‘आय अ‍ॅम नॉट हम्बल पर्सन अँड आय अ‍ॅम नॉट स्टुपिड; आय नो आय अ‍ॅम अ पोएट दॅट हॅज अफक्टेड धीस नेशन’ असं सार्थ गौरवानं म्हणणारे इजिप्तचे क्रांतिकारी कवी अहमद फऊद नेग्म ऊर्फ अल फगूमी यांचं मागच्या आठवडय़ात दीर्घ आजाराने कैरो इथं निधन झालं.
नेग्म वयाच्या सातव्या वर्षी अनाथ झाले. त्यांचं शिक्षणही फारसं झालं नव्हतं. घरचीही पराकोटीची गरिबी होती. त्यांनी घरगुती कामगार म्हणून काम केलं. पण त्यांच्या कवितांनी मात्र माजी राष्ट्राध्यक्ष गामल अब्दुल नासेर, अन्वर सादत आणि होस्नी मुबारक यांना चांगलंच अडचणीत आणलं होतं. त्यामुळे त्यांना एकंदरीत १८ र्वष तुरुंगात काढावी लागली.  पण त्यांनी राजकीय नेत्यांवर कविता लिहिणं थांबवलं नाही आणि आपली राजकीय भूमिकाही बदलली नाही. ते अतिशय कडक शब्दांत राजकीय नेत्यांवर टीका करत.
नेग्म ‘लोकांचे कवी’ म्हणून ओळखले जात. २०११मध्ये मुबारक यांच्या विरोधात तहरीर चौकात उतरलेल्या नागरिकांनी नेग्म यांच्या कवितेचं वाचन केलं होतं.