जुन्या जमान्यातील लाकडी छत असलेल्या घरांमधील एक मोठी खोली; तिच्या समोरच्या बाजूस या खोलीचे वास्तव संपते तिथे.. पुढच्या बाजूस एक वेगळाच आभास निर्माण केलेला.. नदी किंवा तळ्याकाठी असलेल्या घरातून तलावात उतरणाऱ्या लाकडी पायऱ्या. म्हणजे क्षणभर असे वाटावे की, आपण त्या घराच्या खालच्या बाजूसच बसलेले आहोत, मग्न तळ्याकाठी. खरे तर ती जुन्या घरातील खोली खरी आहे, तिचे दिसणारे लाकडी छतही खरे आहे. पण समोर दिसणारे मग्न तळ्याकाठचे ते दृश्य हे मात्र केवळ आभास आहे हे क्षणभरातच लक्षात येते. पण त्या आभासाचा परिप्रेक्ष (पस्प्रेक्टिव्ह) आणि वास्तवाचा तो तुकडा नेमका जुळत असतो; किंबहुना त्यामुळेच तो वास्तवाभास निर्माण होतो.

अशी एक नव्हे अनेक छायाचित्रे आपल्यासमोर असतात. दुसऱ्या एका छायाचित्रात लाकूड आणि पत्रे यांच्या माध्यमातून साकारलेले एक बठे घर आणि त्याच्या बरोबर मध्यभागी नेमके बसेल असे निसर्गदृश्य दिसते. जंगलाच्या हिरवाईतून दूर जाणारी वाट.. क्षणभर वाटावे की घराच्या दरवाजातूनच दिसणारे हे दृश्य आहे. एका घराचा काहीसा पडका भाग आणि पलीकडे पडक्या भागातून दिसणारे निसर्गदृश्य. एक दृश्य या सर्वावर कडी करणारे आहे. निसर्गातून धबधब्यासारखा वाहत येणारा प्रवाह.. फरक इतकाच की, तिथे पाण्याच्या जागी आपल्याला त्याचा प्रवाह भासमान होईल, अशा पद्धतीने प्लास्टिक दिसते. हा प्लास्टिकचा धबधबा कशासाठी, असा प्रश्नही मनात येतो.

ही मांडणीशिल्पात्मक छायाचित्रे आहेत नोएमी गौदाल हिची. नोएमीच्या यापूर्वीच्या कलाकृती पाहिल्या की, आपल्याला त्यातील अंत:सूत्र लक्षात येते. तिच्या कलाकृती वास्तव आणि आभास याच्या सीमेलाच भीडतात आणि अनेक प्रश्न विचारतात. हे प्रश्न काहीसे व्यामिश्र स्वरूपाचे असतात. म्हणजे धबधब्याच्या ठिकाणी असलेले प्लास्टिक आपल्याला वाढत चाललेल्या प्लास्टिकच्या वापराबरोबरच; त्या वापरातील खोटेपणाही सांगण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर निसर्गातील पाण्याऐवजी त्याच रूपाकारातील प्लास्टिक क्षणभर वेधक वाटले तरी ते प्रत्यक्ष पाण्याला कधीच पर्याय ठरू शकणार नाही हे सांगतानाच आता नसíगक गोष्टींना आपण दिलेले दुय्यम स्थानही ही कलाकृती अधोरेखित करते.

नसर्गिक असलेले वास्तव आणि चांगला दिसणारा मात्र कृत्रिम आभास यातील एक झगडा आपल्यासमोर समकालीन पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न नोएमी करते. नसर्गिक व कृत्रिम यांच्यातील सीमारेषा आणि त्याच वेळेस वास्तव आणि आभासी किंवा स्वप्नात्म अशा गोष्टींमधील धूसर सीमा दाखविण्याचा प्रयत्न ती करते. आपल्या जे हवे असते ते स्वप्नातील बरेच काही आपण अनेकदा वास्तवाच्या प्रतलावर आरोपित करतो आणि दिसतो तो वास्तवाभास. हाच वास्तवाभास नोएमी आपल्यासमोर उभे करते त्याच्यासोबत येणाऱ्या प्रश्नांबरोबरच.

अनेकदा हा वास्तवाभास आहे, याची आपल्याला पुरती कल्पनाही असते. पण प्रत्यक्षात वास्तव तसे  नसणे मानवी मन स्वीकारत नाही आणि मग लहान मुलाप्रमाणे आपली अवस्था होते. तो वास्तवाभास अमान्य करणे तर सोडाच उलट आपण तो जगू लागतो. म्हणूनच तिच्या काही कलाकृतींमध्ये आपल्याला मानवी मनाचा हा कंगोरा स्पष्ट करणारी लहान मुलेही दिसतात. केवळ एकच एक दिसण्याच्या किंवा दृष्टिकोनाच्या पातळीवर नव्हे तर मानवी मनाच्या कंगोऱ्यांबरोबरच विविध मानसिक पातळ्यांवरही या कलाकृती समजून घ्याव्या लागतात. शिवाय सर्व समकालीन कलाकृतींमध्ये असलेला रसिकाच्या सहभागाचा निकष याही कलाकृतींना तेवढाच लागू आहे!

विनायक परब –  @vinayakparab
vinayak.parab@expressindia.com