स्वत:चा छोटामोठा उद्योग-व्यवसाय करणारी स्त्री, स्वयंसाहाय्यता गटातील स्त्रिया, स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देणाऱ्या स्त्रियांना, गटाला महिला व बाल विकास मंत्रालयाने ‘ई-हाट’ वेबपोर्टलद्वारे स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. उद्योजिकेसाठी हे खूप मोलाचं पाऊल आहे.

स्त्री  च्या पहिल्या पिढीने सुरक्षित १० ते ५ च्या नोकरीचा मार्ग स्वीकारला; पण दुसऱ्या फळीने मात्र आकाशात झेप घेतली. उद्योग-व्यवसायाची जोखीम स्वीकारत रुळलेल्या वाटांपलीकडची वाट निवडली आणि ती पादाक्रांतही केली.

व्यवसायातलं तिचं पहिलं पाऊल पोळ्या लाटणं, पापड, लोणचं- मसाले बनवणे असे पडले असले तरी क्रमाक्रमाने आपल्यातील कौशल्ये विकसित करत तिने आता ना केवळ स्वत:च्या शहराच्याच नव्हे तर राज्य आणि देशाच्या सीमा ओलांडून आपल्या उद्योग-व्यवसायाचा विस्तार केला आहे. आता तर तंत्रज्ञान तिच्या सोबतीला आहे. ती तयार करत असलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून वैश्विक बाजारपेठ तिच्यासाठी उपलब्ध झाली आहे. तिचे उत्पादन ती जगभरातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. शासनही यासाठी तिच्यापाठी खंबीरपणे उभे आहे.

याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेली ‘ई हाट’ ही संकल्पना. स्वत:चा छोटामोठा उद्योग-व्यवसाय करणारी स्त्री, स्वयंसाहाय्यता गटातील स्त्रिया, स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया, उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून देणाऱ्या स्त्रियांना, गटाला ई-हाट वेबपोर्टलद्वारे स्थानिक तसेच जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

हे स्त्रियांनी तयार केलेल्या उत्पादन आणि सेवांच्या विक्रीसाठी सुरू करण्यात आलेले एक अधिकृत वेब पोर्टल आहे. उद्योग-व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या उत्पादनांची आणि सेवांची माहिती, त्याची वैशिष्टय़े आणि किंमत देताना याबरोबरच त्याची छायाचित्रेही अपलोड करण्याची संधी या माध्यमातून मोफत मिळत आहे. त्यांच्यातील कौशल्याला उत्तमरीत्या मांडण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. यातून ना केवळ स्त्रियांचे सक्षमीकरण होणार आहे, परंतु देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाची प्रक्रियाही गतिमान होणार आहे. मेक इन इंडिया, स्टॅण्डअप इंडियाशी संलग्न राहून संधीचे हे दालन आता स्त्रियांसाठी खुलं झालं आहे.

या ‘ई हाट’मध्ये सहभागी कसं व्हायचं?

तुम्ही स्त्री उद्योजक असाल, तुम्ही बचतगटात काम करणाऱ्या स्त्रिया असाल, स्त्री स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून सेवा देत असाल तर तुम्ही सर्व जण या वेबपोर्टलवर आपले उत्पादन आणि सेवा जगभरातील खरेदीदारासाठी उपलब्ध करून देऊ  शकता. यासाठी काय करायचं?

सगळ्यात पहिल्यांदा महिला ‘ई-हाट’च्या http://www.mahilaehaat-rmk.gov.in या संकेतस्थळावर जायचं.. महिला ई हाट काय आहे हे समजून घ्यायचं. यात तयार कपडे, फॅशनेबल वस्तू आणि दागिने, बॅग्ज, डेकोरेटिव्ह आणि भेटीच्या वस्तू, फाइल फोल्डर, किराणा सामान, बॉक्सेस, बास्केट्स, कारपेट्स, रग, फूट मॅट्स शैक्षणिक साहित्य, गृह सजावटीच्या वस्तू, चादर, अभ्रे, लहान मुलांची खेळणी अशा एकूण १८ प्रकारांत वस्तूंचे वर्गीकरण केलेले दिसते. शिवाय तुम्ही पुरवत असलेल्या सेवांचे ही यात मार्केटिंग करता येते. जसे तुम्ही जेवणाचे डबे पोहोचवत असाल, निवडलेल्या भाज्या किंवा वैद्यकीय सेवा पुरवत असाल, ब्युटिपार्लरची सेवा देत असाल, तर अशा कुठल्याही उत्पादन आणि सेवांचे मार्केटिंग या पोर्टलद्वारे करून तुम्ही तुमचे उत्पादन ना केवळ आसपासच्या, पण जगभरातल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकता.

यात सहभागी कसं व्हायचं, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या संकेतस्थळावर join us या शीर्षकाखाली ऑनलाइन फॉर्म उपलब्ध आहे. तो भरून तुम्हाला तुमचे उत्पादन किंवा सेवा यांचा यात समावेश करता येईल. यासाठी तुमचा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. तुमची एखादी वस्तू ग्राहकाला आवडली आणि खरेदी कराविशी वाटली तर त्याला तुमच्याशी थेट संपर्क करता यावा या दृष्टीने तुमचा संपर्क नंबर येथे द्यावा लागतो. तुम्ही जर ‘ई हाट’ ही ऑनलाइन बाजारपेठ पाहिली तर यात वस्तूंच्या स्वरूपाप्रमाणे जसं वर्गीकरण केलेलं दिसतं तसंच ते त्या वस्तू किंवा सेवेच्या किमतीप्रमाणेही केलेले दिसते. जसे की ४९९ किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या वस्तू, ५०० ते १००० रुपयांपर्यंतच्या वस्तू, १००० आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या वस्तू.. असे. तुमच्या उत्पादनांची जशी किंमत आहे त्याप्रमाणेही त्याचा समावेश होऊ  शकतो. यामुळे एखाद्या ग्राहकाला त्याला पाहिजे असलेली वस्तू त्याच्या बजेटनुसारही शोधता येते. याच्याशेजारीच Download forms नावाची लिंक आहे. यामध्ये ‘महिला ई हाट’मध्ये सहभागी होण्यासाठी नेमकं काय करायचं, अटी आणि शर्ती काय आहेत याच्यासह इतर संदर्भीय माहिती देण्यात आली आहे. जी वाचली तर ‘ई हाट’मध्ये सहभागी होणं आणि त्यांच्या अटी आणि शर्तीसह आपलं उत्पादन वैश्विक बाजारपेठेत पोहोचवणं तुम्हाला सहज शक्य होते.

‘महिला ई हाट’ची विशेषत: म्हणजे हातामधील मोबाइलच्या माध्यमातून ती आपला व्यापार आणि व्यवहार संनियंत्रित करू शकते. यासाठी एक मोबाइल नंबर किंवा थेट संपर्क क्रमांकाची आवश्यकता आहे. उत्पादन, त्याचे छायाचित्र, किंमत, मोबाइल नंबर, उत्पादकाचा पत्ता यासह तुमचे उत्पादन यात नोंदवले जाते. कुठलेही अवैध उत्पादन किंवा वस्तू आणि सेवांचे या पोर्टलवर प्रदर्शन करता येत नाही. ‘ई हाट’मध्ये सहभागी होण्यासाठी स्त्रियांचे वय कमीत कमी १८ वर्षे पूर्ण असणे आणि त्या भारतीय असणे आवश्यक आहे. ग्राहकाने थेट संपर्क केल्यानंतर उत्पादक आपली वस्तू किती किमतीला द्यायची हे ठरवू शकतो. आतापर्यंत जवळपास २४ पेक्षा अधिक राज्याच्या उद्योजकीय स्त्रियांनी या पोर्टलद्वारे आपली उत्पादने वैश्विक बाजारपेठेत पोहोचवली आहेत. वस्तू आणि उत्पादनाच्या गुणवत्तेची जबाबदारी पूर्णत: सहभागी विक्रेत्यांची असते, राष्ट्रीय महिला कोश याची कोणतीही जबाबदारी घेत नाही. वस्तू आणि सेवांमधील त्रुटीची पूर्तता ही सहभागी विक्रेत्यांनीच करावयाची असते. ग्राहकाला दिलेल्या वेळेत त्या वस्तू पोहोचवण्याची जबाबदारीही विक्रेत्याचीच आहे. स्त्रियांची ही उत्पादने किंवा सेवा कमीत कमी ३० दिवसांसाठी संकेतस्थळावर प्रदर्शित केली जातात. त्यानंतर काही कालावधीसाठी ब्रेक देऊन त्यानंतर ती पुन्हा प्रदर्शित होऊ  शकतात.

राष्ट्रीय महिला कोश ‘ई हाट’मध्ये प्रदर्शित होणाऱ्या वस्तूंची निवड करते. वस्तू आणि सेवांची निवड झाल्यानंतर ते कळवण्याचे काम ही राष्ट्रीय महिला कोशकडून केले जाते. अशी निवड झाल्याचे कळवल्यानंतर संबंधित विक्रेत्याकडून स्वीकृतिपत्र मिळाल्यानंतर या वस्तू आणि सेवा संकेतस्थळावर विक्रीसाठी अपलोड करण्यात येतात. वस्तूंची विक्री करताना गरज असेल तिथे राष्ट्रीय तसेच विदेशात वस्तू पाठवताना गरज असेल तिथे विदेशी कायद्याचे पालन करणे, त्यासाठी आवश्यक ते कर भरणे विक्रेत्यासाठी आवश्यक करण्यात आले आहे. वस्तूंची किंमत स्वरूपातील रक्कम विक्रेत्याला ग्राहकाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात मिळते.

राज्यातील कमीत कमी किमतीच्या स्टॅम्प पेपरवर विक्रेत्याला आपल्या उपक्रमाची माहिती ‘ई हाट’मध्ये सहभागी होण्यासाठी द्यावी लागते. सहज आणि वैश्विक बाजारपेठ हे या ‘महिला ई हाट’चे वैशिष्टय़ असून यात अटी आणि शर्तीचे पालन करत सहभागी होता येते. उद्योजकीय स्त्रियांना, स्वयंसाहाय्यता गटांना आणि स्त्री स्वयंसेवी संस्थांना त्यांचे प्रस्ताव  rmkosh@Gmail.com या ई मेलवर किंवा राष्ट्रीय महिला कोष, बी-१२, चौथा मजला, कुतुब इन्स्टिटय़ूशनल एरिया, नवी दिल्ली, ११००१६ या पत्त्यावर पाठवता येतात. ‘महिला ई हाट’च्या माध्यमातून उत्पादने संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी एक समिती आहे. ‘महिला ई हाट’मध्ये प्रदर्शित करावयाच्या वस्तूंच्या निवडीचे अधिकार या समितीकडे असून समितीचा निर्णय अंतिम असतो. ही यात सहभागी होण्याची नियमित प्रक्रिया आहे. त्यामुळे त्याला घाबरून न जाता महाराष्ट्रातील उद्योजकीय स्त्रियांनी वैश्विक बाजारपेठ काबीज करण्यासाठी सज्ज व्हायला काय हरकत आहे? त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

डॉ. सुरेखा मुळे drsurekha.mulay@gmail.com