आपला हात चरकात सापडावा तसा तिजोरीत अडकला होता. आपल्यासारख्या धट्टय़ाकट्टय़ा तरुणाला तो सोडवणं जमलं नाही. हुजूर महाराज तर वयोवृद्ध, तरी त्यांनी किती सहजतेनं आपल्याला सोडवलं, याचा प्रभाव गंगूच्या मनावर निश्चितच पडला. त्या दिवसापासून त्यानं कधीही चोरी केली नाही की दरोडा घातला नाही. पण एवढय़ानं परीक्षा संपते थोडीच! त्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी त्याचे साथीदार एकत्र जमले आणि दारूच्या मेजवानीचा बेत जमवू लागले. दारूचे पेले भरले गेले. गंगूसमोर पेला आला. गंगूने हात जोडून नकार दिला. टोळीतला त्याचा एक साथीदार नशेत म्हणाला, ‘‘आमच्या सरदाराची अक्कल मारली गेली आहे. आता टोळीचा म्होरक्या मीच आहे.’’ नंतर म्होरकेपद आल्यानं त्यानं गंगूला दारू प्यायला फर्मावलं. गंगूनंही अखेर हार मानत दारूचा पेला हातात घेतला. सारे आनंदात नाचू लागले तोच हुजूर महाराज गंगूच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले, ‘‘मुला, तू मला वचन दिलं आहेस. माझ्यासमोर पिणार नाहीस!’’ गंगू भानावर आला आणि तो पेला त्या म्होरक्याच्या अंगावर भिरकावत खोलीबाहेर गेला. काही क्षणांत हातात बंदूक घेऊन तो परतला तेव्हा सारे साथीदार सर्दावले. तो म्हणाला, ‘‘ माझ्या मित्रांनो, मला असे सद्गुरू मिळाले आहेत ज्यांच्या केवळ एका नजरेनेच माझं जीवन बदलून गेलं आहे. आता मी कोणताही गुन्हा करणार नाही. आपली दरोडेखोरांची टोळी इथंच संपली. म्होरक्या होण्याची लायकी तुमच्या एकातही नाही. अजून तुमची नावे पोलिसांना माहीत नाहीत. तेव्हा आजवर जी लूट आपण जमवली आहे ती सगळ्यांमध्ये वाटून घ्या आणि शहरात जाऊन कोणता तरी धंदा करा. माझा मार्ग वेगळा आहे.’’ सर्वानी त्याच्याचबरोबर राहण्याचा आग्रह धरला तेव्हा तो म्हणाला, ‘‘माझी माहिती पोलिसांना आहे. त्यामुळे माझ्या संगतीत राहणं धोक्याचं आहे.’’ तिथून गंगू जंगलाच्या आश्रयाला गेला. त्यानंतरचा त्याचा सर्व जीवनक्रम उपासनामयच झाला. हुजूर महाराजांनी देह ठेवला तेव्हा त्यालाही जगण्याचं प्रयोजन संपलं, असंच वाटलं. खरं तर सैन्यात भरती व्हायला चाललेला गंगू हा एका निरपराध माणसाला पोलिसांकडून चाललेली मारहाण थांबवायला मधे पडला होता आणि म्हणून त्याचं चारचौघांसारखं जीवन संपलं होतं. हातात बंदूक आली ती सैनिक म्हणून नव्हे, तर डाकू म्हणून. अशा जीवनात सद्गुरू आले आणि सारं काही बदलून गेलं. आता तर देहरूपानंही ते नाहीत, मग जगावं तरी कशासाठी, या विचारानं तो अस्वस्थ झाला. त्यानं स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं. गंमत पाहा, कोठडीत मात्र त्याला वाटू लागलं, पळून जावं! त्यानं गजही कापले, पण हुजूर महाराज समोर प्रकट झाले. म्हणाले, आता इथून निघण्याची वेळ आली आहे! हे ऐकून गंगू आनंदला. फासावर चढताना, तुरुंगाधिकारी, न्यायदंडाधिकारी आणि डॉक्टर या तिघांना त्यानं ब्यासला जाऊन जीवनाचं सार्थक करायला सांगितलं. हे तिघेही नंतर ब्यासला आले आणि तिथलेच होऊन गेले! ज्याचा शेवटचा दीस गोड झाला त्याचंच जीवन, मग ते कसंही असो, तेच सर्वार्थानं सार्थक जीवन नाही का?