आपण स्वत:लाही यथार्थपणे जाणत नाही, तरी आपल्या अस्तित्वाबद्दल आपण नि:शंकच असतो. इतकंच नव्हे तर ‘आपल्या’ सुखासाठी अहोरात्र धडपडत असतो. स्वसुख चिंतनात मग्न असतो, असं सांगून हृदयेंद्रनं एकवार मित्रांकडे नजर टाकली. मग तो म्हणाला..
हृदयेंद्र – सर्व जग भौतिक सुखासाठी धडपडत आहे, पण तरीही भौतिकापुरता का होईना, पण हमखास सुखाचा मार्ग कोणी शोधल्याचं दिसत नाही. समर्थही विचारतातच ना? ‘जनीं सर्वसुखी असा कोण आहे?’ (एवढं बोलून हृदयेंद्रच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.)
कर्मेद्र – काय झालं हसायला?
हृदयेंद्र – मागे सद्गुरुंनी विचारलं, मनाच्या श्लोकांचं तात्पर्य काय? मी थोडय़ा फुशारकीनंच म्हणालो, या अकराव्या श्लोकात सर्व श्लोकांचं सारतत्त्व लपलं आहे. म्हणाले, ‘‘ कसं काय?’’ त्यावर मी म्हणालो या श्लोकाच्या पहिल्या चरणात एक प्रश्न आहे..
योगेंद्र – हो.. जनी सर्वसुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनि पाहे।
हृदयेंद्र – बरोबर.. आणि याच श्लोकाच्या याच चरणात त्याचं उत्तरही दडलं आहे..
योगेंद्र – उत्तर कुठंय? उलट हे मना तूच विचार करून शोधून पहा, असं सांगितलंय..
हृदयेंद्र – मला मात्र हेच उत्तर वाटतं! जगात सर्वात सुखी कोण आहे? तर हे विचारी मना तूच! जे विचार करतं तेच मन सुखी असतं..
ज्ञानेंद्र – व्वा!
हृदयेंद्र – मलाही वाटलं, गुरुजी माझं कौतुक करतील! पण ते हसून म्हणाले, ‘‘विचार काय वेडाही करतो, कैदीही करतो! तेवढय़ानं तो सुखी असतो काय?’’
ज्ञानेंद्र – अरे हो की!
हृदयेंद्र – मीही गोंधळात पडलो. मग गुरुजींनीच हसून सांगितलं, ‘‘भगवंताचा विचार हाच खरा विचार! जे मन शाश्वताचा विचार करतं, तेच सुखी असतं. जे मन अहोरात्र अशाश्वताच्या विचारात गुंतून असतं ते सुखी कसं होणार?’’ तेव्हा ‘अवघा तो शकुन हृदयी देवाचे चिंतन’ या चरणात मला हाच अर्थ प्रस्फुटित होत आहे, असं जाणवतं. जे अस्थिर आहे त्याचा आधार घेऊन मन स्थिर कसं होणार? जे अशाश्वत आहे, त्याचा आधार आज घेतला तरी त्या आधाराची उद्या शाश्वती नसल्यानं त्या आधारातून शाश्वत दिलासा कसा मिळणार? ज्याच्यात सदोदित परिवर्तन होत आहे आणि ज्याची अखेर नष्ट होण्यातच आहे अशा मिथ्या अर्थात असत्य संसाराला सत्य मानून मी त्यातच रममाण आहे. असत्याचीच आस आहे, असत्याचीच ओढ आहे, मनातल्या सर्व कल्पना, विचार, संकल्प हे असत्य प्राप्तीशीच जखडलेले आहेत त्यामुळेच अपेक्षाभंगाचं दु:ख आपण अनंत जन्म भोगत आहोत.. म्हणूनच समर्थ सांगतात, ‘‘मना अल्प संकल्प तो ही नसावा। सदा सत्य संकल्प चित्ती वसावा।’..
कर्मेद्र – अल्प संकल्प म्हणजे इच्छा करायचीच तर मोठय़ात मोठी करा.. लहानसहान कशाला? आणि मीही तर तेच म्हणतो.. आयुष्यात सर्व काही मिळवायचीच इच्छा ठेवा..
हृदयेंद्र – या चरणातला अल्पसंकल्पचा अर्थ तो नाही. अल्प म्हणजे अल्पावधीपुरतं जे टिकणार आहे, त्याची आस बाळगू नका! नाथांनी म्हटलंय, पाण्यावर बुडबुडे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात.. इतक्या वेगानं जीवन सरत असतं.. तेवढय़ा काळातही माणूस स्वत:साठी काय-काय मिळवू पहातो! आधीच अल्पकाळचं जीवन आणि त्यात अल्पकाळ टिकणाऱ्या गोष्टींसाठीची धडपड.. मग जे सदासर्वदा टिकणारे आहे, जे शाश्वत अर्थात सत्य आहे त्याचीच इच्छा का नको?
ज्ञानेंद्र – म्हणजे तू पुन्हा देवपदावर आलास! देवच शाश्वत मग देवाची इच्छाच धरा..
हृदयेंद्र – माझ्यापुरता आणि या अभंगापुरता हाच अर्थ आहे. तुझ्या दृष्टीनं तू वेगळा विचार करून बघ. असं पहा देवाचं सोडून दे.. माणूस जन्मतो आणि मरतो, आजवर कोटय़वधी माणसं जन्मली आणि मेली, हे तर तुला मान्य आहे?
ज्ञानेंद्र – यात अमान्य करण्यासारखं काय आहे?
हृदयेंद्र – म्हणजेच अनंत युगं कोटय़वधी-अब्जावधी माणसं जन्मली आणि मेली तरी मानवता कायम आहे! मग ती माणुसकीच शाश्वत मानून ती आपल्यात बाणावी, हाच सत्यसंकल्प समज.. जो खरा ‘माणूस’ होतो त्यालाच ‘देवमाणूस’ म्हणतात, नाही का?
चैतन्य प्रेम