मराठी माणूस आणि नाटक यांचे नाते अभेद्य असल्याचे सांगितले जाते, त्यात बव्हंशी तथ्यही आहे. पण नाटक करणारा मराठी माणूस कोणत्याही अतिरेकी स्पर्धेत सहसा सहभागी होताना दिसत नाही. विष्णुदास भावे यांनी १८४३ मध्ये पहिल्यांदा आधुनिक मराठी नाटक नावाचा कलाप्रकार सादर केला, तेव्हा त्यातील नावीन्यापोटी त्या वेळी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे स्वाभाविक होते. नंतरच्या काळात नाटक हे मराठी माणसाच्या जगण्याचे एक अतिशय महत्त्वाचे साधन होईल, याची अटकळ भावे यांनाही असली पाहिजे. कारण नंतरच्या ४० वर्षांत त्यांनी सारा भारत पादाक्रांत करून नाटकाची ही कला लोकप्रिय करण्याचा उद्योग केला. नंतरच्या संगीत नाटकांनी तर मराठी रंगभूमीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. सुवर्णमखरात बसलेल्या मराठी नाटकाने नंतरच्या सव्वाशे वर्षांत अनेक वाटावळणे घेत आपला प्रवास सुरू ठेवला.  व्यावसायिक आणि प्रयोगशील अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली. त्यातही काही नाटके त्यातील अनेक गुणांमुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य करून राहिली. ‘नटसम्राट’ या वि. वा. शिरवाडकरांच्या नाटकाने सत्तरच्या दशकात केलेले गारूड अजूनही उतरलेले नाही. डॉ. श्रीराम लागू आणि शांता जोग यांच्यासारख्या तेव्हाच्या अतिशय कसबी आणि प्रतिभावान कलावंतांनी शिरवाडकरांच्या कवितेसमान संवादांना जी लय प्राप्त करून दिली आणि त्यातील अर्थ ज्या कलात्मकतेने रसिकांपर्यंत पोहोचवला, त्याने हे नाटक म्हणजे मराठी माणसाच्या हृदयातील अंत:पुरातील सुगंधी कुपी होऊन बसले. डॉ. लागूंनी केलेल्या नटसम्राटाची सर कधी येणार नाही, असे म्हणतही दत्ता भट, यशवंत दत्त यांच्यापासून अनेक कलावंतांना हे नाटक सतत आव्हानात्मक वाटत आले. आता पुण्यात सलग ३१ तास ४५ मिनिटांच्या कालावधीमध्ये ‘नटसम्राट’ या नाटकाचे आठ प्रयोग करून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. हा विक्रम नाटकाचा होता, की त्यातील कलावंतांच्या शारीरिक क्षमतांचा हा प्रश्न उपस्थित होणे उचित आणि महत्त्वाचे आहे. नाटक ही कला माणसाला रंजनाच्याही पलीकडे नेत विचारप्रवर्तनाकडे पोहोचवू शकते. त्यातून व्यक्त होणाऱ्या आनंदाची तऱ्हा अन्य शारीर आनंदापेक्षा किती तरी उच्च प्रतीची असते, यात शंकाच नाही. मग ‘नटसम्राट’ नाटकाच्या सलग आठ प्रयोगांनी नेमके काय साधले? नाटक रसिकांपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचले, की त्यातील कलात्मकता आणि अभिजातता यांत वाढ झाली? गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अशा विक्रमाची नोंद झाली, हे चांगले झाले, परंतु नाटय़कलेला त्याचा नेमका कोणता फायदा झाला, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.
मागे प्रशांत दामले यांनीही असे सलग प्रयोग करून विक्रम प्रस्थापित केला होता. सलग आठ प्रयोग करण्यासाठी नटवर्गाकडे आवश्यक असणारी ऊर्जा तपासणे असे या विक्रमाचे स्वरूप होऊन बसते. काही तरी जगावेगळे, एवढेच काय ते त्याचे महत्त्व. न्यूयॉर्कमधील ‘ब्रॉडवे’मध्ये शेक्सपीअरच्या नाटकांचे प्रयोग गेली कित्येक दशके सुरू आहेत. ‘नटसम्राट’ नाटक आजही प्रेक्षकांना खिळवून ठेवते, म्हणून ते महत्त्वाचे. केवळ शारीरिक क्षमतांची स्पर्धा भरवून एक वेळ ‘सुपर हय़ुमन’ झाल्याचा आनंद मिळेल, पण हे नाटक अधिक टवटवीत झाले, असे मात्र म्हणता येणार नाही.