अमिताव कुमार या विदेशस्थ भारतीय लेखकाने लिहिलेल्या ‘अ मॅटर ऑफ रॅट्स- अ शॉर्ट बायोग्राफी ऑफ पाटणा’ या पुस्तकात चटपटीत निरीक्षणे, चित्र-विचित्र किस्से यांची रेलचेल असेल असे वाटून गेले. आजकालच्या प्रगत जमान्यात भारतात काय काय प्रकार चालू आहेत अशासारखी टिपणी करणारी काही पुस्तके अकारण बेस्टसेलर ठरल्याचा अनुभव असल्याने हे पुस्तकदेखील त्याच वळणाने जाणारे असेल अशीच खूणगाठ बांधली होती. पुस्तकातील पहिले प्रकरण वाचत असताना आपले अनुमान बरोबरच निघाले की, याची खात्री पटू लागली. पाटणा शहराचे चरित्र लिहायला बसलेला हा लेखक सुरुवातच त्या शहरातील उंदरांच्या सुळसुळाटाबाबत करू लागतो. उंदरांनी शहराचा कसा ताबा घेतला आहे. घरा-दारांतच नव्हे, तर शहरात फिरताना, स्टेशनवर, वाचनालयात, संग्रहालयात उंदरांनी किती धुमाकूळ घातला याची रसभरीत वर्णने तपशीलवार देतो. पाटणा शहराखाली उंदरांचे प्रतिशहर वसले आहे अशी टिपणीही करतो. त्याच ओघात बिहारमधील उंदीर मारणाऱ्या व खाणाऱ्या मुसाहरा जमातीविषयी सविस्तर सांगतो अन् या लोकांसोबत शेतावरल्या बिळांत लपलेल्या उंदरांची शिकार कशी प्रत्यक्ष अनुभवली याचीही माहिती देतो.
पहिलं प्रकरण असं मूषकार्पण झालं म्हटल्यावर पुढे काय याचा काहीच अदमास येत नाही अन् लेखक एकदम पाटणा शहराच्या ऐतिहासिक माहात्म्याची उजळणी करताना दिसतो. पाटलीपूत्र, मगध ते पाटणापर्यंतच्या वाटचालीत या शहराच्या उज्ज्वल आणि संपन्नतेची साक्ष पटविण्यासाठी शतकांपूर्वी येथे येऊन गेलेल्या ग्रीक, पर्शीयन, चिनी प्रवाशांच्या हस्तलिखितांचा आधार घेत अन् अलीकडच्या काळात इ. एम. फॉर्स्टर, शिवा नायपॉल, झुंपा लाहिरी, विक्रम सेठ ते बाबा नागार्जून, फणींद्रनाथ रेणू, रामधारी सिंग दिनकर आदी लेखकांच्या साहित्यात पाटणाबाबत केलेल्या लिखाणाचा धांडोळा घेतो. मोगलांच्या आगमनानंतर दिल्लीचे प्रस्थ वाढले आणि एकेकाळचे देशातील सर्वात संपन्न शहर मागे पडले याची अमिताव कुमार यांना खंत वाटते.
पाटणा शहर सर्वच आघाडय़ांवर का मागे पडत गेले याविषयी अमिताव कुमार यांची निश्चित अशी कारणमीमांसा नाही. मुळातच या पुस्तकात प्रामुख्याने अमिताव यांनी अलीकडच्या काळात या शहराला जेव्हा जेव्हा भेट दिली तेव्हा त्यांना जाणवलेल्या बदलांच्या नोंदीखेरीज फारसे काही हाती लागत नाही. यात अर्थातच, कोणतेही सूत्र नाही. शहराच्या चरित्राऐवजी त्याचे चारित्र्य जाणून घेण्यात त्यांना कदाचित अधिक रस असावा.  
स्वातंत्र्यलढय़ात एकाही पाटणाकराने अतुलनीय कामगिरी बजावली नाही यांची खंत व्यक्त करतानाच कला क्षेत्रांत मात्र, पाटण्याने मोठे योगदान दिल्याचा त्यांना अभिमान वाटतो.
अमिताव यांना आजच्या पाटणा शहराचं तीन प्रकारे वर्गीकरण करण्याचा मोह होतो. त्यांच्या वर्गीकरणातील पहिला वर्ग पाटणासोडून इतरत्र जाऊन प्रस्थापित झालेल्यांचा आहे. या वर्गातील लोकांच्या जन्म आणि जडणघडणाचा काळ पाटण्यात व्यतित झालेला आहे. अन्यत्र जाऊन ते पुढील काळात आपापल्या क्षेत्रात नाव करते झाले याचे कारण ते पाटण्यातील त्या उमेदीच्या दिवसांना देतात. असेच पाटणा सोडून देश-विदेशांत पोहोचलेल्या चित्रकार सुबोध गुप्ता यांच्याविषयी अमिताव यांनी पुस्तकात उदाहरणादाखल भरभरून लिहिले आहे. विदेशातील अ‍ॅब्स्यल्यूट व्होडकाने सुबोध गुप्ताच्या कलाकृतीला आपल्या बाटलीवर कसे स्थान दिले याचे तसेच नवी दिल्लीत जाऊन वृत्तवाहिन्यांमध्ये आघाडीचा निवेदक झालेल्या रविश याचेही तो मूळचा पाटणाकर आहे म्हणून अमिताव यांना अप्रूप  वाटते.
जे पाटणा शहर सोडू शकले नाहीत ते मूलवासी तेथेच राहून व्यापार, राजकारण व नंतर उदयास आलेल्या शिक्षण व्यवसायात मोठे झाले अशी सरसकट नोंद अमिताव करतात. दुसऱ्या वर्गातले हे लोक याशिवाय अन्य काही करू शकतात याची त्यांना खात्री नसावी व यांतील सर्वाचेच चांगले चालले आहे, असे त्यांना उगाचच भाबडेपणाने वाटते. तिसऱ्या वर्गातील लोक अर्थातच बाहेरून पाटण्यात आलेले आहेत.  हे लोक स्थानिकांची गरज म्हणून येथे आले असे ते ठामपणे म्हणून जातात. केवळ उदरनिर्वाहासाठी आलेल्या लोकांबाबत असे म्हणणे एकवेळ समजू शकते मात्र, राजकीय कार्यकर्ते म्हणून किंवा गरीब विद्यार्थी म्हणून मोठय़ा प्रमाणावर लोक पाटणासारख्या शहरात दाखल झाल्याची लेखकाची टिपणी आगळी ठरते.
पाटण्याशी नाळ असलेल्या व जोडली गेलेल्या लोकांना तीन वर्गात बसवताना काही उदाहरणे दिली आहेत, ती वाचताना अमिताव कुमार यांचा दृष्टिकोन खुला असल्याचे जाणवते. विशेषत: शिक्षणाच्या प्रसाराने अटळपणे या क्षेत्रात शिरलेल्या बाजारीकरणाचा आलेख मांडताना अमिताव त्यातील चांगल्या-वाईटाची सुरेख मांडणी करतात. कोचिंग क्लासवाल्या आनंद कुमार यांच्या प्रयोगांबाबत आत्मीयतेने लिहितात.
उंदरांचा सुळसुळाट ते लेखकमित्राच्या वैवाहिक जीवनातील बेबनावापर्यंतचे अनुभव लिहिताना पाटणा शहराचे नेमके कोणते चित्र अभिप्रेत आहे याबाबत लेखकाच्या मनात कमालीचा गोंधळ असल्याचे मात्र स्पष्ट होते. एकमात्र निश्चित की हे अनुभवकथन त्यांनी पाटणाबाबत आस्था बाळगत खुलेपणाने व संवादी शैलीत केले आहे. त्यामुळे पाटणा शहराचे चरित्र समजू शकत नसले तरी आजच्या पाटण्याच्या वास्तवाचे त्यातील सर्व विरोधाभासांसह दस्तावेजीकरण होत आहे. या पुस्तकाची ती जमेची बाजू आहे.
अ मॅटर ऑफ रॅट्स- अ शॉर्ट बायोग्राफी
ऑफ पाटणा :  अमिताव कुमार,
प्रकाशक : अलेफ,  नवी दिल्ली,
पाने : १४४, किंमत : २९५ रुपये.