फ्लोरिडा आणि न्यूयॉर्क. अमेरिकेच्या या दोन राज्यांत, काही तासांच्या फरकाने एकाच प्रकारची घटना घडली. बंदूकधाऱ्याकडून पोलिसावर गोळीबार, त्यात पोलिसाचा वा अधिकाऱ्याचा मृत्यू, असे या घटनेचे स्वरूप; परंतु फ्लोरिडातील कुणा माकरे अँटोनिओ परिला (ज्यु.) या २३ वर्षांच्या तरुणाने तेथील चार्ल्स कोंडेक या पोलीस अधिकाऱ्यावर गोळी झाडली आणि रविवारी कोंडेकचे निधन झाले, ही बातमी फार कुठे पोहोचली नाही. जगभर पोहोचली ती न्यूयॉर्कमधील दोन पोलिसांना एका ‘कृष्णवर्णीय’ तरुणाने ठार केल्याची बातमी. न्यूयॉर्कच्या त्या तरुणाचे नाव इस्माइयल ब्रिन्सली. ब्रूकलिन भागात, वेन्जिआन लिउ आणि राफेल रामोस या दोघा पोलिसांवर त्याने गोळ्या झाडल्या, त्यापैकी लिउ हा आशियाई (पीतवर्णी) वंशाचा होता आणि रामोस हा हिस्पॅनिक वंशाचा. तरीही, मारणारा कृष्णवर्णीय म्हणून त्याने मारलेले दोघे पोलीस ‘गोरे’च, असा गवगवा झाला. हा सारा वर्णावर्णाचा गलबला प्रगल्भ म्हणविल्या जाणाऱ्या अमेरिकी वृत्तपत्रांनी केला. या ब्रिन्सलीबद्दल माहिती लगोलग लोकांपर्यंत धडकू लागली. त्याच्यावर १८ गुन्हे दाखल आहेत. त्याने आधी मैत्रिणीला ठार करण्याचा प्रयत्न केला आणि तसाच ब्रूकलिनला येऊन पोलिसांवर गोळ्या झाडल्या, हे सारे तपशील त्याला मानसिक तोल ढळलेला गुन्हेगारी प्रवृत्तीचा माथेफिरू ठरविण्यास पुरेसे होते.. पण ते एरवी! ब्रिन्सली कृष्णवर्णीय आहे. त्यामुळे या साऱ्यापेक्षा महत्त्वाचे ठरले ते निराळेच तपशील. ब्रिन्सलीला सूडच घ्यायचा होता, तशा अर्थाचे शब्द त्याने इन्स्टाग्राम या समाजमाध्यमातील त्याच्या मैत्रिणीच्या खात्यावर- तिच्यावर गोळी झाडल्यानंतर- लिहिलेसुद्धा होते, हे अमेरिकी ‘मुख्य धारे’तील प्रसारमाध्यमांना महत्त्वाचे वाटते? हा सूड कशाचा? मैत्रिणीचा नव्हे, पोलिसांचाही नव्हे.. तर समस्त कृष्णवर्णीयांच्या वतीने ब्रिन्सलीने सूड घेतला, असे प्रसारमाध्यमांना ठसवायचे आहे. ब्रिन्सलीला असा वांशिक सूड घेऊन नायक बनायचे होते का, हा प्रश्न आता अनुत्तरितच राहील, कारण पोलिसांवरील गोळीबारानंतर काही मिनिटांतच त्याने स्वत:वरही गोळ्या चालवल्या आणि जागीच तो कोसळला. कृष्णवर्णीयांचा राग अमेरिकी पोलिसांवर असण्याची कारणे अनेक आहेत; परंतु आधी फर्गसन आणि मग न्यूयॉर्क या शहरांत कृष्णवर्णीय तरुणांना केवळ संशयावरून ठार मारणारे पोलीस ‘निदरेष’ ठरतात, हे गेल्या दोनच महिन्यांत अमेरिकी कृष्णवर्णीयांनी पाहिले. फर्गसनमध्ये तर, पोलिसांना निदरेष ठरवणाऱ्या निकालानंतरचा उद्रेक केवळ निषेधाचा नव्हता. ती दंगलच होती आणि जणू सुडाचे समाधानच यातून एक समूह मिळवत होता. न्यूयॉर्कमध्ये एका कृष्णवर्णीयाला पोलिसांनी गळा दाबून मारले, असा आरोप कृष्णवर्णीय आंदोलक करीत होते. मात्र, हा मृत्यू श्वास आपसूकच घुसमटल्याने झाल्याची पोलिसांकडील नोंद अजिबात बदलणार नव्हती. अमेरिकी प्रसारमाध्यमे ज्याला ‘सूड’ म्हणून महत्त्व देताहेत, तो या दोनच घटनांचा नव्हे, तर अपमानांच्या मालिकेचा सूड असू शकतो. पोलिसी खाक्याचा हिसका नेहमी गौरेतरांना- म्हणजे कृष्णवर्णीयांना, शीख वा मुस्लिमांसारखी दाढी वाढवणाऱ्यांना किंवा काळ्या आशियाईंना का दिसतो, असा प्रश्न पडण्याचे क्षण ९/११ नंतर वारंवार आलेले आहेत. व्यवस्थेने कोणातही भेदभाव करू नये, असा आग्रह धरणाऱ्यांना ‘हेकट बुद्धिवादी’ वगैरे ठरवून हसण्याची पद्धत अमेरिकेमध्ये नाही; परंतु गेल्या काही महिन्यांतील अनुभव भेदभावाचाच असल्याची भावना जोर धरते आहे. या पाश्र्वभूमीवर न्यूयॉर्कच्या दोघा पोलिसांनी प्राण गमावल्यावर ‘केवळ पोलीस आहोत हा आमचा गुन्हा काय?’ असा सूर पोलिसांच्या संघटनेने लावला. क्षोभाला क्षोभाने उत्तर मिळते तेव्हा समाजातील भेद कटू होतात, हे न्यूयॉर्कच्या पोलिसांना बहुधा माहीत नसावे.