आपल्या वाटय़ाला जे कर्म आलं आहे ते सोडू नये. ते कर्म त्यात गुंतून मात्र करू नये. त्या कर्माचं काय फळ मिळेल, याचा विचार न करता, ते कर्म अधिकाधिक अचूकपणे करावं. कसंतरी करू नये. यानंतरची ओवी आहे ती, तूं योगयुक्त होउनि। फळाचा संग टाकुनि। मग अर्जुना चित्त देउनि। करीं कर्मे।।१३।। (अध्याय २, ओवी २६७). या ओवीचा प्रचलितार्थ गेल्यावेळी आपण वाचला तो म्हणजे, अर्जुना तू निष्काम कर्मयोगाने युक्त होऊन कर्मफळाचा अभिलाष टाकून मग मन लावून विहित कर्मे करावीस. आता या ओवीचा विशेषार्थ असा की, तू माझ्याशी योग साधून आणि मला चित्त देऊन कर्मे कर. त्यांचं फळही माझ्यावरच सोपव! तर आता, ज्या तीन ओव्यांचे विवरण आपण करीत आहोत त्यातील पहिल्या (म्हणजे ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ११व्या )ओवीपासून विचार करू. या ओवीत सद्गुरूच्या आधारावर मनाला निवांतपणा आला तरी माणसानं त्याच्या वाटय़ाला जी कर्मे आली आहेत, ती सोडू नयेत, असं बजावलं आहे. एक गुरूबंधू होते. सद्गुरूंची भेट झाल्यावर त्यांच्या मनाची अशी स्थिती झाली की त्यांना नोकरीबिकरी सारं काही सोडून सद्गुरूंच्या गावी जाऊन राहावंसं वाटू लागलं. त्यांनी राजीनामाही दिला, पण तो स्वीकारला गेला नाही. त्यांना वरिष्ठांनी बरंच समजावून पाहिलं. त्यानंतर काही दिवसांनी सद्गुरू या साधकाच्या शहरी आले. भेट होताच त्यांनी कार्यालयातील हालहवाल विचारायला सुरुवात केली. हा साधक उत्तरं देऊ लागला, पण, सद्गुरू कधीच या गोष्टी विचारत नाहीत. आजच का विचारत आहेत, याचं त्याला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, ‘महाराज सारं काही चांगलं आहे, पण मी राजीनामा दिला होता.’ त्यांनी विचारलं, का? मला तुमच्या गावी येऊन राहण्याची इच्छा आहे, हे सांगण्याचं याला धाडस झालं नाही. तो म्हणाला, दुसऱ्या कंपनीत जावंसं वाटतं. त्यावर हसून सद्गुरू म्हणाले, ‘‘नको इथेच थांब.’’ मग म्हणाले, ‘‘तू तिकडे (सद्गुरूंच्या गावी) येऊन काय करणार? प्रारब्ध शेष आहे तोवर इथं राहावंच लागेल. नाहीतर पुन्हा त्या प्रारब्धासाठी यावंच लागणार. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, तुला तिकडे नेऊन ज्ञान द्यायचं की इथे ठेवून ज्ञान द्यायचं, हा माझा प्रश्न आहे!’’ न सांडिजे तुवां आपुलें। विहित कर्म!  वाटय़ाला आलेलं कर्म आहे, ते कसं टाळता येईल? ते तात्पुरतं टाळलं तरी दूर सरणार नाही. प्रारब्धाच्या सिद्धांतानुसार, माझ्या वाटय़ाला आलेलं कर्म हे माझ्याच आधीच्या कर्माचं फळ आहे. त्यामुळे ते टाळणं म्हणजे प्रारब्धच टाळणं. ते कसं शक्य आहे? कर्म, मग त्या कर्माचं फळ आणि त्या फळातून पुन्हा कर्म, अशी साखळी सुरू आहे. माणूस कर्म करतो, त्या कर्माचं अमुकच फळ  मिळेल, असं गृहीत धरतो आणि तसं फळ मिळालं नाही तर निराशेच्या गर्तेत सापडतो किंवा नव्या जोमानं कर्माकडे वळून अपेक्षांमध्ये अडकतो किंवा मनाजोगतं फळ  मिळालं तर कर्तेपणाच्या मदामुळे अहंकारात अडकतो. मग कर्म तर टळत नाही पण त्याचा पाश बनू नये, असं ते करायचं असेल तर या तीन ओव्यांचाच आधार अनिवार्य आहे.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री