देहाच्या पोटी जन्माला येऊन देवाला दत्तक जाणंच या जन्मी साधायचं आहे, या हृदयेंद्रच्या उद्गारांनी योगेंद्रचा चेहरा उजळला. त्याच्या मुखातून ‘व्वा!’ असा उद्गार बाहेर पडला.
ज्ञानेंद्र – पुन्हा मुद्दा तोच, देव नेमका आहे कोण? हृदू म्हणाल्याप्रमाणे देहात वावरत असलेला सद्गुरू हाच समर्थाच्या उक्तीप्रमाणे ‘थोरला देव’, खरा देव असेलही, पण मला जर सद्गुरू नसेल किंवा अशा कोणत्याही मनुष्याला सद्गुरू मानून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागत राहाणे माझ्या बुद्धीला पटणारे नसेल, तर मग मी ‘देव’ कसा ओळखावा? ‘देव’ मानावाच का? देवाला दत्तक जाणं असो की हृदयात देवाचं चिंतन करणं असो, यासाठी तुमचं आस्तिक असणंच अध्याहृत धरलेलं नाही का? नास्तिकाला असं चिंतन साधणं शक्य नाही, असच अभिप्रेत आहे का?
हृदयेंद्र – तुझ्या प्रश्नाचं नेमकं उत्तर मला देता येईल की नाही, मला माहीत नाही.. बौद्धिक चर्चेत तू माझ्यापेक्षा सरस आहेस.. मी भावनेच्या अंगानं विचार करतो..
ज्ञानेंद्र – मलाही नुसत्या बौद्धिक चर्चेत रस नाही. आणि दोघांच्या चर्चेत जेव्हा एकजण निरुत्तर होतो, तेव्हा दुसऱ्याचं मतच सत्य असतं, असंही मी मानत नाही! मी माझ्याही मतांबाबत अंतर्मुख होऊन विचार करीत राहातो. माझी आई अत्यंत सश्रद्ध होती. भजनंही गोड आवाजात म्हणत असे. तिचा वावर सात्त्विकतेनं भारलेला असे. ‘देव’ म्हणजे नेमका कोण, हे तिला सांगता आलं नाही तरी देवावरचं तिचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. नसलेल्या देवाची भक्ती करूनही जर माणसं अशी सात्त्विक होणार असतील, तर देवाची संकल्पना घातक नाही, पण असं होत नाही. देवाची भक्ती करणारी माणसं कधी कधी अशी पशुवत वागतात की मग ती ‘भक्ती’ जशी खोटी तसाच तो ‘देव’ही खोटाच वाटतो.. मग मला प्रश्न पडतो देव खरा की खोटा. तो खोटा असेल तर किंवा तो खरा असूनही मी त्याला मानतच नसेन तर त्याचं चिंतन करण्याचा उपदेश माझ्या काय कामाचा?
योगेंद्र – मुळात ‘देव’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर तो विशिष्ट रुपात तो उभा राहातो. अशा एखाद्या विशिष्ट रुपात त्याला न पाहता त्यापलीकडे का विचार करू नये? ‘देव’ म्हणजे व्यापकत्व, असं का मानू नये? त्यामुळे या अभंगातला ‘देव’ हा परमतत्त्वाचाच द्योतक आहे, असं मला वाटतं. हा परमात्मा सर्वशक्तीमान आहे, तो चराचरात आहे, सर्वत्र, सर्वकाळ आहे.. ही वर्णनं काय दाखवतात? माणूस सर्वशक्तीमान आहे का? नाही. त्याच्या शक्तीला मर्यादा आहेत. शरीराच्या आधारावर माणूस जगतो आणि त्या शरीरालाही मर्यादा आहेत. सर्वात पहिली मर्यादा आकाराची आहे! जिथे आकार आहे तिथे मर्यादा आहेच. परमात्मा साकार स्वरूपात प्रकटत असला तरी तो निराकारही आहे. अर्थात त्याच्या शक्तीला मर्यादा नाही. त्यामुळेच तो सर्वशक्तीमान आहे. माणूस काळाच्या पकडीत आहे, परिस्थितीच्या पकडीत आहे. तो ज्या काळात, ज्या परिस्थितीत जन्मतो तिचा प्रभाव त्याच्या जगण्यावर पडतोच. अर्थात माणसावर काळ आणि परिस्थितीचं बंधन आहे, काळ-वेळ, परिस्थितीतून त्याच्या जगण्यात मर्यादा आली आहे. परमात्म्यावर मात्र काळाचं बंधन नाही. तो कालातीत आहे. त्याच्यावर परिस्थितीचा प्रभाव नाही. बरं, माणसाची मूलभूत ओढ, मूलभूत इच्छा काय असते? तर त्यालाही मर्यादा अर्थात संकुचितपणातून मुक्त व्हायचं असतं. काळाच्या सत्तेतून, परिस्थितीच्या बंधनातून त्याला मुक्त व्हायचं असतं. अर्थात माणसालाही सर्वशक्तीमान व्हावंसं वाटतंच. बंधनरहित व्हावंसं वाटतंच. हृदयेंद्र भक्तीच्या वाटेनं तो प्रयत्न करीत असेल, तू ज्ञानाच्या अंगानं स्वत:ला व्यापक करण्याचा प्रयत्न करत असशील. हृदयेंद्रसाठी त्याचा इष्ट देव हा ‘देव’ आहे, तुझ्यासाठी व्यापकत्व हा ‘देव’ आहे.. मनाचं व्यापकत्व, बुद्धीचं व्यापकत्व.. जिथे व्यापकत्व आहे तिथे स्वातंत्र्य आहे, मुक्तपणा आहे, बंधनरहितता आहे..
हृदयेंद्र – अगदी बरोबर.. आणि मनाला जर व्यापक व्हायचं असेल तर ते संकुचिताच्या चिंतनानं साधणार नाही! त्यासाठीच देहाच्या पोटी जन्माला येऊन ‘देवा’लाच दत्तक जायला हवं! ज्या घरी दत्तक जातो तिथले संस्कारच आपोआप होतात तसे ‘देवा’ला दत्तक गेल्यानं या संकुचित मनावर व्यापकत्वाचे संस्कार आपोआप होतील!
चैतन्य प्रेम