नेम करावा लागतो याचाच अर्थ सहज प्रेम नाही. मग तो नेम वाढावा यासाठी काही नियम आपल्याला पाळावे लागतीलही. त्यातला आपण पाहिलेला पहिलाच नियम सर्वच नियमांना समानपणे लागू आहे. काय आहे तो पहिला नियम? तर (प्रथम नेम करावा पण) फार नेम करू नये, हा तो नियम आहे. हा ‘फार’ जसा उपासनेच्या अवडंबराला लागू आहे तसाच साधकाच्या प्रत्येक गोष्टीबाबत, त्या गोष्टीच्या दृश्यातील व्याप्तीबाबत आणि अंतरंगातील खोलीबाबत लागू आहे. सर्वप्रथम नेमाबाबत पहिल्या पावलावर एक गोष्ट लक्षात ठेवावी. श्रीगोंदवलेकर महाराजच सांगतात, ‘‘आज आवश्यक आहे तितकंच साधन पुरते. आपल्या प्रकृतिप्रमाणेच साधनाचा डोस पाहिजे. जरुर तेवढेच करावे. कमी वा अधिक त्रासदायक होते. आपण प्रामाणिक मात्र असावे. जे करणे शक्य असेल ते करावे. पण जे शक्य नसेल ते न झाल्याचे वाईट वाटून घेऊ नये.’’ (बोधवचने, अनु. २२६) किती मोठी सवलत दिली आहे! पण ‘आपण प्रामाणिक मात्र असावे,’ हा अंकुश कायम ठेवला पाहिजे. आपलं आपल्यालाच कळतं हो की आपण खरं किती करीत आहोत आणि लबाडी किती आहे ते. तेव्हा पहिल्या पावलावर आपण प्रामाणिकपणे जपाची संख्या ठरवून तितका जप रोज व्हावा, असा प्रयत्न करावा. ती संख्या आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या, रोजचा दिनक्रम, नोकरीची वेळ हे सर्व लक्षात घेऊन आपली आपणच ठरवावी. नंतर ती पाळण्याचा मात्र कसोशीनं प्रयत्न करावा. त्यानंतर ‘येता जाता खाता पिता उठता बसता धंदा करता’ मनातल्या मनात जप चालवण्याचा प्रयत्न सुरू करावा. नंतर रोजची जी संख्या आहे ती हळुहळू वाढवता येईल काय, याचा विचार करावा आणि त्यानुसार त्या वाढीव संख्येसाठी रोजच्या दिनक्रमातून कोणत्या गोष्टींत जाणारा वेळ कमी करता येईल, याचा विचार करावा. असा विचार केला की आपल्याला दिवसभरात बराच रिकामा वेळही मिळतो पण तो दुनियादारीत भरून जात असल्याने आपल्या लक्षात येत नाही, हे जाणवेल. श्रीमहाराजही सांगतात, ‘‘आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, आपण स्वतदेखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे.’’ (७ फेब्रुवारीच्या प्रवचनातून) तेव्हा जप वाढवायचा तर जपाव्यतिरिक्तच्या वेळातूनच, व्यवहाराला न सोडता मला वेळ काढावा लागेल. मग ‘आपण प्रामाणिक मात्र असावे’ हा अंकुश ठेवला की लक्षात येईल व्यवहाराची, कर्तव्याची कामं झाल्यावरही जगाच्या नादी लागून आपला बराचसा वेळ असाच वाया जात असतो. त्या वेळात निदान मानसिक जप तरी चालू करता येईल.