तुम्हाला गायचंय ना? मग डोळे मिटा आणि एक लांब श्वास घ्या. आठवा- तुमचं बालपण. उगाचच चिखलात हात मारत मारत खिदळायचात तुम्ही.. आठवा- शाळेत असताना लंगडीची मॅच हरल्यानंतर जणू हातून विश्वचषक निसटला आहे असे रडला होतात सगळे एकमेकांच्या गळ्यांत पडून.. आठवा- ते उगाचच तासन् तास गप्पा मारलेले दिवस.. डोळ्यांत पाणी येईपर्यंत तेच तेच आठवत हसत राहणं.. आठवा- आजीचे डोळे.. तुमच्याकडे अगदी देवासारखे बघणारे. आईचा हात.. कष्ट करून करून हातांवरच्या रेषासुद्धा बदलल्या तिने. त्या हाताचा स्पर्श आठवा.. हे सगळं आठवायला एक सेकंदसुद्धा लागत नाही. कारण हे सगळं त्या सेकंद, मिनिट, तास, दिवसाच्या कॅलेंडरच्या पलीकडलं आहे. हे सगळं मनात आणलं की मग आजूबाजूचा कोलाहल विरून जाईल आपोआप. आणि तुम्हाला जाणवायला लागेल की गाणं म्हणायचं, म्हणायचं म्हणता म्हणता तुम्हीच ‘गाणं’ होऊन गेला आहात!
एकदा तुम्हीच गाणं झालात की मग वह्यांमध्ये गाणी साठवत बसायची गरज नाही वाटणार तुम्हाला. ते गाणं प्रदर्शनात ठेवावं असंही वाटणं कमी कमी होत जाईल. कारण ज्यांना जाणवतील त्या गाण्याच्या हृदयाचे ठोके ते लांबूनसुद्धा धावत येतील तुमचा सूर ऐकायला. आणि मग कोण्या तिसऱ्याच्या हाती उरणार नाही की, तुमची गाणी कशी आहेत, ठरवावं.. ती कुठे जावीत, हे सांगावं.. त्याला पुरस्कारांचं तोरण लावावं.. गाणी चोरून नेऊ शकतात; पण मनातलं ‘गाणं’? ते तुमचंच आहे.. तुमचंच असतं..
जपानमध्ये कार्यक्रमात गाताना अचानक वाटलं, की १९९९ साली मी स्वरबद्ध केलेलं विंदा करंदीकरांचं ‘एका माकडाने काढलंय दुकान’ गावं. गाणं सुरू केलं आणि प्रेक्षकांमधली पंधरा-वीस बच्चे कंपनी चालत चालत स्टेजवर आली आणि त्यातली दोन-अडीच वर्षांची एक मुलगी येऊन माझ्या मांडीवर बसली. मग ‘अग्गोबाई ढग्गोबाई’.. ‘इल्लू इल्लू पिल्लू..’ हे सगळं चालू असेपर्यंत मांडीवर शांत बसली होती ती छोटी परीराणी. ती भेट मला खूप काही देऊन गेली. जाणवत होतं की, ती भेट आपल्या नेहमीच्या कक्षेपलीकडची होती. ती कक्षा फक्त लहान मुलंच ओलांडून जाऊ शकतात. जिथे संवादाची गरजच उरत नाही तिथे असणारी ती मंडळी. काय असेल हे नातं? कुठले ऋ णानुबंध? आडनाव, इस्टेट, पगार, गटबाजी, स्टेटस, देश, राज्य, भाषा या साऱ्या पलीकडले.. आपल्या धुरकट, प्लॅस्टिकच्या आकाशापलीकडचे.
‘जळणाऱ्या जळत राहा, जळतो सारेच आम्ही
जळण्याच्या लाख तऱ्हा, राख फक्त जास्त-कमी
जळणाऱ्या जळत राहा, ज्वालांचे भाग्य तुझे
ज्वालेवीण जळती जे, त्यांचे अस्तित्व खुजे..’
असं जेव्हा बा. भ. बोरकर म्हणतात तेव्हा ते ‘जळणं’ असामान्य जळणं आहे. जळण्याच्या लाख तऱ्हा आहेत. अमुक इतकी जमीन आपल्या नावावर आहे.. वारसाहक्क.. वाटणी.. अधिकार.. या अशा सामान्य जळण्यापलीकडलं आहे ते. ‘मला माझा मान मिळाला नाही..’ ‘माझी आज जी जागा आहे ती अढळ आहे..’ अशी पौराणिक मालिकांमधल्या राक्षसांची वाक्यं बोलणाऱ्या मंडळींचं ‘जळणं’ फारच ‘सामान्य’! त्यांची कींव यासाठी येते, की त्यांना खराखुरा ‘आनंद’ मिळणार कधी?
या अशा उथळ, पोकळ जळणाऱ्यांचा धूर होतो काळाकुट्ट.. आणि जे-
‘देऊन आहुतींना ते देवदूत झाले
ज्वालेत जन्मुनिया ज्वालेत ते निमाले..’
स्वा. सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि असे कित्येक..
‘ज्वाला तयांस बंधू.. माता-पिताही ज्वाला
ज्वालाच त्यास भगिनी.. प्रिय प्रेयसीही ज्वाला
ज्वालामयी वधूंशी त्यांनी विवाह केले..
देऊन आहुतींना ते देवदूत झाले..’
असे देवदूत जातात त्या आकाशापलीकडच्या आकाशात.
मुद्दामहून घडवल्या जाणाऱ्या गोष्टींत फार काळ रमाल तर कदाचित पोचणारच नाही तुम्ही त्या आकाशापर्यंत. सतत शक्यता पडताळून बघत, यातून पुढे काय फायदा आहे का, असा धोरणी विचार करत प्रत्येक पाऊल टाकाल तर नवीन रस्ते, नवीन शक्यता हाती लागण्याची वेळ आणि संधी निसटून जाऊ शकते ना!
पाण्यावर पालथे पडून तरंगत राहतो आपण- तसं आयुष्याकडे तोंड करून तरंगून पाहायला हवं.. तरच दिसेल नेहमीच्या चौकटीपलीकडले आकाश. लहान मुलांना आकाशात कधी सशाचा आकार जाणवतो. कधी झाड दिसतं. आणि कधी आजोबांचा चेहरा. आपण हसण्यावारी नेतो ते. पण ते बघत असतात एकटक आकाशाकडे. तुम्ही पाहता? नाही ना? आपल्याला पुरेसं वाटतं ते फक्त आपल्याला ऊन, वारा, पाऊस अणि छप्पर देणारं आकाश. अब्जावधी रुपये मिळवून कितीही उंच महाल बांधलात तरी त्याचं छत ‘आकाश’ होऊ शकत नाही, हे सत्य कळण्याइतक्या संवेदना उरतच नाहीत. दु:ख, वेदना यापेक्षाही बधीर करणारी गोष्ट म्हणजे पैसा. ‘पैशाने सगळं विकत घेता येतं!’ याच्या इतकं आंधळं वाक्य नाही. एक चांगला षड्ज लावून दाखवा बरं? ठेवा खिशात कोटय़वधी रुपये आणि जुळवून बघा बरं- तानपुऱ्याच्या चारही तारा! पैसे देऊन गर्भातच मुलगा की मुलगी ओळखतात. मग तो मुलगा झाला की त्याला जगातल्या सर्वोत्तम गोष्टी देतात. आणि तरीही देता गॅरेंटी- की तो कुलदीपक तुमचा आदर करेल? तुमच्यावर श्रद्धा ठेवेल? मनापासून एकदा म्हणेल का, की तुमच्यामुळे मिळालं मला सगळं? नाही ना? मग ठेवून द्या तुमचं पासबुक कपाटामध्ये. पुरस्कार घ्याल विकत तुम्ही- किंवा तुम्हीच सुरू कराल पुरस्कार सोहळा फक्त तुमच्यासाठी आणि तुम्हालाच आकाश समजणाऱ्या तुमच्या बांडगुळांसाठी. पण ‘गाणं’ नाही विकत घेता येत. ‘गोष्ट’ सुचणं वेगळं आणि ती ‘मलाच’ सुचली हे सांगून पैशाने ते सिद्ध करणं वेगळं. तुम्हाला आनंद मिळेल ‘जिंकण्याचा’; पण त्यापेक्षाही मोठा क्षण असतो ‘सुचण्याचा’! ज्याला मुळात सुचलं होतं ‘गाणं’ किंवा ‘गोष्ट’- तो कदाचित सांगणारसुद्धा नाही कोणाला.. पण त्याच्याकडे असेल तो ‘सुचण्याचा’ पुरस्कार- जो कधीच विकत घेता येणार नाही.
योगायोग घडू देण्यासाठी दारं-खिडक्या उघडय़ा ठेवायला हव्यात. कुठलातरी दूरदेशीचा पक्षी येऊन अलगद बसणार असेल तुमच्या खांद्यावर.. कुणी सांगावं, पुढे जाऊन तो पक्षीच ओळख होईल तुमची. योगायोगांचे असे पक्षी- ज्याचे ‘पंख परदेशी, तरी ओळखीचे डोळे’ आहेत- तो ओळखणं फार महत्त्वाचं आहे. आपण पंखच मोजत बसतो सारखे.. पण डोळ्यांत बघायचं राहून जातं. आणि मग ते ‘ओळखीचे डोळे’ आपल्याला न भेटताच मिटतात.
आम्हा संगीतातल्या मंडळींना ध्वनिमुद्रणाच्या, कार्यक्रमांच्या निमित्ताने असे खूप ‘ओळखीचे डोळे’ भेटतात. तेव्हा साधारणत: तीन मिनिटांत मैत्री होते.. कायमची. कारण मूळात जो सुरांत परब्रह्म शोधतो त्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप अगदी एकसारखा असतो. त्याला बाकी कोणतीही विभागणी नाही. अगदी देवळात पेटीची साथ करणारा असो अथवा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा संगीतकार.. सगळ्यांच्या अंगात तेच रक्त.. आणि सगळ्यांच्या हृदयाची तीच लय. ध्वनिमुद्रणाच्या वेळी एखादं गाणं घडताना कवी, संगीतकार, संगीत संयोजक, वादक यांची झालेली नजरानजर म्हणजे एक स्वतंत्र ‘गाणं’ असतं!! ते गाणं फक्त त्यांनाच ऐकू येतं. आणि म्हातारपणी जेव्हा ही मंडळी शून्यात बघताना दिसतात तेव्हा त्यांना ऐकू येतात ती त्या क्षणांची गाणी आणि रसिकांच्या टाळ्या!
करोडो मैल दूर असलेल्या एका माणसाला तुम्ही तुमच्या घरात बसून लिहिलेली एखादी ओळ, संगीतबद्ध केलेली एखादी रचना झपाटून टाकते तेव्हा जाणवतं, की हा एक वेगळा सॅटेलाइट आहे. कुठल्या अवकाशात? ठाऊक नाही! आपण कोणाविषयी बोलताना तोच माणूस अचानक समोर आल्यास ‘शंभर र्वष आयुष्य आहे!’ म्हणतो, तोच हा सॅटेलाइट. सुरांचं जाळं, शब्दांची झेप इतकी दूर कशी जाते? नेमकी एखाद्या माणसाच्या हृदयाची तार कशी छेडली जाते?.. या सगळ्या त्या वेगळ्या आकाशाच्या गोष्टी!
तिथे गट नाहीत. प्रदेश नाहीत. कुठली कुठली म्हणून विभागणी नाही.. भाषेची, प्रांताची. तिथे भाषा डोळ्यांची, स्पर्शाची आणि संगीताची. तिथे सगळेच दाद देऊन शुद्ध झालेली मंडळी. कोणाला कोणाच्या यशाचा त्रास नाही. कोणाच्याही कौतुकाला स्वार्थाचा वास नाही. असं आकाश असणार.. किंबहुना आहेच. जिथे लहान मुलांसारखे निरागस दिसताहेत सगळ्या मोठय़ांचे चेहरे. जिथे कोणालाही दुसऱ्याची ‘खुर्ची’च काय, पण श्रेयाचा तुकडासुद्धा ओढून घ्यावासा वाटत नाहीये. जिथे चलन आहे विश्वासाचं. देवाणघेवाण आहे विचारांची. चढाओढ आहे- की किती जास्तीत जास्त ‘चांगलं’ बघू शकतो, ऐकू शकतो, बोलू शकतो एका जन्मात!!
कदाचित इथल्या कोलाहलाला कंटाळून आपल्यातून निघून गेलेली मंडळी तिथे निवांतपणे बसली असतील. हार्मोनियम, गिटार, पियानो घेऊन बसलेले मदनमोहन, जयदेवजी, सलील चौधरी, पंचमदा असतील.. पलीकडच्या उद्यानात पु. ल. आणि सुनीताबाई पुन्हा एकदा बोरकर आणि विंदांच्या कविता वाचत असतील. माडगूळकर, बाबुजी एखादं सुंदर नवीन गाणं करत असतील. सगळी फुलं हसत असतील. त्या आकाशात आपापली लाडकी माणसं पुन्हा भेटतील. शांताबाई शेळके भेटतील. सुधीर मोघे भेटतील. सुरेश भटांच्या गझलांची मैफील रंगली असेल. एखाद्या झाडाखाली बसलेले ग्रेस दिसतील..
त्या आकाशापलीकडल्या आकाशात तुम्ही ते पाहू शकता- जे तुमच्या मनात साठलंय.. जी माणसं तुमच्या मनात राहतात ती भेटतील. ऐकू येतील त्यांचे आवाज. फक्त हृदयाचे कान करा तुमच्या.. डोळे मिटा.. लांब श्वास घ्या आणि अनुभवा..
आकाश के उस पार भी आकाश है।
saleel_kulkarni@yahoo.co.in
(समाप्त)