आपण रस्त्यानं जात असताना एखादा परिचित समोर उभा ठाकतो, मग त्याच्याशी बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. अगदी त्याचप्रमाणं काही र्कम आपल्यापुढे उभी ठाकतात. ती टाळता येत नाहीत. ती करावीच लागतात, अर्थात कर्तव्यच असतात. जे करण्यावाचून गत्यंतर नाही त्यालाच कर्तव्यं म्हणतात. प्रारब्धानुसारच हे कर्म आपल्या वाटय़ाला आलं असतं आणि त्यातून फळाची अपेक्षा न ठेवता ते कर्म केलं तर फळ दिल्यानंतर ते कर्म शांत होतं आणि त्या कर्माचा ठसा, संस्कारही पुसला जाऊन त्यापुरत्या प्रारब्धाचा हिशेब चुकता होतो. तेव्हा फलाशेत न गुंतता कर्तव्यकर्म, विहित कर्म, वाटय़ाला आलेलं कर्म करणं हीच भौतिक जीवनाची रीत असली पाहिजे. त्यातही हे कर्म कसंतरी करायचं नाही (कुकर्मी संगति न व्हावी). तर  ‘‘तूं योगयुक्त होउनि। फळाचा संग टाकुनि। मग अर्जुना चित्त देउनि। करीं कर्मे।।’’ परमात्म्याशी योग साधून, त्या योगानं युक्त होऊन म्हणजेच अंत:करण परमात्ममय करून, चित्त परमात्म्याकडे लावून प्रारब्धानुसार वाटय़ाला आलेली कर्मे करायची आहेत. आता या ठिकाणी हीराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ (कुसुम प्रकाशन, अहमदाबाद) या ग्रंथाच्या आधारे कर्मप्रारब्धाची थोडी माहिती घेऊ. कर्माचे तीन भाग आहेत. क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म. क्रियमाण कर्म कशाला म्हणतात? तर जन्मापासून मरणापर्यंत आपण जी जी कर्मे करतो त्यांना ‘क्रियमाण कर्म’ म्हणतात. ही सर्व कर्मे केल्यावर, ती करणाऱ्याला फळ देऊन शांत होतात. फळ दिल्याशिवाय ती शांत होत नाहीत. उदाहरणार्थ, आपण तहान लागल्यावर पाणी पितो. पाणी पिण्याचे कर्म केले, तहान संपली म्हणजेच पाणी पिण्याचे कर्म त्याचे फळ त्वरित देऊन शांत झाले. आपल्याला भूक लागली, खाण्याचे कर्म केले – आपली भूक शमवून ते कर्म शांत झाले. अशा प्रकारे क्रियमाण कर्म हे फलद्रूप होतेच. फळ भोगूनच आपल्याला त्यापासून मुक्ती मिळते. परंतु कित्येक कर्मे अशी असतात की ती तात्काळ फळ देत नाहीत. त्या कर्माचे फळ पक्व व्हायला थोडा वेळ लागतो. त्यांचे फळ मिळायला थोडा अवधि जातोच. जोवर फळ मिळत नाही, तोवर ती र्कम जणू शिल्लक राहातात. अशा फळ न दिलेल्या कर्मानाच ‘संचित कर्म’ म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही आज परीक्षा दिलीत. अर्थात उत्तर पत्रिका लिहिण्याचे कर्म आज केलेत पण त्याचे जे फळ, म्हणजे निकाल तो लागायला वेळ लागतो. बाजरी पेरल्यावर तीन महिन्यांनी पीक तयार होते, गव्हाला चार महिने लागतात. आंबा लागवडीस येण्यास पाच-सहा वर्षे लागतात. अन्य काही फळ-झाडे दहा किंवा त्याहून अधिक वर्षांनी फळ देतात. ‘क्रियमाण’ कर्माचे ज्या स्वरूपाचे बीज, त्याप्रमाणे त्याचे फळ मिळण्यास कमी अधिक काळ लोटावा लागतो. काही कर्माची फळे या नव्हे तर पुढच्या जन्मी किंवा अनेक जन्मानंतरही पक्व होतात. जीवात्म्याची अशी अनेक ‘संचित’  कर्मे असतात आणि ज्या क्षणी (मग याच जन्मी असो वा पुढील जन्मांमध्ये असो) संचित कर्म परिपक्व होऊन फळ द्यायला तयार होते त्याला ‘प्रारब्ध कर्म’ म्हणतात.