पुणे जिल्ह्य़ातील माळीण नावाचे एक गाव काही दिवसांपूर्वी भूस्खलनामुळे काळाच्या उदरात गडप झाले आणि भीमाशंकराच्या परिसरातील पडकई योजनेची चर्चा पुन्हा सुरू झाली. याच योजनेमुळे आंबेगाव तालुक्यातील महादेव कोळी, ठाकर व कातकरी या आदिवासींना जगण्याचा एक ‘शाश्वत’ मार्ग सापडला आहे. मंचर-आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील आदिवासींना संघटित करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे ‘शाश्वत’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक सदस्य आनंद हरदेव कपूर यांनी गेली ३० वर्षे या भागात कामाचे जाळे उभे केले. राज्य सरकारच्या आदिवासी उपयोजना समितीचे सदस्य, पडकई योजनेचे जनक, डिंभे धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा लढा उभारणारे सेनापती, आदिवासी मच्छीमार सहकारी संस्थेचे संस्थापक अशी अनेक रूपे असलेल्या आनंद कपूर यांचे गेल्या शुक्रवारी, २४ ऑक्टोबरला निधन झाले.
आनंद कपूर आणि त्यांची पत्नी कुसुम कर्णिक यांनी १९८१ मध्ये आंबेगाव तालुक्यातील आदिवासी परिसरालाच आपले घर मानले आणि या परिसराच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासींच्या शाश्वत विकासाच्या कामात झोकून दिले. डिंभे धरण प्रकल्पात विस्थापित झालेल्या आदिवासींना जगण्याचा नवा मार्ग शोधून देण्यासाठी धरणातच मासेमारी करता यावी यासाठी आनंद कपूर आणि कुसुम कर्णिक यांनी पुढाकार घेतला. १९८३ मध्ये शाश्वत संस्थेची नोंदणी झाली. त्या काळी, स्फोटकांचा वापर करून मासेमारी केली जात होती. पण त्यामुळे माशांच्या प्रजातींचे अस्तित्वच धोक्यात आले. खरगपूरच्या आयआयटीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या या बुद्धिमंताने आदिवासींना आपलेसे केले आणि सोप्या मासेमारीतून जगण्याचा पहिला मार्ग दाखविला. याच परिसरातील १६५ शेतकरी कुटुंबांच्या शेतात शाश्वतने कृषी पंप बसवून दिले. त्याआधी, डोंगरउतारावरील पडीक जमिनी लागवडीयोग्य करण्याच्या प्रयोगामुळे ३८ गावांतील कुटुंबांच्या चुली दोन्ही वेळा पेटू लागल्या. आदिवासींची मुले शाळेत जाऊ लागली. बालवाडय़ांमध्ये बालकांच्या बडबडगीतांचे बोल घुमू लागले. नापासांनी शिक्षण अर्धवट सोडू नये, यासाठी एक निवासी प्राथमिक शाळादेखील सुरू झाली आणि आदिवासी महिला-मुलांच्या आरोग्याची काळजी घेणारी आरोग्य शिबिरे आदिवासी पाडय़ात भरू लागली. ‘संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमा’अंतर्गत (यूएनडीपी) इक्वेटर इनिशिएटिव्ह हा प्रतिष्ठेचा पुरस्कार २०१२ मध्ये शाश्वतला जाहीर झाला. पुणे जिल्ह्य़ाच्या एका उपेक्षित कोपऱ्यात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल ब्राझीलमध्ये झालेल्या परिषदेत आनंद कपूर यांनी हा पुरस्कार स्वीकारला, तेव्हा डिंभे धरण पाणलोट क्षेत्रातील आदिवासींच्या डोळ्यांत आनंदाश्रूंचा पूर दाटला होता.