‘अर्थहीन ओळखशून्य’ (२६ मार्च) संपादकीय वाचले. आधारचा आधार सरकारी योजना राबविताना घेऊ नये या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आधार कार्ड घेण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तासन्तास रांगेत तिष्ठत उभे राहून वेळ दवडणारे यांची नुसतीच घोर निराशा झाली नसून आपण मूर्ख ठरलो अशी त्यांची भावना झाली आहे. यातच भर की काय आधार-निगडित गॅस ग्राहकांना प्रत्येक गॅस सिलेंडरमागे रु.२२ ते २५ द्यावे लागलेले आहेत. म्हणजेच मूर्खपणाची किंमतदेखील त्यांना मोजावी लागली. असा भरुदड का? याबाबत गॅस कंपनीकडे लेखी विचारणा केली असता विसंगत उत्तर मिळाले की, आता आधारसंलग्न योजना स्थगित केली आहे!  म्हणजे प्रश्न एक व उत्तर भलतेच.
नियम व सरकारी निर्देश पाळणारे आपल्या देशात नेहमीच मूर्ख व व्यवहारशून्य ठरविले जातात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वास्तविक आधारचा आधारच डळमळीत होता. ज्या शिधापत्रिकेचा आधारने आधार घेतला होता त्या शिधापत्रिका कशा व किती बोगस आहेत हे वर्तमानपत्रात वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवरून वाचकांना अवगत झालेले आहे. त्यामुळे आधार रद्द झाले ते एकापरीने चांगलेच झाले. आधारसाठी सरकारी तिजोरीतील जो पसा खर्च झाला त्याची जबाबदारी लेखा नियंत्रकांनी आपल्या अहवालातून जनतेसमोर आणली पाहिजे.
या देशात सरकारकडून अधिक अपेक्षाच बाळगू नयेत.. अपेक्षापूर्तीच्या समाधानापेक्षा अपेक्षाभंगाचे दु:ख अधिक असते याची जाणीव असल्यास अव्यवस्था व बेशिस्त याची व्यथा वाटणार नाही.

बडगा ठीक, जागृती हवी
‘बालगोिवदांच्या पालकांवर कारवाईचा बडगा’ ही बातमी वाचली. या निर्णयाचे कोणीही सुबुद्ध नागरिक स्वागतच करेल. परंतु हंडीचे प्रायोजक असलेले गल्लीबोळातील राजकीय पुढारी पोलिसांवर दबाव आणून अशी कारवाई होऊ न देण्याचा प्रयत्न करतील अशीही शक्यता आहे. अशा ठिकाणी होणारे भयानक ध्वनिप्रदूषण टाळण्यास सर्वानाच अपयश आले आहे, तीच गोष्ट या बाबतीतही होईल. एवढेच कशाला, शिवाजी पार्कवर शिवसेनेची सभा झाली की तत्परतेने आवाजाची पातळी मोजणारी यंत्रणा याबाबतीत काहीच करताना दिसत नाही. असो. गणेशोत्सवाबद्दल हळूहळू का होईना, पण सर्वसामान्यांत जागृती होताना दिसत आहे, तशीच जागृती गोिवदाच्या बाबतीत होईल अशी आशा!
अभय दातार, ऑपेरा हाउस (मुंबई)

खेळ बच्चेकंपनीचा, पण नेत्यांमुळे ‘हायजॅक’
बालगोिवदांच्या पालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे (बातमी- लोकसत्ता, २६ मार्च). अनेक वर्षांपासून वाडे, चाळ अशा सर्व  ठिकाणी अतिशय लोकप्रिय असलेला बच्चेकंपनीचा हा साहसी खेळ गेल्या काही वर्षांपासून ठाणे, मुंबई येथील धूर्त राजकारणी नेत्यांनी विविध भागांत येनकेनप्रकारेण स्वत:चे वर्चस्व वाढवून सत्ता प्रस्थापित करण्यासाठी, स्वत:च्या तुंबडय़ा भरण्यासाठी; सर्वसामान्य लोकांच्या हातातून हिसकावून ‘हायजॅक’ केला.  निखळ आनंद देणारऱ्या या साहसी खेळाला कलंक लागला.
 यामध्ये लाखांच्या, कोटींच्या हंडय़ा उंच लटकावून सर्वसामान्य व निम्न आíथक स्तरातील जनतेला त्याचे आमिष दाखवून रस्त्यावर नाचविणाऱ्या;   गल्लीबोळांतील संधिसाधू गुंड, पुंड, भ्रष्ट नेत्यांच्या आíथक गरव्यवहारांवर जोपर्यंत कसलाच अंकुश नाही, त्यांच्या अवैध मालमत्तेवर कसलीच टाच येत नाही तोपर्यंत या विपरीत परिस्थितीमध्ये फारसा बदल होणार नाही.
 सत्ता व पशाचा माज असलेले हे ‘नेते’; सर्वसामान्य जनतेला विविध आमिषे दाखवून यथास्थित ठकवत असतात. गोिवदा हे एक निमित्तमात्र.
रजनी अशोक देवधर, ठाणे

राज्य-पक्षांमुळेच घोडेबाजार
‘.. हाच तिसऱ्यांचा चंग !’ हा राजीव साने यांचा लेख लोकशाहीमधील अटळ अवगुणावर योग्य भाष्य करणारा आहे. १९७७ च्या निवडणुकीत सर्व प्रथम समस्त विरोधी पक्ष एकत्र येऊन सत्ताधारी पक्षाला टक्कर देण्याचा श्रीगणेशा झाला, पण विविध विचारधारा असलेले पक्ष एकत्र नांदू शकत नाहीत हे सत्यही सामोरे आले. त्यानंतरच्या अनेक निवडणुकांत तिसरी आघाडी अटळ ठरली/ठरते आहे, परंतु प्रत्येक निवडणुकीत या आघाडीमुळे जनतेला अपेक्षित बदल झाले नाहीत हेही सत्य आहे.
वस्तुत: केंद्रात ठळक राष्ट्रीय राजकीय पक्ष आणि राज्यात प्रादेशिक पक्ष ज्यांना राष्ट्रीय पक्ष सोबत घेतील अशी रचना योग्य ठरावी; पण प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय स्तरावर जाण्याच्या प्रयत्नात घोडेबाजार करणे न टाळता येण्याजोगेच करताना दिसतो. त्यामुळे आता जनतेनेच सारासार विचार करून आपले मत व्यक्त करणे अत्यावश्यक आहे.
माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

उपद्रव देणारे स्थिर सरकार काय कामाचे?
‘..हाच ‘तिसऱ्यां’चा चंग’ हा राजीव साने यांचा लेख (लोकसत्ता, २५ मार्च) वाचला. त्यांच्या विवेचनावरून मतदारांनी स्थिर सरकार मिळण्यासाठी दोन प्रमुख पक्ष/आघाडय़ा यातूनच निवड करावी असे सुचवले आहे. लोकसभा निवडणुकीत प्रांतीय व स्थानिक मुद्दय़ावर आधारलेल्या प्रादेशिक पक्षांना नाकारावे हे मान्य. तिसऱ्यांकडे गरकाँग्रेस-गरभाजप अशा अभावात्मक व्याख्येपलीकडे कोणताही कार्यक्रम नाही हेही मान्य, पण काँग्रेस वा भाजप या पक्षांकडे तरी असा कोणता सकारात्मक कार्यक्रम आहे?
 ‘धर्माधता नको’ हा (अभावात्मक) कार्यक्रम काँग्रेसकडे तर ‘भ्रष्टाचार नको’ हा (अभावात्मक) कार्यक्रम भाजपकडे आहे.
माझ्यासारख्या सामान्य मतदाराला धर्माधता आणि भ्रष्टाचार या दोन्हींबद्दल कमालीची आणि सारखीच चीड आहे. अशा वेळी मी कोण कोणाची मते खाईल आणि कोण निवडून येण्याची जास्त शक्यता आहे याची गणिते का करीत बसावे? मला तिसरा पर्याय हवा आहे. धर्माधता आणि भ्रष्टाचार या दोन्ही मुद्दय़ांवर आजवरचा कमी-वाईट इतिहास असणारी कम्युनिस्टांची डावी आघाडी किंवा कोरी पाटी असणारा ‘आप’ हे पर्याय मला भुरळ घालणारच. यांच्याकडून भ्रमनिरास झाल्यानंतर किंवा माझ्या मतदारसंघात हे पर्याय उपलब्ध नसल्यास मी  ‘नोटा’ हा पर्याय निवडणे हे स्वाभाविक नाही काय?   
प्रमोद तावडे, डोंबिवली  

सोज्वळपणामुळेच चाकोरीबाह्य़ भूूमिका नाहीत..
कसदार अभिनयाबरोबरच सात्त्विक चेहरा आणि बोलके डोळे हेच बलस्थान असणारी अभिनेत्री कोण या प्रश्नावर दोन नावे प्रकर्षांने पुढे येतात. एक मीनाकुमारी आणि दुसऱ्या अर्थातच नंदा. न्त्यांचे नाव उच्चारले की ‘अल्लाह तेरो नाम’ हे ‘हम दोनो’ या चित्रपटातील कारुण्य व भक्तिरसाने अत्यंत ओथंबलेले गीत कानात रुंजी घालू लागते आणि ते तितक्याच उत्कट अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचविणारया नंदा नजरेपुढे उभ्या राहतात. या सोज्वळपणाच्या शिक्क्यामुळेच चाकोरीबाह्य़ भूमिकांसाठी लेखक-दिग्दर्शकांनी त्यांचा विचार केला नाही ही वस्तुस्थिती होती.             
अनिल रा. तोरणे, तळेगाव दाभाडे

नवशिक्या नटांनाही त्यांनी सांभाळून घेतले
पावित्र्य, मांगल्य, सोज्वळता यांचा त्रिवेणी संगम म्हणजे  बेबी नंदा.  देव आनंद, राज कपूर, सुनील दत्त यासारख्या अभिनेत्यांबरोबर  काम करताना त्यांनी स्वतचे वेगळेपण जपत आपला ठसा उमटवला. तसेच जितेंद्र, राजेश खन्ना, शशी कपूर, संजय खान,  संजीव कुमार या नवशिक्या नटांबरोबर त्यांना सांभाळून घेत  काम करताना त्यांना कमीपणा वाटला नाही.  या गुणी अभिनेत्रीला केवळ एकच फिल्मफेयर पारितोषिक ‘आंचल’ या चित्रपटातासाठी मिळाले हे शल्य तिच्या चाहत्यांना कायम असेल.
अनिल रेगे, अंधेरी(पूर्व)