श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात, ‘प्रपंच व परमार्थ वेगळे वाटतात पण ते तसे नाहीत. ते रुपयाच्या दोन बाजू आहेत. सुखी जीवनाकरिता दोन्ही आवश्यक आहेत.’’ (बोधवचने, अनु. ३४०) ‘‘परमार्थ ही वृत्ती आहे. प्रपंच ही कृती आहे. दोन्हीचा संयोग झाला की दोनपणा उरत नाही, एकपणा येतो. तेथे आनंद असतो.’’ (अनु. ३४१) ‘‘वृत्ती बनविणे म्हणजे परमार्थ, बाकीच्या गोष्टी प्रारब्धाने होतील.’’ (३४२) ही तिन्ही वाक्ये योगायोगानं एकापाठोपाठ आलेली नाहीत. त्यात एक अदृश्य क्रम आहे. तो क्रम पाहताना श्रीमहाराजांचं आणखी एक वाक्य आपण वाचलं, ते असं,‘‘वासनेने युक्त परमार्थ म्हणजे प्रपंचच, तर वासनारहित प्रपंचसुद्धा परमार्थच होय.’’  आता या वाक्यांच्या प्रकाशात त्यांच्या बोधाचा विचार करू. आपल्याला आपलं जीवन सुखी व्हावं, अशी आस आहे आणि त्यासाठी देवाधर्माचं आपण काहीबाही करतो, त्यालाच आपण ‘परमार्थ’ मानत असतो! श्रीमहाराजांनी एके ठिकाणी म्हटलं आहे की, ‘अडचणीमुळे  होणारी पूजा देवाची होत नाही.’ (बोधवचने, अनु. ४३१) अर्थात ती त्या अडचणीची पूजा होते! तेव्हा प्रपंचात आपण गुंतलो असलो तरी प्रपंचाचं खरं स्वरूप आपण जाणत नाही आणि परमार्थ करतो, असं मानत असलो तरी वास्तविक परमार्थ म्हणजे काय, तेही आपण जाणत नाही. श्रीमहाराज जेव्हा सांगतात की, प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही सुखी जीवनाकरिता आवश्यक आहेत, तेव्हा त्यांचा रोख प्रपंच सोडण्याची कल्पनाही ज्यांना करवत नाही, अशा आपल्याकडेच असतो. बरं बाबा, प्रपंच सोडवत नाही ना मग परमार्थ तरी करं. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, असं आपण म्हणतोच ना? मग एकच बाजू खरी मानून त्यात का राहतोस? नाण्याची        दुसरी बाजूही बघ! परमार्थ ही या नाण्याची दुसरी बाजू आहे.  प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय? तर प्रपंच ही कृती आहे, परमार्थ ही वृत्ती आहे. अर्थात प्रपंच हा कृतीचा आहे, परमार्थ हा वृत्तीचा आहे. कृती ही प्रपंचाचा आधार आहे, वृत्ती ही परमार्थाचा पाया आहे. पाया पक्का असेल तर आधार टिकून राहतो. प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीचा संयोग झाला म्हणजे दोनपणा उरत नाही. एकपणा येतो. तेथे आनंद असतो, असं श्रीमहाराज म्हणतात    त्याचं तात्पर्य काय? ते जाणून घेण्यासाठी थोडं स्वतकडे पाहू. आज आपण तोंडानं बोलतो एक आणि प्रत्यक्षात कृती करतो दुसरीच. आपल्या बोलण्यात उच्च तत्त्वज्ञान असतं आणि जगणं अहंकेंद्रित, संकुचित असतं. अर्थात उक्ती कितीही उच्च असली तरी आपली वृत्ती ही प्रापंचिकच आहे. त्यामुळे कृतीही तशीच आहे. थोडक्यात आपल्या वृत्तीतही खोट आहे आणि कृतीतही खोट आहे. तेव्हा वृत्ती बनवणं म्हणजे वृत्ती सुधारणंच! जेव्हा वृत्ती सुधारेल तेव्हा कृतीही तिला अनुसरूनच होईल. अर्थात कृतीही सुधारेल.