‘निवडक मंगला गोडबोले’या वंदना बोकील-कुलकर्णी संपादित पुस्तकाचं प्रकाशन २ एप्रिलला होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश..
सध्याची आपली ‘भेसळयुक्त’ भाषा..
सध्याची आपली माध्यमग्रस्तता..
सध्याची आपली शिक्षण (अ)व्यवस्था..
सध्याची आपली पालकनीती (?)..
थोडक्यात.. तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष..
खेळकर शैलीतील मिस्कील भाष्य.. आणि मार्मिक निरीक्षणं.. म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन!
सभोवतालच्या जगण्याकडे संवेदनशीलतेने पाहण्याच्या आणि ते जगणे स्पंजप्रमाणे टिपून घेण्याच्या मानसिक घडणीमुळे, मंगलाबाईंना सतत नवनवे विषय सापडत गेले. उत्स्फूर्त विनोद सुचत गेले. वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत गेला. त्यामुळे गेल्या चार दशकांतील मध्यमवर्गीय शहरी समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांतील विस्मयकारी बदल, विविध चळवळी आणि त्यांचे कमीअधिक प्रभाव, राजकीय सत्ताबदलाची नाटय़े, माध्यमक्रांती, शिक्षणाचा सर्वस्तरीय खेळखंडोबा, माणसाच्या दैनंदिनीवरचे टी.व्ही. वाहिन्यांचे अतिक्रमण, भाषेविषयीची सार्वत्रिक अनास्था, बदलत्या तरुणाईची चमत्कारिक फॅडं.. इत्यादींची दखल घेत, त्यांमधील विसंगती हेरत, व्यंग टिपत, हास्यास्पद गोष्टींचं हास्यकारकतेत रूपांतर करत त्यांचं विनोदी लेखन निर्माण झालं आहे. सातत्यानं विनोदी लेखन करणं, त्याला साहित्याचा आणि कलात्मकतेचा दर्जा मिळवून देणं आणि तो टिकवून ठेवणं, ही तारेवरची कसरत आहे. भल्याभल्यांना विनोदाच्या निसरडय़ा वाटेवरून तोल सांभाळणं कठीण गेलं आहे. गेली ३५ वर्षे सातत्याने मंगलाबाई ही कसरत करत आल्या आहेत. ‘वाचकांना घटकाभर आनंद द्यावा’- एवढीच माफक अपेक्षा त्यांनी बाळगली असली तरी त्यापेक्षा अधिक वरच्या दर्जाची वाङ्मयीन गुणवत्ता त्यांच्या लेखनात आहे. विनोदवृत्तीइतकीच उत्तम मराठी भाषा आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती या अंगभूत वैशिष्टय़ांचा या गुणवत्तेशी घनिष्ठ संबंध आहे.
मंगलाबाईंचं ‘जाणतं आयुष्य गृहिणीच्या भूमिकेत गेल्यामुळे’ असेल कदाचित, पण सामान्य माणसाच्या लौकिक व्यवहाराबद्दल त्यांना कमालीची आस्था आहे. त्यामुळे लग्नसंस्था, कुटुंबव्यवस्था, सभोवतीचं स्त्रीजीवन, वृद्धांचे प्रश्न, शिक्षण-पालकत्व, करमणूक असे विषय, त्यांच्या अनेकविध पैलूंसह आणि विसंगतींसह त्यांच्या लेखनात आढळतात.
मराठी स्त्रियांच्या लेखनपरंपरेचं महत्त्वाचं वैशिष्टय़ं म्हणजे त्यांचं जगणं आणि लिहिणं यांतला अभेद! आपल्या अनुभवविश्वाशी प्रामाणिक राहून लेखन करण्याची लेखिकांची वृत्ती अगदी सुरुवातीपासून दिसते. मंगलाबाईही याच परंपरेतल्या. म्हणूनच ‘बायकांच्या लेखनाला भाजी-आमटीचा वास अंमळ जास्तच येतो,’ अशी टीका करणाऱ्या समीक्षालेखाला उत्तर म्हणून त्या लिहितात, ‘‘..आमची भाजी-आमटी कसली पॉवरबाज आहे, ते बघा ना! वास फक्त त्या त्या पातेल्यापुरता, ओटय़ापुरता, स्वयंपाकघरापुरता रहात नाही. डायरेक्ट लिहिलेल्या कागदावर उतरून सर्वदूर पसरतो. तेव्हा आम्हास लेखन जमत नसले तरी स्वयंपाक जमतो. तो काय ती उंची-खोली-टोक इत्यादी गाठू शकतो. हे ‘इतुके’ यश आम्हास रगड! माझ्या मना, बन (ओटय़ाचा किंवा पाटय़ावरवंटय़ाचा ) दगड!’’.. यातला रूढ समीक्षकी भाषेचा व तिच्यातील तुच्छतेचा सूक्ष्म उपहास मार्मिक आहे. पुरुषांच्या लेखनाला बिडी-काडीचा, दारूचा, तंबाखूचा, इ. वास येतोच.. या छापाच्या बालिश त्राग्याचा त्यात लवलेशही नाही.
उपहास, उपरोध, विडंबन, इ. सर्वच विनोदप्रकारांमागे सहसा व्यंग दुरुस्तीचा, सुधारणेचा हेतू असतो. मंगलाबाईंचे अनेक लेख असं दोषदिग्दर्शनाचं काम करतात. त्यांच्या विनोदात उपहासगर्भता आहे, पण तो जळजळीत नाही.
पुस्तकं वाचायला नेणारे आणि परत न करणारे, स्वत:ला अतिउच्च अभिरुचीचे ठेकेदार समजणारे, मुले दहावी-बारावीत गेली की अंगात येणारे, जाहिराती-मालिका बनवणारे आणि त्यांना शिव्याशाप देत का होईना पण त्या बघणारे, हौसेनं फोटो काढून घेणारे आणि त्यांचे प्रदर्शन मांडणारे, भेसळयुक्त भाषा बोलणारे आणि तरी मातृभाषेच्या नावाने गळे काढणारे.. इत्यादी सर्व आपणच असतो; सामान्य, शहरी मध्यमवर्गीय. अशा शहरी मध्यमवर्गीयाला कधी चिमटे घेत, कधी गुदगुल्या करत, कधी टपली मारत तर कधी सरळ ठणकावून सांगत त्यांचा विनोद त्याच्या जगण्यातील विसंगती दाखवत असतो. त्यात कुठे खवचटपणा, कुजकेपणा नावालाही नसतो. विनोदात इतरेजनांविषयीची तुच्छता मिसळली की तो बोचरा होतो. उलट त्याला सहानुभूतीचं अस्तर लाभलं की तो प्रसन्न होतो. मंगलाबाईंचा विनोद बहुश: सहानुभूतीपूर्ण आहे. म्हणूनच तो प्रसन्न आहे.
समकालीन सामाजिक संदर्भ हा त्यांच्या सर्वच लेखनाला क्रियाशील आणि गतिमान ठेवणारा घटक आहे. ‘बा’ जगाचं मोठं एक्स्पोजर नसतानाही डोळ्यांच्या-कानांच्या-मनाच्या सगळ्या अ‍ॅन्टेना ताठ उभ्या असल्यामुळेच त्या समकालीन जगण्यातली अनेक विरोधी-विसंगत चित्रं टिपू शकल्या आहेत. ‘देशी अ‍ॅरनला देशी आईचं पत्र’ हे त्याचंच उदाहरण! आजूबाजूच्या परिस्थितीचा वैताग, वैफल्य, हतबलता यांवर मात करण्याचा, विनोदकर्तीनं निवडलेला हा सर्वात अहिंसक आणि सुरक्षित मार्ग!
तीव्र संवेदनशीलतेमुळे आणि सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनामुळे त्यांनी अनेक क्षेत्रांतील विरोध-विसंगतींवर नेमके शब्दसंधान केले आहे.
ते करताना त्या त्या क्षेत्राची परिभाषा समर्पकपणे योजली आहे. मोबाइल तंत्रज्ञानाची, मेकॅनिकल इंजिनीअरिंगची, मॅनेजमेंटची, फॅशन डिझायनिंगची.. कितीतरी! तंत्रक्रांतीचे आघाडीचे वीर त्यांना ठाऊक आहेत. तरुणांच्या भाषेतील अनाकलनीय शॉर्टफॉर्म त्यांना आकलन होतात. जाहिरात बनवणं असो वा टुरिस्ट कंपनीने आयोजित केलेली टूर असो.. तिथलं वातावरण त्या नेमक्या तपशिलांसह उभं करतात. त्यांचा विनोद त्या वातावरणाशी, त्या अनुभवाशी एकवटून प्रकटतो. त्यामुळे तो सुटा/एकटा पडत नाही. आणि हे करीत असताना त्या कुठेही शारीर व्यंगाचा, वैगुण्याचा वापर विनोदनिर्मितीसाठी करत नाहीत. त्यामुळे वास्तवातील वा कल्पनेतील विशिष्ट व्यक्तींची अर्कचित्रं, असं त्यांच्या विनोदी लेखांचं स्वरूप रहात नाही. तो समूहातील कुणाचाही होऊ शकतो. कुणाचीच व्यक्तिगत टवाळी वा खिल्ली त्यात नाही, पण म्हटलं तर साऱ्या समूहाची आहे. या समूहात लेखिका स्वत:ही सामील आहे. एक घटक म्हणून सहभागी आहे. स्वत:ला वेगळं ठेवून किंवा वाचकापेक्षा श्रेष्ठ समजून ती हे लिहीत नाही.
मंगलाबाईंच्या विनोदी कथा काटेकोर रचनाबंध नसूनही कथानकाचे भान बाळगतात. पण त्यातील विनोदात्मता अधिक लक्षवेधी आहे. सामान्य माणसाच्या साध्या-सरळ जगण्याला ठायीठायी छेद देणारे प्रसंग, त्यामध्ये अडकलेली पात्रं.. त्यांच्या उक्ती-कृती यांमधून त्यांच्या कथेत विनोद अवतरला आहे.
मुक्तपणे वागावे-बोलावे-व्यक्त व्हावे, असे स्वाभाविकपणे माणसाला वाटत असते. बंधनांचा, नियमांचा काच कुणालाही जाचकच वाटतो. पण समाजात राहताना विविध दडपणं, रूढी, नियम, संस्कार.. इतकेच नव्हे तर मूल्यकल्पनांमुळेही मुक्तपणे व्यक्त होता येत नाही. ठरावीक आचारांचे आणि विचारपद्धतीचेही बंधन नकळत पडत असते. विनोदवृत्ती अशा दडपणांची, बंधनांची पर्वा न करता उत्स्फूर्तपणे प्रकटते. घरात सासू/नवरा, रस्त्यावर पोलीस, शाळेत शिक्षक, ऑफिसात बॉस इत्यादी सत्ताकेंद्रांविषयी सामान्य माणसाला राग असतो, असूया असते. अशा सत्तास्थानांची टिंगलटवाळी करण्यातून ताण हलके होतात. प्रत्यक्षात जे व्हावे अशी सूप्त इच्छा असते. पण जे साधता येत नाही, ते विनोदाच्या आवरणातून शक्य होते. त्यांची व्यंगचित्रे मग मनमुराद आनंद देतात.
एकूणच विनोदकाराची वृत्ती कशी आहे, यावरून त्याच्या विनोदाची पातळी ठरते. मारा, हाणा, ठोका.. अशी आक्रमकता मंगलाबाईंच्या लेखनस्वभावात नाही. ओचकारे-बोचकारे, वार-प्रहार, विनोदाचा शस्त्र म्हणून वापर.. असले हिंसक प्रकार नाहीत. अनेक पुरुष विनोदकारांसारखे मानसकन्या/पुत्र यांचा आधार त्यांना लागलेला नाही. आपल्या विनोदाला कारुण्याची किनार वगैरे लावण्याच्या भानगडीत त्या पडलेल्या नाहीत. ‘विषाद वाटणे, पापण्यांचे काठ ओलावणे..’ यांमुळे तो झाकोळत नाही.
सुखद जाणिवेची -डिव्हाइन कॉमेडीची – प्रतीती देणारा मंगलाबाईंचा विनोद हव्याशा वाटणाऱ्या झुळूकीसारखा आहे. ताजा आणि अनपेक्षित आनंद देणारा! उत्तरोत्तर बहरत गेलेला!