गेल्या दोन भागांतील चिंतन वाचून कोणास वाटेल की, सद्ग्रंथांचं पारायण करूच नये किंवा त्याचा काहीच लाभ नाही, असा अर्थ आहे का? स्वामींनीही अनेकांना ज्ञानेश्वरी पारायणाची प्रेरणा दिली नव्हती का? तेव्हा एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. सद्ग्रंथांचं पारायण मी का करायचं, मौनादि साधना करायच्या त्यांचा हेतू काय? तर सद्गुरूंवरील भाव वाढावा, त्यांचा बोध मनात ठसावा, हा हेतू असला पाहिजे. जगाचा प्रभाव कमी होऊन आत्मिक हिताचं भान वाढावं, हा हेतू असला पाहिजे. स्वामी स्वरूपानंद यांनी एकदा सांगितलं होतं की, ‘‘आपण फक्त सोऽहं भावात शरीराच्या कणाकणातील देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावयाची आहे. सतत अभ्यास करावयाचा तो हाच. संसार करीत असता ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत वगैरे ग्रंथ नित्य, निदान वारंवार वाचीत असावे. म्हणजे चिंतन होते, आत्मरूपाची नेहमी जाणीव राहते. त्याचा इष्ट तो परिणाम होत जातोच. सुखदु:ख कोणासही सुटलेले नाही. पण साधकाने कोणतेही कर्म करताना, चालता, बोलता, उठता, बसता नेहमी मी ते स्वरूप आहे याची जाणीव ठेवीत जावी. हळूहळू साधक सिद्ध होत जातो. पुढे पुढे त्याला काहीच करावे लागत नाही. सर्व क्रिया यंत्रवत चाललेल्या दिसतात. पुढे जाणीव नेणीव याचाही विसर पडतो. फक्त एकरूपताच, सर्वत्र आत्मरूपच तो अनुभवतो’’ (स्वामी म्हणे अमलानंदा, लेखक- वसंत दामोदर भट, प्रकाशिका- मीना वसंत भट, पुणे, पृ. ५०). याचा अर्थ साधक ठरवून काही पारायणं करतो, काही साधना करतो, काही कर्मकाण्ड करतो त्यामागे देहबुद्धीलाच चिकटलेली त्याची कोणती ना कोणती तरी सुप्त कामनाच असते. या पारायणादि साधनांच्या मुख्य हेतूकडेच माझं दुर्लक्ष होतं. तो हेतू स्वामी सांगतात त्याप्रमाणे, चिंतन होणे आणि आत्मरूपाची नेहमी जाणीव राहणे, हा आहे. आता एक गोष्ट खरी की मन कामनारहित होणं आणि राहणं ही काही सोपी गोष्ट नाही. या मनात एकतर वाईट कामना तरी असतात किंवा चांगल्या कामना तरी असतात. वाईट कामना मनातून गेल्या तर तात्काळ चांगल्या कामना त्यांची जागा घेतात आणि चांगल्या कामना गेल्या तर लगेच त्यांची जागा वाईट कामना घेतात. आपल्याही ही गोष्ट अनुभवाची आहे. मनात साधनेचे विचार चालतात तेव्हा मन उंचीवर जात असते. ते विचार सुटले तर लगेच जगाच्या विचारांनी मन व्यापतं आणि खाली येतं. तेव्हा हे मन कामनारहित होण्यासाठी, प्रभू सांगतात त्याप्रमाणे ‘कामनाजात सांडावे’, ही स्थिती येण्यासाठी आधी वाईट कामना सोडल्या पाहिजेत. मग चांगल्या कामना त्यांची जागा घेतील आणि त्यांचाही फोलपणा कळत गेला, सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याशिवाय काहीच चांगलं नाही, हे समजलं तर त्या कामनाही सुटतील. त्या सुटल्या की मग अवसरोचित सकळ भोग भोगायची मुभा प्रभू देतात! तिचं कारण पुढल्या ओवीच्या अनुषंगानंही आपण जाणून घेऊ. स्वामी स्वरूपानंद संकलित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’ तील ही पुढील २८वी ओवी सांगते की, ‘‘तूं मानसा नियम करीं। निश्चळु होय अंतरीं। मग कर्मेद्रियें व्यापारीं। वर्ततु सुखें।।’’