काँग्रेस आणि भाजप-शिवसेना यांच्यापासून समान अंतर ठेवील, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष स्थापनेच्या वेळी जाहीर केले होते. शरद पवार यांच्याशिवाय राज्याच्या राजकारणाची पातही हलत नाही, असे बोलले जात असले तरी पवारांना संपूर्ण महाराष्ट्र एकहाती कधीच पादाक्रांत करता आला नाही. समविचारी आणि निधर्मवादाची कास सोडायची नाही या तत्त्वानुसार पवारांनी काँग्रेसशी जुळवून घेतले. सत्तेशिवाय पक्षही टिकला नसता. १९९९ ते २०१४ पर्यंत राष्ट्रवादीने काँग्रेसबरोबर संसार केला. अनेकदा रुसवे-फुगवे आले, पण दोघांनीही जमवून घेतले. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर देशात बदलाचे वारे वाहू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची हवा तयार होऊन काँग्रेसची अधोगती सुरू झाली. राष्ट्रीय राजकारणाकरिता पवारांना भाजप जवळचा वाटू लागला. नाही तरी दिल्लीच्या तख्ताशी जुळवून घेण्याचा पवारांचा इतिहासच आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला १४४चा जादूई आकडा गाठता आला नाही तेव्हा भाजपने मागणी केलेली नसतानाही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केला. सरकार स्थिर राहावे म्हणून वगैरे दावे राष्ट्रवादीने केले, पण त्यातून राष्ट्रवादीचे डावपेच उघड झाले होते. भाजप आणि राष्ट्रवादीचा दोस्ताना वाढत गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली या सरकारमधील दोन प्रमुख नेत्यांचे पाय बारामतीला लागले किंवा मोदींच्या स्वच्छ भारत योजनेकरिता शरद पवारांनी बारामतीमध्ये झाडू हातात घेतला, तेव्हापासून चर्चा तर सुरू झाली. मोदी यांचे पवारांशी उत्तम संबंध असले तरी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीला अजिबात थारा देण्यास तयार नाहीत. एक वेळ शिवसेना परवडली, पण राष्ट्रवादीचे लोढणे गळ्यात नकोच, ही मुख्यमंत्र्यांची ठाम भूमिका आहे. राज्यात सत्ताबदलानंतर नितीन गडकरी मुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची मनोमन इच्छा होती. नवी दिल्लीत भाजप नेतृत्वाशी जवळीक आणि मुंबईत भाजप किंवा मुख्यमंत्र्यांशी दोन हात करण्याची कसरत राष्ट्रवादीच्या नेत्यांना करावी लागते. राज्यातील दुष्काळी परिस्थिती किंवा काही महत्त्वाच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीच्या वतीने विरोधी भूमिका घेतली जाते. राष्ट्रवादीचे सारे नेते राज्य सरकारवर टीकाटिप्पणी करीत असतात. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचीच शिष्टमंडळे नेहमी ‘वर्षां’वर जात असतात. भाजपवर टीका करतानाच पवारांनी काँग्रेसलाही लक्ष्य केल्याने राष्ट्रवादीचे नेमके चाललेय काय, असा प्रश्न निर्माण होतो.

काँग्रेसची अवस्था सध्या वाईट आहे. विविध राज्यांमधील नेते पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी शंका घेतली जाते. त्यातच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या मनात राहुल गांधींबद्दल अढी आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसबरोबर जाऊन काहीच फायदा नाही. हे ओळखूनच पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसने आघाडी तोडली, असे सांगत सारे खापर पवारांनी काँग्रेसवर फोडले. पवार काँग्रेसच्या विरोधी बोलू लागले की, राष्ट्रवादी भाजपच्या जवळ जात आहे, असा अर्थ काढला जातो. कधी काँग्रेस तर कधी भाजप, ही धरसोड भूमिकाच पक्षाच्या मुळावर आली आहे.

राष्ट्रवादीत आलेली मरगळ दूर करण्याकरिता पक्षाला चांगले भवितव्य असल्याचे सांगत नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न पवारांनी केला आहे. मोदी लाट ओसरत असून, गुजरातमधील ग्रामीण भागातील निवडणुकांमध्ये भाजपचा धुव्वा उडाला, याच धर्तीवर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राज्यात बदलाचे वारे वाहू लागतील, असे भाकीत वर्तविले आहे. मुस्लीममुक्त भारत अशी घोषणा करणाऱ्या साध्वी प्राची यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही ही सुप्रिया सुळे यांची घोषणा किंवा विमानतळ परिसरातील बंद २३ हजार घरांचा लोकांना ताबा देण्याचे पवारांनी सोडलेले फर्मान यावरून राष्ट्रवादी आक्रमक होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. काहीही होवो, माघार घ्यायची नाही हे पवारांचे विधान बोलके आहे. संघर्षांच्या माध्यमातून पक्ष वाढविण्याकडे कल दिसतो. पवारांच्या आदेशानंतरच लगेच दुसऱ्या दिवशी आमदार विद्या चव्हाण यांनी नवी मुंबईतील दिघ्यामधील अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांच्या बरोबर ठाण्यात आंदोलन केले. सरकारला त्याची दखल घ्यावी लागली. दिघावासीयांच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे सरकारने जाहीर केले. अशा पद्धतीने यशस्वी आंदोलने झाल्यास राष्ट्रवादीला लोकांचा पाठिंबा मिळू शकेल. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कसोटी लागणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगले यश मिळाल्यास राष्ट्रवादीबद्दल विश्वासाचे वातावरण तयार होईल. म्हणूनच स्वत: शरद पवार यांनी पक्षाच्या कारभारात लक्ष घातले आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून ग्रामीण भागात तरी पक्षाची ताकद कायम राहिली पाहिजे, असा प्रयत्न राहणार आहे. या निवडणुकांमध्ये पक्षाला अपयश आल्यास राष्ट्रवादीच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहील. पुढील पाच-सहा महिने काँग्रेसपेक्षा आक्रमक विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी भूमिका बजाविण्यावर भर राहू शकतो.

सोळावे वर्ष पक्षासाठी धोकादायक गेल्याचे पवारांनीच जाहीर केले. सतराव्या वर्षांत पक्ष पुन्हा ताकदीने उभा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गटतट बस झाले, आता फक्त राष्ट्रवादी हा एकमेव गट, हे अजित पवारांचे विधानही बरेच सूचक आहे. जिल्ह्य़ाजिल्ह्य़ांतील सरदारांमधील वादाला खतपाणी घातले गेल्याने पक्षाचे नुकसान झाले. यामुळेच आता एकी ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. सोळावे धोक्याचे, सतरावे पक्षाच्या पुनर्बाधणीचे, मग अठराव्या वर्षांत राष्ट्रवादी खरोखरीच प्रौढ होणार का? विधानसभेची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवरून राष्ट्रवादीचे प्रौढपण समजू शकेल.

santosh.pradhan@expressindia.com