ज्या ज्ञानक्षेत्राच्या उगमापासून केवळ गरसमजच निर्माण झाले असे क्षेत्र म्हणजे सौंदर्यशास्त्र. नीती या संकल्पनेपेक्षा सुंदर ही संकल्पना अधिक दारुण आणि अतिशय क्रूरपणे हत्यार म्हणून वापरली गेली, सुंदरतेचा अस्सल चेहरा भीषण आहे, हा ठळक आक्षेप विसाव्या शतकात घेण्यात आला. तरीही सौंदर्यशास्त्र हा एक विचारविषय म्हणून सर्वप्रियच!

सौंदर्यशास्त्र (Aesthetics) ही तत्त्वज्ञानाची शाखा आहे. याला सद्भिरुचिशास्त्र, ललितकलांविषयी तत्त्वज्ञान, कलेचे तत्त्वज्ञान (Philosophy of Art) अशी नावे आहेत. तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ प्राध्यापक विवेक गोखले यांनी ‘आभिरौचिकी’ अशी संज्ञा सुचविली आहे.  
‘सुंदर’ या शब्दाने एखाद्या गुणधर्माचा निर्देश होतो का? असल्यास त्याची व्याख्या करता येते का? त्याचे निकष देता येतात का? म्हणजे (१) कोणत्या गोष्टी सुंदर आहेत? कोणत्या गुणांमुळे त्या सुंदर ठरतात? सौंदर्याचे निकष कोणते? (२) सौंदर्य या संकल्पनेची ताíकक वैशिष्टय़े कोणती? सौंदर्यविधानाचे स्वरूप काय? हे सौंदर्यशास्त्राचे प्रश्न आहेत.
कला आणि ज्यात सौंदर्यानुभव आणि सौंदर्यमूल्ये यांचा संबंध येतो त्या परिस्थितीचा अभ्यास सौंदर्यशास्त्र करते. म्हणजे कलेची तात्त्विक चिकित्सा आणि सौंदर्यात्मक प्रतिक्रिया आणि सौंदर्य विधानांचे ताíकक विश्लेषण यांचा अभ्यास यात होतो. कला म्हणजे काय? कलाकृती किंवा निसर्गदृश्य पाहताना ज्या अभिवृत्तीने आपण प्रेरित होऊन पाहतो त्या अभिवृत्तीचे स्वरूप काय? सौंदर्यानुभव म्हणजे नेमका कोणता अनुभव? त्याचे निकष कोणते? कलावस्तूच्या स्वरूपाचे आणि कलास्वादाचे, रसग्रहणाचे स्वरूप व निकष कोणते? स्थलकालसापेक्ष असते की निरपेक्ष असते? कला व नीती, कला व धर्म यांचा संबंध असतो का? याचा अभ्यास सौंदर्यशास्त्रात होतो.  
हे प्रश्न समीक्षात्मक विधानांच्या व त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांच्या ताíकक स्वरूपाविषयीचे प्रश्न आहेत, हे लक्षात घेतले तर सौंदर्यशास्त्राचे स्वरूप असे होईल : कलाकृती व इतर सुंदर वस्तू यांच्याबद्दल विधाने ही सौंदर्यविधाने असतात. त्यांची चिकित्सा करताना जी विधाने केली जातात, त्यात वापरल्या गेलेल्या संकल्पनांचे ताíकक विश्लेषण करणे हे सौंदर्यशास्त्राचे एक प्रमुख कार्य आहे.    
सौंदर्यशास्त्र हे विज्ञान नाही, त्याचप्रमाणे ते तंत्रविद्याही नाही. म्हणून सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाने माणसाला कलाकृती निर्माण करण्याचे तंत्र कळेल, असे नाही. त्याचप्रमाणे अरसिक माणसाला रसिक बनविण्याचे कार्यही सौंदर्यशास्त्राचे नाही. सौंदर्यशास्त्र हे समीक्षाव्यापारात वापरल्या जाणाऱ्या संकल्पनांचे, संज्ञांचे, मूल्यविधानांचे, सौंदर्यादी संकल्पनांच्या निकषांचे शास्त्र आहे. ज्या संकल्पनाव्यूहामुळे आपले समीक्षाव्यापार सिद्ध होतात त्याचा संपूर्ण नकाशा आपल्यापुढे उभा करणे हे सौंदर्यशास्त्राचे कार्य आहे. सौंदर्यविषयक जाणिवा निर्माण करणे हे सौंदर्यशास्त्रज्ञाचे काम नव्हे, असे समीक्षक रा. भा. पाटणकर अचूकपणे स्पष्ट करतात.
प्राचीन ग्रीक काळापासून सौंदर्यशास्त्र बरेच निसरडे व वादग्रस्त ठरले. त्यामुळे अनेकांनी कायमच कठोर आणि उपहासपूर्ण टीका केल्या. जे. ए. पसमोर या तत्त्वचिंतकाने Dreariness of Aesthetics सौंदर्यशास्त्रातील भयाणपणा, असा लेख लिहिला, तर सी. डी. ब्रॉडच्या मते हा ‘अतिशय कंटाळवाणा.. भंपक विषय’ आहे. आयर्विंग बॅबिट हा तत्त्ववेत्ता Nightmare Science  – ‘भयावह विज्ञान’ म्हणतो.
विसाव्या शतकाच्या अखेरी भाषाशास्त्र, साहित्यशास्त्र, मूल्यशास्त्र तसे ललितकला, सिनेमा, फोटोग्राफी, व्हिडीओ आणि इलेक्ट्रॉनिक व संगणकीय कलांचा विकास झाला. परिणामी अनेक स्वयंघोषित सौंदर्यशास्त्रज्ञ जन्माला आले. याचा घातक सामाजिक परिणाम इंटरनेटवरही दिसतो. Aesthetics, Aesthetician , Beauty असे शब्द शोधयंत्राला दिले की ते सुगंधी पावडरी, तेले, फॅशनी, नेलपॉलिश इत्यादी सौंदर्य प्रसाधनांची ‘स्थळे’ दाखविते. एका अर्थाने ते सौंदर्यशास्त्राची जागा दाखविते. भरीस भर म्हणून ब्युटी पार्लर्सच्या संचालिका स्वत:ला सौंदर्यशास्त्रज्ञ म्हणवून घेतात!    
विशेषत: भाषासमीक्षा आणि सौंदर्यशास्त्र यांचा तोंडवळा सारखा असल्याने तत्त्वचिंतकापेक्षा साहित्यिक आणि भाषेचे अभ्यासक सौंदर्यशास्त्रावर (चिंताजनक) लेखन करू लागले. सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी किंवा ते शिकविण्यासाठी अभ्यासकाला साहित्याचे ज्ञान, समीक्षेचे ज्ञान असणे आवश्यक आहेच; पण वस्तुनिष्ठ संकल्पनात्मक चिकित्सेसाठी तत्त्वज्ञानाचे ज्ञान अनिवार्य असते, याचे भान विसरले गेले.
आधुनिकोत्तर काळात सौंदर्यशास्त्राबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला. सौंदर्यशास्त्राचा सुंदर चेहरा बिघडला! विशेषत: मिशेल फुको (१९२६-८४) या फ्रेंच विचारवंताने सौंदर्यशास्त्र हा राजकीय सत्तेचा खेळ आहे, हे सिद्ध केले. परिणामी देरीदा, रिचर्ड रॉर्टी, पॉल डीमॅन यांनी बरेच जोरदार आक्षेप घेतले. सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये दडलेली प्राणी हत्या आणि इतर कुरूपता हा तर भयानक विषय आहे.    
स्त्रीवादानेही एकूण जागतिक सौंदर्यशास्त्रावर मोठा आक्षेप घेतला. त्यातून Womanism  ही स्वतंत्र स्त्री चळवळ अस्तित्वात आली. Womanism  म्हणजे काळा स्त्रीवाद. ‘काळे तेच सुंदर’ ही यांची घोषणा आहे.Feminism  म्हणजे गोरा स्त्रीवाद. काळा स्त्रीवाद काळ्या स्त्रीचे दु:ख मांडतेच पण तो काळ्या पुरुषाचेही दु:ख चव्हाटय़ावर आणतो, असा दावा काळा स्त्रीवाद करतो. भारतीय विचारविश्वात हा आक्षेप १९८०च्या दशकात ‘दलित सौंदर्यशास्त्रा’चे आव्हान या रूपात आला. ज्ञान, विचार, नीती आणि सौंदर्य या मुख्य तत्त्वांसंदर्भात सूक्ष्म हिंसेचे राजकारण करून ते नेहमी जिंकत राहतात, हा त्यांचा मुख्य आक्षेप आहे.     
भारतात सौंदर्यशास्त्राला प्राचीन परंपरा आहे. पण ते संस्कृत साहित्यशास्त्र या नावाने विकसित झाले. सौंदर्यशास्त्र या नावाने नाही. त्यात कलामीमांसा आणि साहित्यमीमांसा दोन्हीचा समावेश होतो. शब्दार्थ विचार, अलंकार, रीती, ध्वनी, वक्रोक्ती, रस या यातील मुख्य संकल्पना असून, भरतमुनी (इ.स.पू. पहिले शतक) ते जगन्नाथ पंडित (१७ वे शतक) असा व्यापक पट या परंपरेचा आहे. पण भारतीय सौंदर्यशास्त्र मूलत: वैदिक आहे, त्यात जैन आणि बौद्ध दर्शने व धर्म यांच्यातील कलाविचारांचा समावेश केला जात नाही. प्राचीन भारतीय मीमांसेत अभिजात संस्कृतीमध्ये आणि केवळ संस्कृत ग्रंथामध्ये ग्रथित झालेलीच मीमांसा येते. त्यात अन्य सांस्कृतिक उपप्रवाहांची मीमांसा अभिप्रेत नाही, अर्थातच ही भूमिका योग्य नाही. आपली साहित्य जिज्ञासा संस्कृतच्या शिवेपाशी खुंटणे हे काही बरे नाही, असे मत प्रसिद्ध विचारवंत व भाषातज्ज्ञ अशोक केळकर यांनी व्यक्त केले आहे.
मराठीत सौंदर्यशास्त्रावर उदंड लेखन झाले. तो वेगळ्या स्वतंत्र मोठय़ा लेखनाचा विषय आहे. ब्राह्मणी-अब्राह्मणी असा वादही त्यातून निर्माण झाला. पण मराठीतील लेखनामुळे सौंदर्यशास्त्राचे मूळ तत्त्वज्ञानात असताना ते मराठी समीक्षेची मिरासदारी बनली. तत्त्वज्ञानाचा पायाच नसल्याने बहुतेक लेखन ठिसूळ राहिले. मर्ढेकर, शरद पाटील, सुरेंद्र बारिलगे, मे. पुं. रेगे, प्रभाकर पाध्ये, रा. भा. पाटणकर यांच्यापर्यंत लेखनाच्या तात्त्विक पातळीची जाणीव होती, पण नंतर ती दुर्दैवाने राहिली नाही, असे खेदाने म्हणावे लागते.       
  सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या ‘त्याचे सौंदर्यवाचक विधान’ या विनोदी लेखात सौंदर्यशास्त्राची योग्य टिंगल (आणि टवाळी) केली आहे. त्यांच्या विवेचनात ते काही विधाने करतात आणि त्या प्रत्येकाला एकेक आद्याक्षर देतात. त्यातून अखेरीस एक वाक्य तयार होते. ‘एक अक्षर कळलं तर शपथ!’ अर्थात पुलंना टवाळीचा विषय तत्कालीन मराठी लेखकांनी अतिशय अवघड लेखन करून दिला, त्यात काही मान्यवरांचाही समावेश आहे.
*  लेखक संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे तत्त्वज्ञान विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक आहेत.  ई-मेल: tattvabhan@gmail.com

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी