स्त्री भ्रूणहत्या थांबवणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य याची सुरक्षितता देणे, मुलींप्रति समाजात स्वागताची भावना निर्माण करणे, बालविवाह रोखणे, मुला-मुलींचा जन्मदर समान ठेवणे यांसारख्या अनेक उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी महिला व बालविकास विभागाने १३ फेब्रुवारी २०१४ पासून राज्यात सुकन्या योजनेची अंमलबजावणी सुरू केली होती. त्यानंतर या योजनेचे रूपांतर ‘माझी कन्या भाग्यश्री’मध्ये करण्यात आले. ही नवीन योजना १ एप्रिल २०१६ पासून सुरू करण्यात आली. योजना दारिद्रय़रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या दोन मुलींसाठी लागू असून दारिद्रय़रेषेवरील कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींना योजनेतील काही लाभ मिळणार आहेत.

या योजनेची अंमलबजावणी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्याकडून होते. सुकन्या योजनेत राज्यातील दारिद्रय़रेषेखालील कुटुंबात जन्माला येणाऱ्या पहिल्या दोन मुलींच्या नावे २१,२०० रुपयांची रक्कम (मुलींच्या जन्माच्या एका वर्षांच्या आत) आयुर्विमा महामंडळात गुंतवून लाभार्थी मुलगी पूर्ण १८ वर्षांची झाल्यानंतर तिला १ लाख रुपये देण्याची तरतूद होती. सुकन्या योजनेतील दारिद्रय़रेषेखालील गटासाठी देण्यात येणारे सर्व लाभ ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेत कायम ठेवण्यात आले आहेत. त्यापुढे जाऊन आता हे लाभ दारिद्रय़रेषेवरील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांनाही लागू करण्यात आले आहेत.

Teacher
२४ हजार शिक्षकांची भरती रद्द, मिळालेला पगारही चार आठवड्यांत परत करण्याचे निर्देश; नेमकं प्रकरण काय?
apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
bombay hc declare sawantwadi dodamarg corridor as ecologically sensitive
अन्वयार्थ : पुन्हा कान टोचले; आता तरी सुधारा..

योजनेतून मिळणारे मुख्य लाभ

मुख्य लाभांतर्गत लाभार्थी मुलींना आयुर्विमा, आम आदमी विमा योजना आणि प्रधानमंत्री जनधन योजनेतले लाभ मिळणार आहेत.

मुख्य लाभ १: आयुर्विम्याचे लाभ

मुलीच्या नावावर शासनामार्फत आयुर्विमा महामंडळाकडे २१,२०० रुपयांचा विमा उतरविण्यात येईल. मुलगी १८ वर्षांची पूर्ण झाल्यानंतर तिला

१ लाख रुपये विम्याची रक्कम देण्यात येईल. या रकमेपैकी १० हजार रुपयांची रक्कम मुलीच्या कौशल्य विकासासाठी किंवा उच्चशिक्षण अथवा स्वयंरोजगार मिळवण्यासाठी खर्च करणे आवश्यक आहे. आयुर्विम्याच्या लाभासाठी सर्वसाधारण अटी अशा आहेत- हा लाभ दारिद्रय़रेषेखालील आणि वरील दोन्ही कुटुंबातील पहिल्या दोन मुलींना लागू आहे. मात्र तिसरे अपत्य जन्माला आले तर त्यास हा लाभ मिळणार नाही. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असावेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

विम्याचा लाभ घेताना मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होणे, तिने इयत्ता १०वीची परीक्षा उत्तीर्ण होणे आणि १८ वर्षांपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे.

दुसऱ्या प्रसूतीच्यावेळी जर जुळ्या मुली झाल्या तर त्या मुली योजनेतील लाभास पात्र ठरतील.

एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर या मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ दिला जाईल. योजनेचा लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ६ किंवा ६ वर्षांपेक्षा कमी असावे.

बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना लागू आहे. यासाठी संबंधित ग्रामीण-नागरी क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे दिलेल्या नमुन्यात अर्ज करावा. मुलगी १८ वर्षांची होण्यापूर्वी मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास, योजनेचा फायदा तिच्या पालकांना मिळणार नाही. अशा परिस्थितीत मुलीच्या नावे बँकेत जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेल्या सरप्लस खात्यात जमा होईल. भारतीय आयुर्विमा महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या नावे एक पॉलिसी काढील ज्यामध्ये प्रत्येक लाभार्थी मुलीसाठी स्वतंत्र खाते असेल. सरप्लस खाते खालील कारणामध्ये कार्यरत होईल. मुलीच्या नावे वैयक्तिक असलेला एकत्रित निधी एक लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास एक लाख रुपयांवरील रक्कम सरप्लस खात्यात जमा होईल तसेच मुलीच्या नावे असलेला एकत्रित निधी १ लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास, कमी असलेली रक्कम सरप्लस खात्यातून मुलीच्या खात्यात जमा होईल.

मुख्य लाभ २ : आम आदमी विमा योजनेचा लाभ

लाभार्थी मुलीचे पालक १८ ते ५९ वयोगटांतील रोजगार करणारे कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती असतील तर – आयुर्विमा महामंडळात मुलीच्या नावे गुंतवलेल्या रकमेतून प्रति वर्षी १०० रुपये इतका हप्ता भरून कर्त्यां पालकाचा आम आदमी विमा योजनेतून विमा उतरवला जाईल. मुलीच्या कर्त्यां पालकांचा अपघात, मृत्यू झाल्यास आम आदमी विमा योजनेून त्यांना खालीलप्रमाणे लाभ मिळू शकतील.-  नैसर्गिक मृत्यू ३० हजार, अपघातामुळे मृत्यू ७५ हजार, दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास ३७,५०० रुपये पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या नमुन्यात विमा प्राधिकरणाकडे अर्ज करावा. तसेच या योजनेतील शिक्षा सहयोग कार्यक्रमातून मुलीला ९वी, १०वी व ११वीपर्यंत प्रत्येक सहा महिन्याला ६०० रुपये शिष्यवृत्ती मिळेल. योजनेच्या लाभासाठी ग्रामीण भागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण, जिल्हा परिषद तर नागरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा.

मुख्य लाभ ३ : प्रधानमंत्री जनधन योजना

या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई यांच्या संयुक्त नावे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते उघडले जाईल. त्यामुळे या योजनेत असलेला १ लाख रुपयांचा अपघात विमा व ५ हजार रुपयांचा अधिकर्ष (ओव्हर ड्राफ्ट) याचा लाभ त्यांना मिळेल. माझी कन्या भाग्यश्री योजनेतील लाभ मुलीला तिच्या प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत असलेल्या बँक खात्यात देण्यात येईल.

योजनेतील इतर विशेष लाभ

मुख्य लाभाबरोबर खालील विशेष लाभ दारिद्रय़रेषेखालील कुटुंबात जन्माला येणाऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या मुलीला तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यानुसार मिळत राहतील (एकुलती एक मुलगी म्हणजे एका मुलीनंतर तिच्या आईने कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केलेली असणे आवश्यक.).

जन्माचे स्वागत व संगोपन

एकुलती एक मुलगी : मुलीच्या पालकांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा होणार, दुसरी मुलगी : एक मुलगी असताना दुसरी मुलगी जन्मल्यास पालकांच्या खात्यात अडीच हजार रुपये जमा होणार, एकुलत्या एक मुलीच्या आजी-आजोबांना प्रोत्साहनात्मक जास्तीत जास्त ५ हजार रुपयांपर्यंत सोन्याचे नाणे भेट मिळेल. तसेच तिच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेसाठीचा शैक्षणिक खर्च व पोषण यासाठी २५०० प्रति वर्ष याप्रमाणे पाच वर्षांसाठी १२,५०० रुपये, दोन मुलींच्या पहिली ते पाचवीपर्यंतच्या शालेय खर्च व पोषणासाठी प्रत्येक मुलीस १५०० प्रति वर्ष याप्रमाणे पाच वर्षांसाठी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत.

या योजनेतील प्रत्येक लाभासाठी अटी, शर्ती आणि कालावधी निश्चित करण्यात आला असून त्याची सविस्तर माहिती २२ फेब्रुवारी २०१७च्या शासन निर्णयात देण्यात आली आहे. यातील अटी आणि शर्तीच्या पूर्ततेनंतरच योजनेचा लाभ मिळू शकेल.

 

डॉ. सुरेखा मुळे

drsurekha.mulay@gmail.com