चला, आता हे एक ठीकच होईल, की महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी जी रंगीबेरंगी, चित्रविचित्र वेशभूषा करून असांस्कृतिक चाळवाचाळव करतात त्याला चांगलाच चाप बसेल! या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येताना वसने कशी आणि कोणती ल्यावीत यावर कोणाचे काही नियंत्रणच नव्हते. काही काही मुले तर चक्क टी-शर्ट वगरे घालून महाविद्यालयांत येतात. मुलींचे तर काही विचारूच नका. जीनच्या प्यांट घालतात त्या! हे म्हणजे केवढे अध:पतन! आपली शैक्षणिक संस्कृती व परंपरा काय आणि हे चाललेय काय?  विद्यार्थ्यांच्या या उच्छृंखल फ्याशनींमुळेच आपली महन्मंगल परंपरा लयास चालली आहे आणि विनयभंगापासून बलात्कारापर्यंतच्या दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. पण आता काळजीचे कारण नाही. अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरू लेफ्ट. जन. (निवृत्त) झमीरुद्दीन शाह यांनी हा भारतीय शिक्षण व्यवस्थेतील एक महामहत्त्वाचा मुद्दा हाती घेतलेला आहे. शाह यांनी लष्करी शिस्तीत अनेक वर्षे काढलेली असल्यामुळे त्यांचा थेट कृतीवर अधिक जोर दिसतो. म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांच्या वेशभूषेबद्दल एक फतवाच जारी केला आहे. त्यानुसार, यापुढे एखाद्या विद्यार्थ्यांस त्यांना भेटावयाचे असेल, तर त्यास शेरवानीच परिधान करावी लागणार आहे. केवळ जनरलसाहेबांना भेटण्यापुरतेच नाही, तर दर शुक्रवारी आणि विद्यापीठातील सभा-समारंभांच्या दिवशीही विद्यार्थ्यांना शेरवानी घालावी लागणार आहे आणि समजा एखाद्या विद्यार्थ्यांकडे शेरवानी नसेल तर? तर सध्या त्याने ती दुसऱ्याकडून उसनी घ्यावी आणि दरम्यानच्या काळात स्वत:ची शिवावी. प्रवेशाच्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्यांला विद्यापीठाकडून शेरवानीचे महावस्त्र सशुल्क दिले जातेच. जनरलसाहेबांनी विद्यार्थिनींसाठी अशी काही वस्त्र योजना अद्याप जाहीर केलेली नाही. त्यांनी आपल्या म्हणजे विद्यापीठाच्या रूढी-परंपरेनुसार वस्त्रभार ल्यावा हीच त्यांची माफक अपेक्षा आहे. आता विद्यापीठाच्या या रूढी-परंपरा कोठून आल्या हे काही त्यांनी सांगितलेले नाही, पण आपण त्याचा अंदाज लावू शकतो. जनरलसाहेबांच्या या परंपरासंवर्धक फतव्यामुळे केवळ अलिगढ विद्यापीठातीलच नव्हे, तर देशातील तमाम महाविद्यालयांना एक धोरणात्मक दिशा मिळणार आहे. सर्व समाजधुरीण आणि संस्कृतिमरतडांनी जनरलसाहेबांच्या या वस्त्रोद्योगास हातभार लावला, तर स्वदेशीची ही दुसरी लढाई आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. आमच्या दृष्टीसमोर तर आताच ते विजयी चित्र तरळत आहे की, बनारस विद्यापीठात सर्व विद्यार्थी असे सोवळ्याने अभ्यास करीत आहेत. पुणे विद्यापीठातील तमाम विद्यार्थ्यांच्या डोईवर पुणेरी पगडी आहे आणि नऊवारीचा पदर सांभाळत मुली अभ्यास करीत आहेत. (म्हणजे पुणे विद्यापीठात रोजच पाडव्याच्या शोभायात्रा!) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील मुले परण आणि धोतर नेसून विद्यापीठाच्या वावरांतून वावरत आहेत. मुंबई विद्यापीठात जरा अडचण आहे. तेथे साहेबी परंपरा मानायची की मूलवासी भंडारी-कोळी परंपरा सांगायची, असा प्रश्न आहे. त्यावर उपाय म्हणून पूर्वीच्या रावबहादुरांप्रमाणे वर कोट, त्यास टाय आणि खाली धोतर असे ‘रीमिक्स’ करता येईल. एकदा हे असे सर्व विद्यापीठांचे बराकीकरण व विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक रेजिमेंटीकरण करून झाले, की मग आपण शैक्षणिक गुणवत्तावाढ वगरे गोष्टींकडे वळू शकू. नाही तरी गुणवत्तावाढ या गोष्टीचा समावेश आपण अद्याप रूढी आणि परंपरेत केलेलाच नाही! तेव्हा त्याचे काय बरे एवढे?