हृदयेंद्रच्या उत्तरानं डॉक्टरसाहेबांच्या चेहऱ्यावर नि:शंकतेचं हसू प्रकटलं. हृदयेंद्र म्हणाला..
हृदयेंद्र – ‘ दुधें भरूनी वाटी लावीन तुझें वोठीं। सत्य सांगे गोठी विठो येईल कायी।।’ सत्य सांगे गोठी, म्हणजे हे साधका जर सद्गुरूबोध जर पूर्णपणे ग्रहण केलास ना तर मी खरंच सांगतो की तोच परमात्मा म्हणजे विठू तुझ्या याच देहात अवतरेल.. विठो येईल कायी! परमात्म्याच्या प्राप्तीशिवाय परमानंदाची प्राप्ती नाही आणि sam07परमात्म्याची प्राप्ती झाल्यानं भक्ताच्या प्रपंच जीवनाचं बाह्य़ रूप काही बदलत नाही, आंतरिक रूप मात्र पूर्ण आनंदानं भरून जातं.. तुकोबाही म्हणतात ना? ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’!
डॉ. नरेंद्र – ग्रेट!
कर्मेद्र – हृदयेंद्रस्वामी, एका अभंगाचं निरूपण अपूर्ण असताना दुसरा अभंग सुरू करू नका! (सर्वच हसतात) ती ‘आंबया डहाळी’ अजून खुणावते आहे!
योगेंद्र – हो, पण डॉक्टरसाहेब त्यासाठी ते रेखाचित्रही आणा..
दुपारी सर्वानीच छान झोपून घेतलं. तीन-साडेतीनला खोलीवर चहा आला. चहा घेऊन, चेहरा धुवून सुस्ती उडताच सर्वजण व्हरांडय़ात आले. दोन्ही खोल्यातल्या पाच खुच्र्या आणि गोलाकार लहान टेबल व्हरांडय़ात आणलं गेलं. सर्वचजण बसल्यावर डॉक्टरसाहेबांनी पॅड उघडून रेखाकृती समोर ठेवली. तिच्याकडे पाहात योगेंद्र बोलू लागला..
योगेंद्र – हृदयेंद्रच्या सांगण्याप्रमाणे सद्गुरूबोधाचं अमृतपान चौथ्या चक्रात आहे. गंमत अशी की हृदयेंद्रनं ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातल्या ज्या ओव्या सांगितल्या ना, त्याही फार सूचक आहेत! मूलाधाराच्या मांडीवर तू आम्हाला खेळवतेस आणि हृदयाकाशाच्या पाळण्यात झोके देतेस, म्हटलंय ना? तिथे हृदयाचा उल्लेख आहे. ‘सतरावियेचे स्तन्य देसी’ म्हणताना बोधामृतपानानं साधणाऱ्या परमस्थितीचा संकेत आहे आणि आनाहताची अंगाई गातेस, असं म्हणताना अनाहत चक्राचाही उल्लेख आहे! इथून साधकाला पाचव्या चक्रातून सहाव्या आज्ञाचक्रापर्यंत जायचं आहे. पाचवं चक्र कंठस्थानी आहे. त्याला विशुद्ध चक्र म्हटलं आहे. डॉक्टरसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे इथल्या थायरॉइड ग्रंथींद्वारे गळ्यापासूनच्या खालच्या सर्व अवयवांना पाठविल्या जाणाऱ्या संप्रेरकांचं नियंत्रण आहे..
हृदयेंद्र – पू. भाऊ मला म्हणाले होते की, या विशुद्ध चक्रापर्यंत येणं एकवेळ सोपं आहे. कारण रस्ता सरळ आहे. इथून पुढे आज्ञाचक्रापर्यंत जायचा रस्ता हा घाटाचा आहे! आहे फार थोडा, पण घाट म्हटला की अपघाताचा धोका सर्वात जास्त! डॉक्टरसाहेबांनी काढलेलं रेखाचित्र पहा. यात आज्ञाचक्रापर्यंत जाणारा घाटरस्ता दिसतोय ना?
ज्ञानेंद्र – खरंच. काय आहे हो डॉक्टरसाहेब?
डॉ. नरेंद्र – मोठय़ा आणि लहान मेंदूकडे जाणाऱ्या या मुख्य रक्तवाहिन्या आहेत. गळ्याच्या पुढच्या भागांतून मोठय़ा मेंदूकडे उजवी आणि डावी कॅरोटीड जाते तर मानेच्या मणक्याच्या बाजूनं लहान मेंदूकडे उजवी आणि डावी व्हर्टिब्रल जाते. पुढून जाणाऱ्या रक्तवाहिन्या या कवटीखालून गुहेसारख्या मार्गानं जातात. खरच या घाटात बोगदासुद्धा आहे!
– चैतन्य प्रेम