संजय बारू यांच्या पुस्तकामुळे घटकाभर करमणूक होत असली तरी पंतप्रधानपदाचे खरे नुकसान होणार आहे ते पी सी पारख यांच्या लिखाणामुळे.. दूरसंचार खात्यात ए राजा यांनी केले ते कोळसा खात्यात खुद्द पंतप्रधानांच्या कार्यालयातून- सिंग यांच्या नाकर्तेपणामुळे- घडले, हा पारख यांचा ठपका नाकारणे सिंग आणि काँग्रेस यांना शक्य होणार नाही.
अधिकाराचा गैरवापर हा ज्याप्रमाणे भ्रष्टाचार ठरतो त्याचप्रमाणे अधिकाराचा न-वापर हा देखील भ्रष्टाचारच असतो. मनमोहन सिंग हे यातील दुसऱ्या प्रकाराचे ठरतात. म्हणून ते कमी दोषी आहेत असे म्हणता येणार नाही. सिंग यांच्यासमवेत काम केलेले आणि त्यांच्या निर्नायकतेला कंटाळून ज्यांनी राजीनामा दिला ते कोळसा खात्याचे माजी सचिव पी सी पारख यांच्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर : कोलगेट अ‍ॅण्ड अदर ट्रथ्स या पुस्तकात सिंग आपल्या कर्तव्यास कसे चुकत गेले याचा साद्यंत आढावा आहे. त्या आधी पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांनी पंतप्रधान सिंग यांच्यापेक्षा काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हातीच कशी सत्तेची दोरी होती याची समग्र कथा आपल्या पुस्तकात सादर केली आहे. बारू यांच्या पुस्तकातील काही महत्त्वाचा अंश आम्ही रविवारी प्रकाशित केला. बारू यांनी सिंग यांचे वर्णन योगायोगाने झालेले पंतप्रधान असे केले आहे. ते पूर्ण खरे म्हणता येणार नाही. योगायोगाने या शब्दात एक प्रकारची निष्क्रियता वा तटस्थता अनुस्यूत आहे. सिंग तसे नव्हते. सत्ताधाऱ्यांना विश्वास वाटेल आणि कोणत्याही प्रकारचे आव्हान आपल्याकडून निर्माण होणार नाही याची काळजी घेत सिंग हे नेहमी सत्ताकारणात योग्य दिशेलाच राहिलेले आहेत. मग ते रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नरपद असो की देशाचे अर्थमंत्रीपद. सत्ताधाऱ्यांची गैरसोय होणार नाही, असेच त्यांचे वर्तन होते आणि त्याचमुळे सोनिया गांधी यांचे कट्टर विरोधक असलेल्या नरसिंह राव यांनादेखील सिंग जवळचे होते आणि सोनिया गांधींच्या हाती सत्ता आल्यावर गांधी यांनीही सिंग यांच्या बाजूनेच कौल दिला. यामागील प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे सिंग यांची विद्वत्ता आणि निष्कलंक चारित्र्य. अलीकडच्या राजकारणातील या दुर्मीळ गुणांचा समुच्चय सिंग यांच्या अंगी असूनदेखील त्यांचा मोठेपणा हा की ते वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला नेहमीच मुरड घालत राहिले. त्यामुळे जो कोणी सत्ताधारी असेल त्याची इमानेइतबारे.. आणि प्रसंगी आंधळेपणानेदेखील.. सेवा करणे हेच सिंग यांचे कायमचे वैशिष्टय़ राहिलेले आहे. हे असे वागण्याचे कौशल्य विकसित करणे हे नक्कीच कौतुकास्पद असते. त्याचमुळे काहीही न मागता सिंग यांना अलगदपणे सर्व काही मिळाले. पंतप्रधानपदी सलग दहा वर्षे राहण्याची संधी जर एखाद्यास मिळत असेल तर ती काही राजकारण कळत नाही म्हणून नव्हे. तर उलट अशी व्यक्ती अन्यांच्या तुलनेत अधिक चतुर राजकारणी आहे म्हणूनच हे साध्य होते, हे आधी ध्यानात घ्यावयास हवे. तेव्हा सिंग हे काही राजकारणी नाहीत, असे ज्यांना कोणास वाटत असेल.. वा होते.. तो केवळ सत्याचा अपलाप आहे. सिंग हे राजकारणी म्हणून इतरांपेक्षा किती तरी अधिक उजवे ठरतात.
फक्त त्यांचा दोष हा की आपले हे राजकारणीपण त्यांनी कधी मान्य केले नाही आणि वास्तवाकडे डोळेझाक करीत ते स्वत:लाच फसवीत गेले. सोनिया गांधी यांनी जेव्हा त्यांच्या आतल्या आवाजाला स्मरून पंतप्रधानपद अव्हेरले आणि नंतर पुढे मनमोहन सिंग यांना त्या पदावर बसवण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा या पदाच्या लोण्याबरोबर काय काय बडगे येणार आहेत, याचा अंदाज त्यांना असावयास हवा होता. सिंग यांचे सरकारबरोबरचे आयुष्यभराचे साटेलोटे लक्षात घेता त्यांना तो नव्हता असे कदापिही म्हणता येणार नाही. पंतप्रधानपद स्वीकारले तेव्हा त्यांनी नोकरशहाच्या नजरेतून राजकारण पाहणे सोडावयास हवे होते. ते त्यात पूर्णत: कमी पडले. त्याचमुळे पाठोपाठ प्रकाशित पुस्तकांतून त्यांना नामुष्की सहन करावी लागली. या दोन पुस्तकांपैकी पारख यांचे पुस्तक अधिक महत्त्वाचे. अशासाठी की पारख हे बारू यांच्याप्रमाणे प्रसिद्धी व्यवसायाशी संबंधित नाहीत. बारू हे आधी पत्रकार होते. अलीकडच्या काळात पत्रकारितेतील ज्येष्ठतेची शिडी वापरून सरकार दरबारातील मोक्याची पदे पदरात पाडून घेताना अनेक दिसतात. त्यातील काही कमरेचे सोडून कोणा एका पक्षाचे प्रवक्ते होतात आणि सुमार युक्तिवादातून त्यामागे सैद्धान्तिकता असल्याचा दावा करीत आपली निष्ठा दाखवीत राहतात तर दुसरे अधिक धैर्यवान मागच्या दाराने आपली राज्यसभेवर वा विधान परिषदेवर वर्णी लागेल याची व्यवस्था करतात. खेरीज आपली तथाकथित सैद्धान्तिकता वेळप्रसंगी वेगवेगळय़ा पक्षांच्या दाराशी बांधण्यात या पत्रकारांना कमीपणा वाटत नाही. एम जे अकबर हे याचे अलीकडचे ढळढळीत उदाहरण. तेव्हा बारू यांच्या पुस्तकामुळे घटकाभर करमणूक होत असली तरी पंतप्रधानपदाचे खरे नुकसान होणार आहे ते पारख यांच्या लिखाणामुळे. पारख हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्याचमुळे कोळसा खाणींची कंत्राटे वाटपात भ्रष्टाचार होत असल्याचे आणि तो थांबविण्यात अपयश येत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी थेट राजीनामा दिला. तो दिल्यानंतर निरोपासाठी पंतप्रधानांची भेट घेण्यास ते गेले असता सिंग हेदेखील त्यांना आपल्याइतकेच उद्विग्न वाटले. त्या आधी काही खासदारांनी पारख यांचा अपमान केला होता आणि त्याची तक्रार त्यांनी थेट पंतप्रधान सिंग यांच्याकडे केली होती. तिची दखल घेऊन काही कारवाई करण्याऐवजी सिंग यांनी उलट पारख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि तुमचा एकदाच अपमान झाला, माझा तर दररोज होत असतो, अशा स्वरूपाचे विधान केले. ही घटना असत्य मानण्याचे काहीही कारण नाही कारण पारख यांनी तीबाबत लिहिल्यावर माजी मुख्य केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव टीकेएस नायर यांनी त्यास जाहीर अनुमोदन दिले आहे. उलट या वा अशा छोटय़ा कारणामुळे राजीनामा देणे योग्य नाही असा सिंग यांचा पारख यांना सल्ला होता. त्या आधी या प्रश्नावर खुद्द पंतप्रधान सिंग यांनी आखलेल्या धोरणास सिंग यांचेच मंत्री कवडीची किंमत देत नव्हते, असे पारख यांनी सोदाहरण नमूद केले आहे. कोळसा खाणी उत्खननाचे अधिकार हे लिलावातून दिले जावेत, ज्याची बोली अधिक रकमेची त्याला खाणींचे कंत्राट दिले जावे असे सिंग यांचे म्हणणे होते. त्याकडे काँग्रेसच्या नेत्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले आणि आपल्या मर्जीप्रमाणे कंत्राटे देण्याचा सपाटा लावला. वर्तमानपत्रे चालवणाऱ्यांपासून ते लहानमोठय़ा उद्योगपतींपर्यंत ज्यांनी कोणी मलिदा दिला त्यांना ही खाणींची कंत्राटे खिरापतीप्रमाणे वाटली गेली. म्हणजे दूरसंचार खात्यात ए राजा यांनी केले ते कोळसा खात्यात खुद्द पंतप्रधानांच्या कार्यालयातून घडले. या सगळय़ाच्या मुळाशी आहे तो सिंग यांचा नाकर्तेपणा असा स्पष्ट ठपका पारख यांनी आपल्या पुस्तकात ठेवला असून तो नाकारणे सिंग वा काँग्रेस या दोघांनाही शक्य होणार नाही.
या सगळय़ातून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी किती गरीब बिच्चारे वगैरे स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त होईल. परंतु ती अस्थानी असेल. याचे कारण पंतप्रधानपदावरील व्यक्तीने गरीब केविलवाणे होणे हे त्या व्यक्तीस आणि व्यवस्थेस दोघांनाही मारक असते. सिंग इतके गरीब आधी होते तर त्यांनी पंतप्रधानपद घेण्याआधीच विचार करावयास हवा होता आणि तसा करून ते पद घेतले असेल तर त्या पदाबरोबर येणारे अधिकार वापरावयास हवे होते. गोठय़ात राहावयाचे असेल तर गाई-म्हशींच्या मलमूत्राचा वास येतो, अशी तक्रार करून चालत नाही.