केवळ आपला मेंदू अन्य सजीवांपेक्षा तल्लख आहे, त्याच्या जोरावर आपण अन्य सर्व प्राण्यांवर हुकमत गाजवू शकतो, आपल्याहून शक्तिमान असलेल्या प्राण्यांनाही गुलाम बनवून राबवू शकतो किंवा केवळ करमणुकीचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहतो. हे जरी खरे असले, तरी एखादी वेळ अशी येते, की त्या वेळी आपल्या शक्तीच्या मर्यादा आपोआपच उघड होतात. अशा प्रसंगांमुळे अहंकार गळून पडतो किंवा नाही, याबद्दल शंका असली, तरी कधी तरी आपल्याला शहाणपण येईल आणि मानवेतर सजीवांकडे पाहण्याची पाशवी प्रवृत्ती नष्ट होऊन माणुसकी जिवंत होईल, अशी आशा निसर्ग मात्र सोडत नाही. त्यासाठी वेळोवेळी माणसाला धडे दिले जातात. त्यातून आपण काय शिकतो, हा प्रश्न असला तरी जेव्हा कधी कृत्याची फळे भोगण्याची वेळ येते, तेव्हा मात्र, निसर्गाने शिकविलेल्या शहाणपणाची आठवण माणसाला निश्चितच होत असते. विकासाच्या आणि वर्चस्वाच्या भुकेने हपापलेला माणूस आणि त्यामुळे विनाशाच्या उंबरठय़ावर उभा असलेला निसर्ग यांचा संघर्ष अलीकडच्या काळात शिगेला पोहोचला आहे. त्यातूनच, माणूस आणि निसर्गाच्या आधाराने आश्वस्तपणे जगणारे मानवेतर सजीव यांच्यातील अंतरही वाढले आहे.  माणूस प्रगत झाला, अशा कितीही फुशारक्या मारल्या जात असल्या, तरी  गुलामगिरीच्या विळख्यात सापडलेल्या आणि कुंपणाभोवतीच्या पिंजऱ्यात केवळ नाइलाजाने जगणाऱ्या प्राण्यांची अगतिक मानसिकता समजून घेण्याच्या माणसाच्या जुन्या समजूतदारपणाला मात्र अलीकडच्या भौतिक प्रगतीच्या मुलाम्यामुळे गंज चढत चालला आहे. अशी परिस्थिती आली, की माणसासमोर गुडघे टेकलेल्या प्रत्येकाचेच अस्तित्वासाठी सुरू असलेले संघर्ष अधिकाधिक तीव्र होत असावेत. कुठे तरी उरात दाटून राहिलेली धगधग उफाळून बाहेर येत असावी आणि बदला घेण्याची मानसिकता इच्छा नसतानादेखील ऊर्मीसारखी उसळून जागी होत असावी. दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयातील विजय नावाच्या एका सात वर्षांच्या पांढऱ्या वाघाने जे काही केले, त्यातही कदाचित याचेच प्रतिबिंब दिसते. जंगलात राजा असलेला वाघ माणसाने पिंजऱ्यात बंद केला, म्हणून त्याच्या नैसर्गिक जाणिवा मात्र पुसता येत नाहीत, हेच त्या वाघाच्या कृतीवरून स्पष्ट झाले आहे. पिंजऱ्यातला, गुलाम असलेला हा जंगली प्राणी केवळ करमणुकीपुरता आहे, या गैरसमजातून त्याची गंमत उडवू पाहणारा एक युवक दुर्दैवाने पिंजऱ्यात पडला आणि हा वाघ शांतपणे त्याला निरखत त्याच्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्या तरुणाला आणि पिंजऱ्याबाहेरून केवळ करमणुकीच्या नजरेने वाघाकडे पाहणाऱ्या सर्वाना वास्तवाचे भान आले. तरीही, वाघाने तोवर त्या तरुणाला ओरखडादेखील काढला नव्हता. कदाचित, वन्यजीवनाच्या संस्कृतीचे त्याने िपजऱ्यातही कसोशीने पालन केले असावे. जंगलातला वाघ भुकेलेला नसेल, तर शेजारी निवांतपणे चरणाऱ्या हरणांनादेखील वाघापासून भय नसते, असा जंगलाचा आहे. पिंजऱ्यातल्या वाघानेदेखील तो नियम पाळला होता. समोर, एका घासाच्या अंतरावर अपघाताने पडलेल्या त्या दुर्दैवी तरुणाला वाघाच्या रूपाने समोर मृत्यू दिसत असतानाही वाघ मात्र त्याला केवळ शांतपणे निरखत होता. या प्रकाराने भेदरलेल्या आणि कदाचित, आपल्या मर्यादांचे भान विसरलेल्या जमावाने वाघाच्या दिशेने दगडफेक सुरू केली, काहींनी तर धडका मारण्यास सुरुवात केली तेव्हा मात्र तो वाघ बिथरला आणि भेदरलेल्या स्थितीत समोर असलेल्या तरुणाचा जीव घेतला. ही घटना नि:संशय दुर्दैवी आहे, हे खरे असले तरी माणसाला आपल्या मर्यादांची आणि मानवेतर सजीवांच्या संस्कृतीची नव्याने ओळख करून घेण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी पुरेशी आहे.