कुटुंबातील दोन व्यक्तींमध्येही एक अनाम किंवा एक धूसर अशी संवाद आणि स्वातंत्र्याची वेस असते; ती ओलांडली की आपण कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्याच स्वातंत्र्यावर अधिक्रमण करत असतो, नकळत!

आई-वडील आणि मुलगा/ मुलगी किंवा दोघेही असे त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबच अलीकडे जगात जास्त पाहायला मिळते. एकत्र कुटुंब पद्धती आजही काही ठिकाणी भारतात, खासकरून गावागावांमध्ये पाहायला मिळत असली तरी जगभरातून तिचे उच्चाटन झाल्यातच जमा आहे. भारतातही आपला प्रवास आता विभक्त कुटुंब पद्धतीच्याच दिशेने अधिक सुरू आहे. कुटुंब कितीही लहान असले म्हणजे केवळ नवरा-बायको एवढेच मर्यादित असले तरी त्या दोघांच्या एकमेकांकडून काही अपेक्षा असतातच. कधी त्या पती-पत्नी म्हणून असतात तर कधी कुटुंबातील सदस्य म्हणून असलेल्या माफक अपेक्षा. जसजशी कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढत जाते, तसतशा अपेक्षाही वाढत जातात. म्हणजे एकाच घरात पतीच्या पत्नीकडून किंवा पत्नीच्या पतीकडून असलेल्या अपेक्षांशिवाय; त्या दोघांच्याही आई-वडील म्हणून मुलांकडून असलेल्या अपेक्षा, मुलांच्या आई-वडिलांकडून असलेल्या अपेक्षा असे अपेक्षांचे एक जंजाळच तयार होत जाते. मग त्यातील कोणाही एकाकडून अपेक्षा पूर्ण झाली नाही की, मग रुसवे-फुगवे सुरू होतात. त्याचे पर्यवसान मग रागामध्ये आणि नंतर अंतिमत भांडणामध्ये होते. त्यातूनच मग कुटुंबातील सदस्यांच्या मनात एकमेकांविषयी समज तयार होतात, काही काळाने त्याचेच रूपांतर गरसमजामध्ये होत जाते. या समजाच्या पातळीवर विषय व्यवस्थित हाताळला नाही तर मग गरसमजाचा कॅन्सर वेगात पसरण्यास वेळ लागत नाही.

हा झाला आजवरचा सर्वसाधारण अनुभव! हे तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण समकालीन छायाचित्रकार असलेली व्हिक्टोरिआ सोरोचिन्सकी या साऱ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करते. तिचे म्हणणे आहे की, आपण कुटुंबातील लोकांना, एकाच कुटुंबातील आहोत असे म्हणून गृहीत धरतो आणि त्यांचे आपले रक्ताचे नाते असल्याने किंवा जगात सर्वात जवळचे नाते असल्याने त्यांनी आपले ऐकलेच पाहिजे, असे आपल्याला वाटते. ते वाटणे किंवा ती अपेक्षा ठेवताना; समोर असलेली आपल्या नात्यातील सर्वात जवळची व्यक्ती हीदेखील एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला तिचे विचारस्वातंत्र्य आणि आचारस्वातंत्र्य आहे याचा आपल्याला विसर पडतो किंवा आपण त्याकडे दुर्लक्षच करतो. शिवाय आपले एक कुटुंब म्हणूनही त्या व्यक्तीवर आपले विचार लादण्याचा प्रयत्न करतो, तो त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप असू शकतो म्हणून वाद होतात, असे व्हिक्टोरिआला वाटते. म्हणून स्वातंत्र्यच अन् ज्याला आपण व्यक्तींमधील संवाद म्हणतो, त्या संवादाचे ओझे असाच विषय तिने तिच्या प्रदर्शनासाठी निवडला आणि त्यावर काम केले.

साहजिकच होते की, त्यासाठी तिला कौटुंबिक पाश्र्वभूमी गरजेची होती. तसे प्रसंग, तशा घटना यांची निवड तिने केली. तिचे म्हणणे आहे की, कुटुंबातील दोन व्यक्तींमध्येही एक अनाम किंवा एक धूसर अशी संवाद आणि स्वातंत्र्याची वेस असते; ती ओलांडली की आपण कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच्याच स्वातंत्र्यावर अधिक्रमण करत असतो, नकळत! आपण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याने आपल्याला तसे करण्याचा अधिकार आहे, असे आपल्याला सतत वाटत असते. वाद टाळायचे तर यापुढे याबाबत काळजीपूर्वक विचार करायला हवा, असे तिचे म्हणणे आहे. म्हणूनच तिने कुटुंबातील संवाद-वाद यांच्या वेशीवर असलेले असे काही विषय, घटना निवडल्या आणि त्या छायाचित्राच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडल्या आणि या विषयाला वाचा फोडण्याचे काम केले.

अपेक्षांना सुरुवात कुठे होते? तर अगदी थेट गर्भधारणेपासूनच. आई होण्याच्या आनंदापासूनच ती त्या गर्भाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. पण तो संवाद असतो की, अपेक्षांना झालेली सुरुवात असा प्रश्न या समकालीन छायाचित्रकाराला पडतो. एवढेच नव्हे तर ती तात्त्विक पातळीवर आपल्याशीच आपण साधलेल्या संवादामध्येही आपणच आपल्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप करतो का.. किंवा कितपत करतो असाही पुढे जाणारा विचार करून तसा शोधही घेते. गर्भाशी संवाद साधणारी महिला आणि अंगावरील कपडे उतरवून पियानोच्या माध्यमातून स्वसंवाद साधणारा पुरुष या दोन्ही छायाचित्रांतून ती तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते. ही छायाचित्रे केवळ पाहून चालणार नाहीत तर त्यांच्याशी आपल्याला म्हणजे रसिकांनाही संवाद साधावा लागेल. त्या घटनाचित्रांमागे नेमके काय दडले आहे, नेमका कोणता संवाद सुरू आहे, त्या संवादामध्ये कोण कोणाच्या स्वातंत्र्याचा अधिक्षेप प्रेमाने करते आहे, या साऱ्याचा शोध घ्यावा लागेल.. त्यावेळेसच आपल्याला ही छायाचित्रे कळू लागतील आणि मग आपलाच आपल्याशी एक वेगळा संवाद सुरू होईल, तो असेल आपल्या स्वातंत्र्याचा!
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com
@vinayakparab