शाळेमध्ये इतिहास शिकवणाऱ्यांकडून ‘इतिहास’ या शब्दाची फोड ‘इति अधिक ह अधिक आस’ अशी सांगितली गेल्याची व त्याचा तपशिलात्मक अर्थ ‘हे असे घडले..’ असा सांगितला गेल्याचे स्मरत असेल कदाचित अनेकांना. ज्यांना शाळेनंतरही इतिहास हा विषय होता व ज्यांनी त्यातच पुढे काही केले आहे त्यांच्यासाठी हा विषय व या विषयाचा परीघ तसा नवा नाही. इतिहास म्हणजे नेमके काय, तो कसा लिहावा, तो कसा पाहावा, तो लिहिताना/ पाहताना कोणती पथ्ये पाळावीत, वगैरे गोष्टी अ‍ॅकॅडमिक पद्धतीने माहिती असतातच या लोकांना. एक ठाशीव अशी नजर तयार होते त्यांची या विषयाकडे पाहण्याची.

जे लोक अ‍ॅकॅडमिक पद्धतीने या विषयाकडे वळलेले नसतात त्यांचे काय? तर बऱ्याचजणांच्या दृष्टीने इतिहास म्हणजे निव्वळ सनावळ्यांची जंत्री, कुठल्या राजाने कुठल्या राज्यावर कधी स्वारी केली, त्यात तो जिंकला की हरला, जिंकण्यामागील वा हरण्यामागील कारणे, कुणाचा अंमल कुठल्या प्रदेशावर किती काळ होता, वगैरे वगैरे माहिती. हा काहीसा पुस्तकी इतिहास परीक्षेपुरता उपयोगी. चोख पाठांतर करून गेले, उत्तरे नीट लिहिली, गुण चांगले मिळाले, की संपला संबंध इतिहासाचा. त्यानंतर मग कुठला राजा कधी का जन्मेना.. आणि कुठली का लढाई लढेना..

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Reptiles, tigers, Reptiles news, Reptiles latest news,
विश्लेषण : वाघांइतकेच सरपटणारे प्राणीदेखील महत्त्वाचे.. पण तरीही ते दुर्लक्षित का असतात?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

इतिहासासंदर्भात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांमध्ये ढोबळमानाने दोन प्रकार आढळून येतात. पहिला म्हणजे रीतसर उपलब्ध साधनांचा उपयोग करून, पुरावे, कागदपत्रे तपासून, जाणत्यांशी चर्चा करून लिहिला जाणारा इतिहास. अशा इतिहासावरील लेखनात संबंधित लेखक-लेखिकेस आपुले मतप्रदर्शन करण्याचा, आपला दृष्टिकोन मांडण्याचा वाव किती, ते ज्याच्या-त्याच्या मगदुरावर अवलंबून. तसेच तुलनेत या प्रकारात स्वकल्पनाविस्तारास अवसर कमी. दुसरा प्रकार म्हणजे इतिहासावर चढवलेला ललित लेखनाचा अंगरखा. इतिहासातील माहिती कच्चा माल म्हणून हाती घ्यायचा आणि त्यावर कादंबरी वा अन्य काही लेखन बेतायचे, ही या धाटणीच्या लेखनाची सर्वसामान्य रीत.

इतिहासाचा अ‍ॅकॅडमिक अभ्यास करणाऱ्यांसाठी यातील पहिले साहित्य अधिक उपयुक्त. तर बिगर अ‍ॅकॅडमिकवाल्यांमध्ये दुसऱ्या प्रकारचे साहित्य अधिक लोकप्रिय. मात्र, काहीही असले तरी दोन्ही प्रकारच्या साहित्यामध्ये एक वैशिष्टय़ सारखेच. ते म्हणजे त्याबाबत आपल्याकडील एकंदर जनमानसात विचारांपेक्षा भावनांना अनुसरून विचार करणारी संवेदनशीलता. आणि मग त्या अनुषंगाने उद्भवणारे वादाचे मुद्दे. याचे एक प्रमुख कारण- वर्तमानापेक्षा इतिहासात सोयीस्कररीत्या रमण्याची आपली रीत, हे.

‘ज्या समाजाला इतिहासाचे भान नसते त्याचा भविष्यकाळ काही खरा नसतो..’ अशा आशयाचा सुविचार आपल्याला खूपच प्रिय. पण त्यात वर्तमानाचे काय होत आहे? तर ते असो..

नमनाला पाव- अर्धा घडा इतिहासाचे तेल घालण्याचे कारण म्हणजे याच इतिहासलेखनाबद्दल सध्या होत असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप. हे आरोप-प्रत्यारोप केवळ सत्ताधारी विरुद्ध विरोधक एवढय़ाच ढोबळमानाने घेता कामा नयेत. तर अनेक गट-तट त्यावरून पडत आहेत. एकमेकांविरोधात उभे ठाकत आहेत. इतिहास बदलला जात आहे.. इतिहास पुसला जात आहे.. इतिहासाचा विपर्यास होत आहे.. नको त्या गोष्टींचे त्यातून उदात्तीकरण होत आहे.. आदी त्यातील काही प्रमुख आक्षेप. हे असे साधार आक्षेप घेण्याचा हक्क कुणालाही. हे आक्षेप अभ्यासवृत्तीपर्यंत मर्यादित असतील, विचार मंडन-खंडन प्रक्रियेपर्यंत मर्यादित असतील तर त्यास कुणी बोल लावण्याचे कारण नाही. पण जेव्हा इतिहासाच्या मुद्दय़ावरून लोक गुद्दय़ावर येतात, एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल जाऊ  लागते तेव्हा अशा गोष्टींची गंभीर दखल घेणे भाग पडते. ती घेताना एका गोष्टीचे भान प्रत्येकानेच बाळगावे असे वाटते. ते म्हणजे- इतिहासलेखन नि:पक्ष असते.. म्हणजे असावे- या अपेक्षेच्या पूर्तीची स्थिती. एका अर्थाने इतिहासलेखन हे १०० टक्के नि:पक्ष असणे कमालीचे अवघड आहे. त्याचवेळी ‘इतिहास हा नेहमी जेत्यांचाच असतो!’ ही धारणा सद्य:काळी लागू होऊ  शकत नाही, याचीही जाणीव ठेवायला हवी सगळ्यांनी. शिक्षण, साधनसामग्री या गोष्टी ठरावीक चौकटीपुरत्याच, ठरावीक समाजघटकांपुरत्याच उपलब्ध असण्याच्या आधीच्या काळात ही धारणा लागू होती, हे खरेच. मात्र, आता स्थिती बदललेली आहे. या बदललेल्या स्थितीत इतिहासाचा अभ्यास, त्याची मांडणी या गोष्टी हाताळणे सोपे झालेले आहे. अशा स्थितीत गरज आहे ती इतिहासाबाबतच्या आपल्या हुळहुळ्या दृष्टिकोनाबद्दल फेरविचार करण्याची. आणि अर्थातच इतिहासलेखनाला आपण काय प्रतिक्रिया देत आहोत, याचे भान बाळगण्याची.

इतिहास हा केवळ जेत्यांचा नसावा.. खरे तर तो कुठल्याही एका गटा-तटाचा नसावा, तर ‘समस्तां’चा असावा, ही झाली आदर्शवादी अपेक्षा. पण कुठलेच सत्ताधारी इतक्या आदर्शवादी मार्गावरून चालणारे नसतात. निदान आपल्याकडे तरी तसे सत्ताधारी आढळत नाहीत. हरएक सत्ताधाऱ्यांची त्यांची त्यांची अशी ‘समस्त’ या शब्दाची व्याख्या असतेच. आणि येथे सत्ताधारी म्हणजे केवळ राजकीय अर्थाने सत्तेत असलेले असे नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या साऱ्याच क्षेत्रांतील सत्ताधारी- असे बघायला हवे. तर हे असे जेते त्यांचा त्यांचा, त्यांच्या सोयीचा इतिहास लिहिणारच, हे ओघाने आलेच. आणि असा इतिहास नि:पक्ष असूच शकत नाही, ही बाब चूक, हे नि:संशय खरे. मात्र, ते वर्तमान आहेच. हे  कसे नाकारणार? त्यावर उपाय काय? तर जेत्यांचे मतपरिवर्तन होईल, ते अगदी सत्यवचनी वागू लागतील, असल्या अपेक्षा बाळगण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे गरज आहे ती जो इतिहास आपल्याला विपर्यस्त, अयोग्य, सहेतूक वाटतो आहे त्या मांडणीविरोधात लढण्याची. हा लढा कसा देणार? तर केवळ ‘तुमचा इतिहास खोटा आहे.. तुमचा इतिहास विपर्यस्त आहे..’ असा निव्वळ ओरडा करून उपयोगाचा नाही. त्या ओरडय़ासोबतच जो इतिहास सच्चा आहे, अर्थपूर्ण आहे असे वाटते तोही ठासून मांडण्याची नितांत आवश्यकता आहे. तो तसा मांडण्यात आक्रमकता येणे हे अगदीच साहजिक व स्वीकारार्ह. मात्र, आक्रमकता व आततायीपणा यांतील पुसट सीमारेषेचे भान ठेवणेही तेवढेच आवश्यक.

पुन्हा एकदा इतिहासाच्या नि:पक्षतेचा मुद्दा.. कितीही काहीही म्हटले तरी इतिहासाचे लेखन अगदी १०० टक्के नि:पक्ष होणे फारच कठीण. कारण इतिहासाकडे बघण्याचा, त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रत्येकाचा स्वत:चा असा चष्मा कितीही नाही म्हटले तरी असणारच. इतिहास म्हणजे काही निर्जीव गोष्ट नव्हे. इतिहास म्हणजे अपौरुषेय शब्द नव्हेत. त्यामुळे त्यातील स्पंदने कुणाला कशी जाणवतील, हे सांगणे तसे कठीण. इतिहास लिहिणाऱ्यांचा इतिहास व वर्तमान यावरही त्याला जाणवणारी स्पंदने अवलंबून राहणार. लिहिणारा लिहिणार व वाचणारा पुन्हा ते स्वत:चा चष्मा लावून वाचणार. यात मतभेदांचे प्रसंग येणे अगदीच साहजिक. त्यास आक्षेप घेण्याचेही कारण नाही. फक्त ते आक्षेप कसे नोंदवायचे, यावर विवेकाने विचार करणे निकडीचे. तसेच नव्याने उपलब्ध होत जाणारे पुरावे, माहिती यांच्या आधारावर इतिहास बदलू शकतो, त्याचा वेगळा अर्थ निघू शकतो, याचे भान सगळ्यांनीच ठेवणे खूप गरजेचे. अन्यथा स्वत:ला योग्य वाटतो त्या इतिहासाचे घोडे दामटवून रक्तलांच्छित संघर्ष घडविण्यात आल्याची उदाहरणे आपल्याकडे कमी नाहीत.

अशा प्रकारांनी इतिहासाचे काहीही बुरे होणार नाही. बुरे होईल ते आपल्या वर्तमानाचे. ते आपण का होऊ  द्यायचे?

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com