छानछोकीचे विषय नाकारणे हाही  बंडखोरीचा एक महत्त्वाचा भाग असतोच. नानाविध संवेदनांसह विषयाला थेट भीडणे हेही या समकालीन कलावंतांचे वैशिष्टय़च समकालीन कलावंत हे नेहमी ‘समकालीन’ म्हणजेच ते जगत असलेल्या कालखंडातीलच आजूबाजूच्या, अनेकदा न आवडणाऱ्या किंवा थेट नावडणाऱ्या अशा विषयांवर काम करताना दिसतात. छानछोकीचे विषय नाकारणे हाही त्यातील बंडखोरीचा एक महत्त्वाचा भाग असतोच. नानाविध संवेदनांसह विषयाला थेट भिडणे हेही या समकालीन कलावंतांचे वैशिष्टय़च मानायला हवे. गेल्या खेपेस ‘समकालीन’मध्ये आपण छायाचित्रणातील सुस्पष्टतेच्या मार्गात अडथळा ठरणाऱ्या आऊटफोकसचा सौंदर्यात्मक वापर समजून घेतला, तर या खेपेस आपण विषयाचे थेट भिडणे अर्थात भीषण वास्तव पाहणार आहोत. भीषण वास्तव तेवढय़ाच भयाण पद्धतीने मांडणे हेदेखील समकालीनत्वच!

शरीरविक्रय व्यवसायावर समाजामध्ये विविध मतमतांतरे ऐकायला मिळतात. हा व्यवसाय म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे इथपासून ते हा व्यवसाय आहे म्हणून समाजातील इतरांच्या आयाबहिणींची अब्रू टिकून आहे इथपर्यंत. हा व्यवसाय ही समाजाची अपरिहार्य गरज आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मते काहीही व्यक्त होत असली तरी या व्यवसायाचे वास्तव हे अनेक ठिकाणी भीषण आणि भयावह असे आहे. खास करून तिसऱ्या जगतातील देशांमध्ये तर गरिबीमुळे या व्यवसायात आलेल्यांची तसेच फसवणुकीमुळे त्यात ओढल्या गेलेल्यांची संख्या अधिक आहे. देश कोणताही असला तरी वास्तव हेच असते.

Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!
mpsc mantra environment question analysis career
mpsc मंत्र: पर्यावरण प्रश्न विश्लेषण

शरीरविक्रयाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या मुस्लीम देशांमध्ये बांगलादेशाचा समावेश होतो. तांगैल येथील कंदापारा येथील वेश्याघर हे देशातील सर्वात मोठे मानले जाते. त्याला लिखित स्वरूपाचाच सुमारे २०० वर्षांचा इतिहास आहे. सध्या इथे सुमारे ७०० महिला शरीरविक्रयाच्या व्यवसायात आहेत. त्यांच्या मालकिणींसह त्या साऱ्या जणी इथेच राहतात. २०१४ मध्ये या वस्तीवर बुलडोझर चालविण्यात आला. त्यानंतर मात्र इथे हलकल्लोळ माजला. शरीरविक्रयाला कायदेशीर मान्यता असल्याने तेही एक प्रकारचे कामच आहे. त्यामुळे त्यांना तो व्यवसाय करण्याच्या ठिकाणापासून रोखले जाऊ  शकत नाही, अशी भूमिका घेणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था बांगलादेशात पुढे आल्या. शिवाय एरवी इतर कोणताही व्यवसाय किंवा काम न करू शकणाऱ्या या महिला जाणार कुठे, असाही प्रश्न निर्माण झाला. अखेरीस बांगलादेश नॅशनल वुमन लॉयर्स असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि सरकार त्यांचे हक्काचे घर काढून घेऊ  शकत नाही, तसे करणे हे बांगलादेशातील कायद्याची पायमल्ली ठरेल, अशी भूमिका मांडली. अनेक महिलांचा जन्मच तिथे झाला होता आणि आजवरची हयातही तिथेच गेली होती. बाहेरचे जगही त्यांना माहीत नाही, अशा अवस्थेत त्या काय करणार, असा युक्तिवादही करण्यात आला. परिणामी हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि शरीरविक्रय करणाऱ्या महिला त्या वस्तीमध्ये परतल्या.

त्याच वेळेस जर्मनीतील महिला वृत्तछायाचित्रकार असलेल्या सँड्रा होय्न हिला हा विषय महत्त्वाचा वाटला. तिने कॅमेरा गळ्यात अडकवून थेट बांगलादेश गाठला. तिथे फिरताना जगातील सर्वात जुन्या मानल्या गेलेल्या या व्यवसायातील भीषण वास्तव तिच्यासमोर आले. त्याचे समोर आलेले अनेक कंगोरे हे तर समाजानेही आपापल्या नैतिकतेच्या ढाली पुन्हा तपासून पाहाव्यात असेच होते. हे सर्व कंगोरे, चेहरे आणि त्यामागचे विषण्ण करणारे भयाण वास्तव तिने छायाचित्रांतून मांडले आहे. तिची ही छायाचित्रे एक समकालीन आरसाच समाजासमोर धरतात.

इथे या वस्तीमध्ये महिलांच्याच हाती सत्ता आहे. या सत्ताधारी महिला एक अर्थाने बलशाली आहेत, त्या मालकिणी आहेत आणि दुसरीकडे हतबल महिलाही आहेत ज्यांच्याकडून मालकिणी शरीरविक्रीचा व्यवसाय करवून घेतात. समोर वाढून ठेवलेल्या आयुष्याशिवाय ज्यांच्या हाती काहीच शिल्लक नाही त्यांच्या सर्व संवेदना संपलेल्या नव्हे तर मेलेल्या आहेत.. डोळेही संवेदनाहीन झालेले. मेलेल्या भावना त्या डोळ्यांतून थेट दिसतात, नव्हे भिडतात. कुठे डोळ्यात हतबल भाव, तर कुठे आयुष्यभर अडकल्याची भावना. शरीरविक्रय करणारी महिला १८ वर्षांची असावी, असे कायदा सांगतो; पण अनेकदा गेली तीन-चार वर्षे शरीरविक्रय करणाऱ्या या मुली १८ पेक्षाही कमी वयाच्याच असतात..

बांगलादेशातील आणखी एक भयाण वास्तव हा समकालीन आरसा आपल्यासमोर आणतो. हे वास्तव तरुण मुलांशी संबंधित आहे. या वस्तीबाहेर लग्नापूर्वी शरीरसंबंध हा गुन्हा आहे किंवा सार्वजनिक ठिकाणी मुलींचा हात पकडणेही गुन्हा आहे. त्याचप्रमाणे या वस्तीबाहेर मुस्लिमांना दारूबंदी आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या महिलेसोबत चहा प्यायला बसणेही मुश्कील अशी अवस्था आहे. त्यामुळे मग इथे येणारी तरुण मुले ही काही प्रत्येक वेळेस शरीरसंबंधांसाठी नाही येत. त्यांना मुलींचा हात हातात घेऊन केवळ निपचित पडून राहायचे असते किंवा मग त्यांच्यासोबत चहाही प्यायचा असतो किंवा अनेकदा दारूही. कारण त्यांच्यासाठी ही वस्ती म्हणजे नैतिकता नसलेला खुला समाज आहे. या वस्तीच्या बाहेर एक भली मोठ्ठी भिंत कुंपण म्हणून बांधलेली आहे. नैतिकतेच्या या कुंपणाबाहेर जे जमत नाही ते आतमध्ये खुलेआम करता येते. ही नैतिकतेची भिंत लांघण्याचे आणि ते समाजाला दाखविण्याचे काम सँड्राची ही समकालीन छायाचित्रे करतात.
विनायक परब
response.lokprabha@expressindia.com  @vinayakparab