कवी केशवसुत हे कोकणातल्या मालगुंडचे. ‘एक तुतारी द्या मज आणुनि..’ सांगणारे. केशवसुतांच्या कोकणातून राज्यराणी एक्स्प्रेस नामक गाडी धावायची. म्हणजे आताही धावतेच ती. पण त्या गाडीचे नाव बदलले आहे. ‘तुतारी एक्स्प्रेस’ हे या गाडीचे नवीन नाव. रेल्वे खात्याने गाडीला दिलेले हे नवे नाव म्हणजे कवी केशवसुत यांची आठवण ठेवण्याची एक चांगली रीत. या नामकरणावरून कुठला मोठा वाद झाला नाही आणि त्यास नको ते संदर्भ लगडून मूळ हेतूची गाडी भलत्याच रुळांवर गेली नाही, हे नशीबच म्हणायचे आत्ताच्या काळात. अन्यथा, ‘मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे..’ असे बजावणाऱ्या केशवसुतांच्या स्मृतींचाच अपमान झाला असता. केशवसुतांची महती मराठी कवितेसाठी, मराठी वाचकांसाठी आहेच. त्यामुळे त्यांची या प्रकारे आठवण ठेवणे, आठवण काढणे ही त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची छान पद्धत.

कुणी आरोप करतील यावर भाबडय़ा रोमँटिसिझमचा. तर ज्यांना करायचा त्यांना तो खुशाल करू देत. केशवसुत आणि त्यांची कविता आजच्या काळाला किती लागू होतात, असा प्रश्न विचारतील काहीजण. तर तो प्रश्न सोडून देण्यासारखा नाही. त्यापासून मान वळवावी, यालाही काही अर्थ नाही. त्या प्रश्नाच्या डोळ्याला डोळा भिडवायलाच हवा. उत्तर शोधायलाच हवे. या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी त्यातील एक भावना- जिला ‘कृतज्ञता’ म्हणतात- ती आहेच ना. ही कृतज्ञता का? तर कुठलेही साहित्य हे त्या अर्थाने आकाशातून पडत नसते. साहित्याची जडणघडण, त्याचा विकास याला कुठेतरी भूतकाळातील चिऱ्यांचा आधार असतोच असतो. त्या अर्थाने साहित्य हे नि:संदर्भ नसते. वर्तमानासोबतच भूतकाळातील साहित्याचे दृश्य-अदृश्य संदर्भ त्याला कमी-अधिक प्रमाणात असतातच. या भूतकाळातील संदर्भ जसेच्या तसे स्वीकारावेत, त्यापुढे विचार न करता नतमस्तक व्हावे असे मुळीच नाही. पण निदान त्याच्या अस्तित्वाची तरी जाणीव ठेवायला हवी. हीच ती कृतज्ञता.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

प्रश्न असा आहे की, ही कृतज्ञता निव्वळ व्यक्त करून आपण थांबतो का? म्हणजे- केली कृतज्ञता व्यक्त.. आता आम्ही आमचे मोकळे, असा भाव असतो का आपला? तर आपल्याकडे एकुणात.. केवळ साहित्यातच नव्हे, तर सगळ्याच क्षेत्रांत हा भाव भरपूर. कारण या धाटणीची कृतज्ञता व्यक्त करणे, आदल्यांची आठवण काढणे सोपे असते. प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांचा अक्राळविक्राळ रगाडा चोहोबाजूंनी दाटलेला असताना तर ही पद्धत खूपच सोपी. कसे?

तर कोकणातून धावणाऱ्या गाडीला केशवसुतांचे नाव दिले ही चांगलीच गोष्ट.. पण नाव देऊन झाले की संपली आपली जबाबदारी. त्यांच्या साहित्याचा, त्यांच्या कर्तृत्वाचा योग्य तो सन्मान झाला करून- असे मानून आपण मोकळे होतो आणि यापुढे कुठल्या गाडीला कुठल्या साहित्यिकाचे नाव देणे चपखल ठरेल, याचा विचार करायला लागतो.

आपल्या या सवयीला, वृत्तीला नेमके काय म्हणायचे?

आपली ही वृत्ती स्मारके बांधण्यात खूप रस घेणारी. कारण एकतर स्मारके हा विषय लोकांच्या एकदम जिव्हाळ्याचा. भावनांशी संबंधित असा. स्मारके बांधली की ज्याचे किंवा जिचे स्मारक बांधले त्याच्या किंवा तिच्या ऋणांतून मुक्त झालो एकदाचे, अशी आपली लोकभावना. हे सारे खूपच सोपे. कारण यात फार विचार करावा लागत नाही. आणि डोके हा अवयव विचार करण्यापेक्षा कशाच्यातरी पुढय़ात टेकवणे आपल्याला अधिक आवडते, अशी एकंदर परिस्थिती. ज्या व्यक्तीचे स्मारक बांधायचे त्याच्या नावाचा जयघोष करायचा, त्याच्या पराक्रमाच्या कथा गायच्या, त्याच्याभोवती आरत्या ओवाळायच्या, एखादा पुरस्कार द्यायचा त्याच्या नावाने, त्याची जयंती-पुण्यतिथी साजरी करायची, वृत्तपत्रांत अमक्याढमक्याच्या स्मृतींना अभिवादन असे म्हणणाऱ्या मोठमोठय़ा जाहिराती द्यायच्या, समाजमाध्यमांवर त्याच्या आठवणींचे उमाळे काढायचे, ही साधारणत: आपली स्मृती जागवण्याची रीत. यातून काय साध्य होणार? फार काही नाही. भाबडय़ा मनांना समाधान आणि बेरकी मनांना कावेबाज आनंद. हे समाधान आणि कावेबाज आनंदही अल्पजीवीच. तो संपला की नव्या नावाची, स्मारकाची शोधाधोध सुरू करणे आलेच.

ते टाळण्यासाठी काय करायला हवे?

तर, अशा आठवणी काढण्यामागील, स्मारके उभारण्यामागील हेतू नीट पारखून, तपासून घ्यायला हवेत. आणि ते हेतू जर योग्य नसतील तर दुरूस्त करायला हवेत. अधुरे असतील तर पूर्ण करण्यासाठी पावले उचलायला हवीत. साहित्याबाबत बोलायचे तर लेखक-कवींचे नाव रेल्वेगाडीला देणे, त्यांचे स्मारक उभारणे ही पावले योग्य, आवश्यकच; पण पुरेशी नाहीत.. अंतिम नाहीत. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचे तर एखाद्या लेखक-कवीचे उत्तम स्मारक उभारल्याची उदाहरणे अत्यंत विरळाच. ज्या केशवसुतांचे नाव रेल्वेगाडीला देण्यात आले त्या केशवसुतांचे स्मारक त्यांचे जन्मगाव मालगुंड येथे आहे. ते उभारण्यामागे संबंधितांनी परिश्रम घेतल्याचे दिसते. पण त्याचे स्वरूप, विस्तार हा आणखी मोठा असायला हवा. येथे प्रश्न पैशांचा येतो. तो सोडवला जाईल अशी यथास्थित यंत्रणा वाचकांच्या, समाजाच्या पातळीवर नाही. अशावेळी सरकारी मदतीचा आधार घेणे आलेच. त्याखेरीज सध्या तरी चांगला पर्याय दिसत नाही.

स्मारकांच्या स्वरूपाबाबतही आपल्याकडे काही चौकटबद्ध संकल्पना आहेत. संबंधित लेखक-कवीची छायाचित्रे, त्यांच्या वापरातील गोष्टी, त्यांची काही हस्तलिखिते उपलब्ध असल्यास ती अशी सामग्री गोळा करून नीटस पद्धतीने मांडली की झाले स्मारक तयार! मग वाचक, पर्यटक येतील, स्मारक पाहतील. स्मरणरंजनात रमतील. सेल्फी काढून घेतील. छायाचित्रे काढून घेतील आणि जातील. जाताना मोबाइलमधील वा कॅमेऱ्यातील छायाचित्रांपलीकडे त्यांनी काही सोबत घेऊन जायला हवे यावर फारसा विचार होताना दिसत नाही. स्मारकात येऊन लेखक-कवीची आठवण ओघाने होणारच. खरे तर आठवण काढण्यासाठीच लोक स्मारकात जाणार. पण निव्वळ आठवणींच्या तिठय़ावर थांबून चालायचे नाही. त्यापलीकडेही जायला हवे ना. हे पलीकडे जायचे म्हणजे काय करायचे?

अगदी साधी आणि मूलभूत गोष्ट म्हणजे स्मारकाच्या ठिकाणी, ज्या लेखक-कवीचे स्मारक आहे, त्याचे समग्र साहित्य विक्रीसाठी उपलब्ध असायला हवे. साहित्यिकाचे पेन, दौत, टाक, त्याची रोजच्या वापरातील खुर्ची, टेबल या गोष्टींपेक्षा त्याची पुस्तके अधिक महत्त्वाची. आणि ती उपलब्ध व्हायला हवीत सहजपणे. केवळ त्याचीच नव्हे, तर त्याच्या साहित्यावर साधकबाधक चर्चा करणारी, समीक्षात्मक पुस्तके स्मारकात उपलब्ध व्हायला हवीत. संबंधित साहित्यिकाच्या साहित्याचा प्रसार, प्रचार होईल यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून अगदी कमी खर्चातही तसा प्रसार, प्रचार करणे शक्य आहे. स्मारकास भेट देणाऱ्यांना तो लेखक-कवी जास्तीत जास्त कसा आकळून सांगता येईल याचा विचार व्हायला हवा. स्मारक बघून परत निघणाऱ्याला आपल्या हाती स्मरणरंजनापलीकडे काही पडले आहे असे वाटायला हवे. हे असे झाले तरच स्मारकांचा हेतू खऱ्या अर्थाने साध्य होईल.

आणि हे फार अशक्यकोटीतील काम आहे असे नव्हे. अशा गोष्टींसाठी पैसा लागेल.. लागतोच, हे अगदी खरे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे ती इच्छाशक्ती आणि किंचित कल्पकता. त्याचा वाटतो तेवढा तोटा आपल्याकडे नाही. मग जे काही आहे त्याचा उपयोग करून घेण्यात मागेपुढे कशाला पाहायचे?

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com