edt07एखाद्या वस्तूचे बाजारातील मूल्य ठरविण्यात ‘ब्रॅन्ड’ कशी मदत करतो, आणि या ब्रॅन्ड चे संरक्षण करणारी ट्रेडमार्क ही एक महत्त्वाची बौद्धिक संपदा आहे. ट्रेडमार्क निवडताना काय काळजी घेतली जावी  किंवा तो कसा निवाडावा हा सामान्य उद्योजकाला पडणारा एक नेहमीचा प्रश्न आहे.. कोणकोणत्या गोष्टींना ट्रेडमार्क  मिळू शकतो आणि कशाला मिळू शकत नाही याबद्दल आजच्या लेखात..
सफरचंदाच्या बागा असणारे एक व्यापारी नुकतेच माझ्याकडे आले. त्यांचे नाव हकीमचंद. लवकरच सफरचंदाचा रस, जाम वगरे उत्पादने बनविण्याचा मोठा कारखाना चालू करण्याचा त्यांचा विचार आहे आणि या उत्पादनांवरचा ट्रेडमार्क नोंदणीकृत करण्यासाठी ते आले होते. मी या संदर्भात आधी सगळी माहिती देऊन मग विचारले, ‘‘हं.. सांगा.. काय नाव द्यायचंय तुम्हाला तुमच्या या उत्पादनाला?’’
‘‘अ‍ॅपल’’ – हकीमचंद तत्परतेने उद्गारले.
‘‘अ‍ॅपल? सफरचंदाच्या उत्पादनाला अ‍ॅपल हे नाव? नाही मिळू शकणार हा ट्रेडमार्क.. नाकारला जाईल’’ – मी.
‘‘का नाकारला जाईल? इतका जगप्रसिद्ध फोन विकला जातो की या नावाने.. माझे उत्पादन का नाही? माझ्या उत्पादनासाठी तर हे नाव अधिक योग्य आहे.. कारण ही उत्पादने सफरचंदाचीच आहेत की’’ – हकीमचंद.
‘‘अहो, सफरचंदाची उत्पादने आहेत म्हणूनच हा ट्रेडमार्क मिळणार नाही. फोनला मिळणे सोपे आहे.’’ या माझ्या उत्तराबरोबरच हकीमचंदांच्या चेहऱ्यावर मला दिसले एक भले मोठे प्रश्नचिन्ह.
तर ‘असे का?’ हा प्रश्न आहे. याचे कारण म्हणजे आपण यापूर्वीच पाहिले आहे की, बौद्धिक संपदा हक्क मक्तेदारी निर्माण करतात. एकदा का एखाद्या नावावर किंवा शब्दावर किंवा चित्रावर ट्रेडमार्क नोंदणीकृत केला गेला की दुसऱ्या  कुणालाही तो शब्द त्याच प्रकारच्या उत्पादनाच्या बाबतीत वापरता येत नाही आणि असा हा ट्रेडमार्क जर उत्पादनाचे वर्णन करणारा (डिस्क्रिप्टिव्ह) असेल तर? तर मग तो तशा प्रकारचे उत्पादन बनविणाऱ्या इतर कुणाला त्याच्या उत्पादनाचे वर्णन करायला वापरताच येणार नाही.. आणि हा त्याच्यावर अन्याय होईल. म्हणजे पाहा.. हकीमचंदजींना त्यांच्या उत्पादनासाठी समजा ‘अ‍ॅपल’ हा ट्रेडमार्क जर मिळाला तर काय होईल? सफरचंदापासून काहीही उत्पादन बनविणाऱ्या दुसऱ्या कुणालाही त्यांच्या उत्पादनाचे वर्णन करण्यासाठी ‘अ‍ॅपल’ हा शब्द वापरताच येणार नाही आणि त्यांनी जर तो तसा वापरला तर ते या ट्रेडमार्कचे उल्लंघन ठरेल; पण दुसऱ्या उत्पादकांना जर त्यांच्या उत्पादनाचे वर्णन करायचे असेल तर ते ‘अ‍ॅपल’पासून बनलेले आहेत असे म्हणण्यावाचून दुसरा काहीही पर्याय नाही. म्हणून उत्पादनाचे वर्णन करणाऱ्या शब्दांवर ट्रेडमार्क दिला जात नाही; पण मोबाइल फोनचा मात्र सफरचंदाशी काहीही संबंध नाही आणि म्हणून तो सहज दिला जाईल.
मागच्या वर्षी गुगलने त्यांच्या बहुचर्चित गुगल ग्लासचा ट्रेडमार्क नुस्त्या ‘ग्लास’ या नावाने नोंदणीकृत करण्याचा प्रयत्न केला. यात ‘ग्लास’ हा शब्द मोठय़ा वैशिष्टय़पूर्ण अक्षरामध्ये लिहिलेला होता; पण अर्थातच हा ट्रेडमार्क मंजूर केला तर दुसऱ्या कुठल्याही काचेच्या वस्तू उदा. चष्मे बनविणाऱ्या उत्पादकाला त्याच्या उत्पादनाची जाहिरात करताना ग्लास हा शब्द वापरताच येणार नाही. या कारणास्तव हा ट्रेडमार्क नाकारला गेला. थोडक्यात काय, तर ट्रेडमार्क हा कधीही वस्तूची माहिती सांगणारा किंवा वर्णनात्मक नसावा. तर तो नेहमी वैशिष्टय़पूर्ण शब्द (डिस्टिन्क्टिव्ह वर्ड) असला पाहिजे. जर तो नवनिर्मित, काहीही अर्थ नसलेला नवीन शब्द असेल, उदा. कोनिका किंवा फॅरेक्स, तर फारच उत्तम! आपण पाहिलेल्या उदाहरणात, सफरचंदाच्या उत्पादनासाठी ‘अ‍ॅपल’ हा ट्रेडमार्क वर्णनात्मक आहे.. पण मोबाइल फोनसाठी मात्र तो वैशिष्टय़पूर्ण आहे आणि म्हणूनच तो फोनला मिळेल, पण सफरचंदाच्या उत्पादनाला मिळणार नाही.
आणखी एक नेहमी पडणारा प्रश्न हा असतो की, एकदा का ट्रेडमार्क एका वस्तूसाठी नोंदणीकृत केला गेला की तो परत कधीही कुठल्याही वस्तूसाठी मिळू शकत नाही का?.. तर असे मुळीच नाही. ट्रेडमार्क काय आहे याबरोबरच तो कुठल्या वस्तूसाठी घ्यायचा आहे तेही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजे समजा, ‘गालिचा’सारख्या एका उत्पादनासाठी मला ‘बाटा’ असा ट्रेडमार्क हवा आहे, तर तो मला मिळेल. कारण बाटा हा (एके काळी मूळचा युरोपीय ब्रॅण्ड) आज जरी भारतात एक सुप्रसिद्ध ट्रेडमार्क असला तरी बाटा चपला, बूट बनवितात.. आणि माझे उत्पादन आहे ‘गालिचा’. त्याचा बाटा ज्या वस्तू विकतात त्यांच्याशी काहीही संबंध नाही. मुळात हा बाटाच्या उत्पादकाने बनविलेला गालिचा आहे की काय अशी शंकासुद्धा ग्राहकाच्या मनात येणार नाही. कारण बाटा गालिचे बनवत नाहीत हे सर्वश्रुत आहे. बाजारात जी काही उत्पादने उपलब्ध आहेत त्यांचे ट्रेडमार्क कायद्यासाठी त्यांच्या वापरानुसार काही गट केलेले आहेत. उदाहरणार्थ, ‘गट २५’मध्ये आहेत कपडे, पादत्राणे आणि शिरस्त्राणे आणि ‘गट ३७’मध्ये आहेत गालिचे, चटया, अंथरुणे आणि इतर जमिनीवर अंथरण्याच्या गोष्टी. म्हणजे बाटाचे उत्पादन गट २५ मधल्या वस्तू आहेत आणि बाटा हा नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.. म्हणून गट २५ मधल्या दुसऱ्या कुठल्या वस्तूसाठी तो परत घेता येणार नाही. पण दुसऱ्या गटामधल्या एखाद्या वस्तूसाठी मात्र तो घेता येईल. कारण तिथे ग्राहकाची दिशाभूल होण्याची शक्यता नाही. म्हणून तुम्ही ‘कुठला’ शब्द ‘कुठल्या गटातील वस्तूसाठी’ ट्रेडमार्क म्हणून नोंदणीकृत करू पाहता आहात हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्यामुळे तुम्हाला ट्रेडमार्क मिळेल की नाही हे ठरत असते.
तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडमार्क कधीही बाजारात अस्तित्वात असलेल्या अन्य ट्रेडमार्कशी साधम्र्य असलेला नसावा. दोन ट्रेडमार्कमध्ये जर साम्य असेल तर ग्राहकाच्या मनात गोंधळ होतो आणि तो होऊ नये हाच ट्रेडमार्क कायद्याचा उद्देश आहे. बऱ्याचदा बाजारात अस्तित्वात असलेल्या सुप्रसिद्ध ट्रेडमार्कच्या विश्वासार्हतेचा फायदा घेण्यासाठी त्याच्याशी साधम्र्य असलेले ट्रेडमार्क नवी कंपनी वापरू पाहते. अशा ट्रेडमार्कना ‘फसवे ट्रेडमार्क’ किंवा डिसेप्टिव्ह ट्रेडमार्क असे म्हणतात. हे साधम्र्य कधी दिसण्यातील असेल. म्हणजे नवा ट्रेडमार्क जुन्या ट्रेडमार्कसारखा दिसणारा आहे, पण त्याचा उच्चार किंवा संकल्पना मात्र वेगळी आहे. उदा. सोबतच्या चित्रातल्या ‘अ‍ॅन्ग्री बाईट’ या ट्रेडमार्कचे सुप्रसिद्ध ‘अ‍ॅन्ग्री बर्ड’ या ट्रेडमार्कशी असलेले साधम्र्य पाहा!
कधी हे साधम्र्य फक्त उच्चारातील असेल आणि दिसायला मात्र ट्रेडमार्क्‍स वेगळे दिसतील आणि त्यांच्या संकल्पनाही वेगळ्या असतील. ‘सफोला’ नावाचे खाद्यतेल भारतात सुप्रसिद्ध आहे. दुसऱ्या एका खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीने त्यांच्या खाद्यतेलाचे नाव ‘शपोला’ असे ठेवले आणि ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्ज केला. दोन्ही ट्रेडमार्क्‍सचा रंग वेगळा, ते दिसायलाही वेगळे, पण उच्चार मात्र सारखा म्हणून हा दुसरा ट्रेडमार्क नाकारला गेला.
कधी ट्रेडमार्क्‍स दिसतात वेगळे, त्यांचा उच्चारही वेगळा असतो, पण दोन्हीमागची संकल्पना मात्र सारखी असते. खालच्या चित्रातील ‘फ्रुटीसॉल’ आणि ‘सोल्फ्रुट्टा’ हे दोन ट्रेडमार्क पाहा. ते दिसतात वेगळे आणि त्यांचा उच्चारही वेगळा आहे. पण दोन्ही एकाच संकल्पनेवर आधारित आहेत. आणि दोन्ही एकाच प्रकारच्या उत्पादनासाठी वापरले जाणार होते.
दृष्टिसाधम्र्य, उच्चारातील साधम्र्य आणि संकल्पनेतील साधम्र्य या तीन कारणांमुळे ट्रेडमार्क्‍स सारखे दिसू शकतात आणि ग्राहकाच्या मनात गोंधळ निर्माण करू शकतात आणि म्हणूनच असे ट्रेडमार्क्‍स नाकारले जातात. तेव्हा ट्रेडमार्क्‍स नाकारले जाण्याची कारणे ही की, तो एक तर वर्णनात्मक असतो किंवा एक ट्रेडमार्क नोंदणीकृत असताना त्याच गटातील वस्तूसाठी तशाच ट्रेडमार्कची कुणी नोंदणी करू पाहते किंवा मग अस्तित्वात असलेला ट्रेडमार्क आणि नवा ट्रेडमार्क यांच्या दिसण्यात, उच्चारात किंवा संकल्पनेत साधम्र्य असते.
प्रा. डॉ. मृदुला बेळे
* लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.
ईमेल : mrudulabele@gmail.com

importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?