जानकीजीवन स्मरण जयजय राम! श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं स्मरण करीत त्यांच्या विचारांच्या आधारावर आजपासून वर्षभर आपण चिंतन सुरू करीत आहोत. चिंतनाच्या सुरुवातीला गोंदवल्याच्या प्रथेप्रमाणे सीतामाईंचं आणि प्रभूचं स्मरण आहे. सीतामाईचं अवघं जीवन म्हणजे रामस्मरणच आहे. त्या जीवनाचं ध्येय मनात जोपासण्यासाठी हे स्मरण आहे. सम-विषम परिस्थितीतही सीतामाईच्या मनातलं रामस्मरण जसं कणभरही कमी झालं नाही, तसं स्मरण साधकाला साधावं, हा त्यामागचा हेतू आहे. मुळात आपण साधक आहोत का? साधक हे पद नाही. हे विशेषण नाही. ती एक स्थिती आहे. साध्यासाठी पूर्ण जीवनार्पण जो करतो तो साधक. आपण तसे साधक आहोत का? पण साधक ही तर फार पुढची गोष्ट झाली. आपण आधी माणूस तरी आहोत का? हेच सूत्र पकडून आपल्या चिंतनाचा प्रारंभ श्रीगोंदवलेकर महाराजांच्या वाक्यानं करू. श्रीमहाराज म्हणतात, ‘‘मनुष्य म्हणून जन्मलेला माणूस, माणूस म्हणून मेला तर खरा.’’ बघा हं, महाराज इथे ‘साधक म्हणून मेला तर खरा’, म्हणत नाहीत. ‘सिद्ध म्हणून मेला तर खरा’, म्हणत नाहीत! माणसाचा जन्म मिळाला ना, मग निदान कमीतकमी माणूस म्हणून तरी मरा, असं म्हणतात! यामागचं रहस्य काय आहे? वाचायचं म्हणून हे वाक्य पटकन वाचलं तर आपल्याला वाटतं की, ‘माणसानं आधी चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करावा. तो गेल्यावर त्याच्या माणुसकीचं स्मरण लोकांना झालं तर त्याचा जन्म सार्थकी लागला’, असं श्रीमहाराजांना सांगायचं आहे. पण अर्थ एवढाच नाही. हे वाक्य अतिशय अर्थघन आणि गूढगंभीर आहे. या वाक्याचं मूळ श्रीमहाराजांच्याच दुसऱ्या एका वाक्यात आहे. ते वाक्य असं, ‘‘काही गोष्टी प्रयत्नसाध्य नाहीत. त्या भाग्याने येतात. मनुष्यजन्म तसा आहे. इतर योनीतून मनुष्यजन्म येणे हातचे नाही.’’ जिवाला माणसाचा जन्म कसा लाभतो, याचं रहस्यच महाराज सूचित करीत आहेत. त्या रहस्याकडे आपलं कधीच लक्ष जात नाही. आपण जगात वावरतो खरं पण अंतर्मुख होऊन निरीक्षण करीत नाही. या जगात कित्येक जीव आहेत. जलचर, भूचर, खेचर प्राणी आहेत. पक्षी आहेत. झाडं, वेलीही कित्येक आहेत. त्यांच्या पाना-फुला-फळांतही किती वैविध्य आहे. या चराचरात आपण माणूस म्हणून जगत आहोत. आपण ‘माणूस’ आहोत, याचंही भान आपल्याला नसतं. भोवतालच्या जीवसृष्टीतील आपल्या वेगळेपणाचं, आपल्या माणूसपणाचं भानही नसतं. त्यामुळेच या माणूस असण्याचं महत्त्व आणि अपूर्वाई आपल्याला जाणवतदेखील नाही. आपण माणूस म्हणून जन्मलो खरे पण माणूस म्हणूनच का जन्मलो? त्यामागे आपलं कर्तृत्व आहे का? महाराज म्हणतात, माणसाचा जन्म प्रयत्नसाध्य नाही. तो भाग्यानं आला आहे. मग ते भाग्य कोणतं?