वेळ मिळत नाही म्हणून व्यायाम वा अन्य प्रकारची साधना करता येत नाही.. किंवा वेळ मोकळा इतका आहे की,  मनात घोळणाऱ्या विचारांमुळे त्रासून जायला होते,  ही दोन्ही टोके  टाळली पाहिजेत.  वेळ आणि विचार यांची सांगड घातली गेली पाहिजे…
मागल्या लेखात नैसर्गिक प्रेरणांना, ओढीला आवर घालायला हवा हे लिहिले होते ते बहुतेकांना पटलेले दिसते. कारण मला अनेकांनी विचारले आहे की, हे कसे करायचे? अष्टांग योगच मुळात यासाठी सांगितलेला आहे. पण सुरुवातीला तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान ही क्रियायोगाची त्रिसूत्री अमलात आणायला हवी. आपोआपच चित्ताचे भरकटणे कमी होते आणि आनंदाचा भाव मनात उमटायला लागतो, कारण मनाचे क्लेशही कमी व्हायला लागतात.
आता तक्रार ही असते की, हे सारे करायला वेळच कुठे असतो? काही जणांनी विपश्यना केलेली असते, तर कोणी सुदर्शनक्रिया. रामदेव बाबांचे योगसुद्धा कोणी कोणी शिकण्याचा प्रयत्न केलेला असतो. या साधना करण्यासाठी दिवसातून दीडदोन तास तरी वेगळे काढावे लागतात. ते सुद्धा सलग करावे असे वाटत असते. ते जमत नाही आणि मग नियमितता राहात नाही. एकदा खंड पडला की परत सुरू करणे अवघड वाटायला लागते. साऱ्या मंडळींचा रोख ‘खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी’ असा असतो. पण हा उपास फार महागात पडतो. तब्येत बिघडायला लागते आणि सतत चिडचिड होत राहून कामाकडेही लक्ष लागत नाही.
या साऱ्या साधना चांगल्याच आहेत आणि त्या नियमित करण्याने मोठाच फायदा होतो हेही खरे. पण तेवढा वेळ काढता येणे शक्यच नसले तर काय करणार? आधी जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढण्याचा ध्यास लावून घ्यायला हवा. जेव्हा शास्त्रज्ञ अवकाशात जायला निघाले तेव्हा त्यांच्यासाठी कमी जागेत आणि कमी वेळेत करता येईल असा व्यायाम शोधून काढण्याकरता कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. दोन मिनिटे स्ट्रेचिंग किंवा सूर्यनमस्कारासारखा व्यायाम. भिंतीवर, टेबलावर, बाकावर किंवा जमिनीवर हात ठेवून जसे जमतील तसे १५ ते २० पुशअप्स आणि ७/८ मिनिटे जागच्या जागी धावणे एवढा १०/१५ मिनिटांचा व्यायाम आपले स्वास्थ्य आहे त्या पातळीवर टिकवायला पुरेसा होतो, असा निष्कर्ष त्यांनी काढला. तोही एक दिवसाआड करायचा. एक दिवसाआड मोकळ्या हवेत जलद गतीने १५/२० मिनिटे चालायचे. नाडीचे ठोके मोजण्याची सवय लावून घ्यायची. आपल्या एकंदर क्षमतेच्या ६० टक्के इतके ते ठोके या व्यायामाने वाढवायचे. २२० उणे आपले वय इतके नाडीचे ठोके वाढवण्याची क्षमता आपल्यामध्ये असते. म्हणजे वय चाळीस असले तर मिनिटाला १८० ठोके ही आपल्या क्षमतेची कमाल मर्यादा. त्याच्या ६० टक्के म्हणजे म्हणजे मिनिटाला १०८ ठोके पडतील या गतीने हा व्यायाम करायचा. मग ही गती हळूहळू वाढवत १४४ ठोके मिनिटाला इथपर्यंत न्यायची. हा व्यायाम नियमित केला तर आरोग्य बऱ्यापैकी टिकते असा अनुभव आहे. अवकाशयात्रींचेच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांचे, अगदी गृहिणींचेसुद्धा!
या १५/२० मिनिटांच्या जोडीला आणखी १५/२० मिनिटे ही उपासनेसाठी किंवा ध्यानासाठी काढायची. स्वस्थ बसून एखाद्या वस्तूचे किंवा मूर्तीचे ध्यान करता येईल, एखादा मंत्र एकाग्रतेने जपता येईल किंवा न्यास शिकून घेतला तर तोही करता येईल. उपासना आणि ध्यान यांचा महत्त्वाचा उद्देश आपले विचार ठराविक दिशेने प्रवाहित करणे म्हणजे आपल्या मनात येणारा विचारप्रवाह नियंत्रित करणे. यासाठी आधी २/३ मिनिटे प्राणायाम करणे फायद्याचे ठरते. १५/२० मिनिटांचा व्यायाम आपले शारीरिक स्वास्थ टिकवतो तसाच हा प्राणायाम आणि ध्यानाचा व्यायाम आपले मानसिक आरोग्य टिकवून ठेवतो.
आपण लक्ष कशावर एकाग्र होऊ देतो आणि कोणते प्रतिसाद मनात किंवा प्रत्यक्ष उमटू देतो त्यावरच आपल्या आयुष्याची दिशा ठरत असते. यासाठी वाणीची साधना आवश्यक असते. जे क्षेत्र आपण निवडलेले असेल त्यावरचे आपले विचार नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे थोडे तरी त्या विषयावर वाचन आणि लेखन रोज करण्याचा परिपाठ ठेवावा. त्या विषयातल्या तज्ज्ञांचे विचार कानावर पडतील अशी चर्चासत्रे, व्याख्याने जशी जमतील तशी ऐकत जावी. पुस्तके-लेखही वाचीत जावे. आता टीव्हीवरही चर्चा आणि मुलाखती बसल्या ठिकाणी ऐकायला मिळतात. इंटरनेटमुळेही हा अभ्यास करण्याची सुविधा चांगलीच उपलब्ध झालेली आहे.
पण सर्वात महत्त्वाचा संस्कार म्हणजे आपण बोलणे किंवा लिहिणे आहे. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।।’ हा स्वामी समर्थ रामदास यांचा उपदेश प्रत्येकाने कृतीत उतरविण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. इतर काही नाही तर आपली रोजनिशी तरी नित्य नियमाने जशी जमेल तशी लिहीत जावी. अमेरिकेत एक लेखकांचा गट आहे. त्या सर्वानी रोज कमीतकमी ७५० शब्द लिहिण्याचा संकल्प केलेला आहे. लिहिते राहण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. ज्यांचे क्षेत्र शाब्दिक ज्ञानावर भर देणारे असेल, म्हणजे लेखक, पत्रकार, शिक्षक, वकील, विक्रेते अशा सर्व मंडळींना हे खूप फायद्याचे ठरेल. पण ज्यांची क्षेत्रे प्रत्यक्ष अनुभवाची आहेत, म्हणजे खेळाडू, मेकॅनिक, चित्रकार, गायक वगैरे, त्यांनीसुद्धा निदान एक पानभर तरी रोज लिहीत राहण्याचा संकल्प करून तो निर्धाराने पार पाडायला हवा.
आपणच स्वतंत्रपणे लिहिणे सर्वात उत्तम. पण आपल्याला आवडलेल्या ग्रंथातले उतारे उतरून घेणे, व्याख्याने, चर्चा, संवाद यांतील आवडलेला भाग लिहून काढणे, आवडलेला ग्रंथ हाताने नकलून घेणे हे पर्यायसुद्धा फायदेशीर ठरतात. आपल्या उपास्य देवतेचे स्तोत्र किंवा मंत्र आपल्या अक्षरांत परत परत लिहून काढणेदेखील खूप उपयोगी पडते. नुसते नाममंत्रसुद्धा अनेक भक्तांनी लिहून काढून जपयज्ञ करण्याची पद्धत आहे. हे सारे अशासाठी करायचे की, जितका वेळ आपण लिहीत राहू तितका वेळ तरी आपले विचार त्या एका दिशेने प्रवाहित होत राहतात.
मला शिकवणारे एक शिक्षक रोज दहा पाने शुद्धलेखन लिहायला लावीत. आठवडय़ातले काही दिवस लिहिले गेले नाही तर तितकी पाने सुट्टीच्या दिवशी बसून लिहावी लागत. एकदा तर संक्रातीच्या दिवशी गच्चीवर पतंग उडविण्याची धमाल चाललेली असताना मी घरात बसून शुद्धलेखन लिहीत होतो. तेव्हा झालेला मनस्ताप अजून आठवतो. पण त्या शिक्षेमुळे मी न चुकता लिहीत गेलो आणि माझे इंग्रजीसुद्धा चांगलेच सुधारले. उतारे उतरून घेत असतानासुद्धा हा फायदा होतो. भाषाज्ञानात सुधारणा होते.
आपल्याला ज्या विषयात तज्ज्ञ व्हायचे असेल त्या विषयासंबंधी लेखन- वाचन- चिंतन- मनन जितके जास्त होईल तितके चांगले.  कारण त्याविषयाची परिभाषा आत्मसात होते आणि ‘सुचणे’ हा भाग पक्का होतो, समस्यांची उकल सहज व्हायला लागते. आता हा सारा नियमित आणि ठराविक वेळी करण्याचा उपासनेचा भाग झाला. पण आपल्या डोक्यात घोळणारे विचार केव्हा प्रलोभनांकडे वळतील ते सांगता येत नाही. अचानक मिळालेल्या मोकळ्या वेळात तर हे फार होते. ते विचार मनात घोळत राहण्याने भलत्याच गोष्टींचे चिंतन व्हायला लागते. यासाठी सावध राहायला हवे. आपण कोणत्या विचारांना अंत:करणात थारा देत आहोत ते सजग राहून तपासायला हवे. नाहीतर मेनका प्रत्यक्ष समोर येईपर्यंत विश्वामित्र महर्षीचे तप टिकले आणि ती आल्याबरोबर त्याचा भंग झाला तशी गत व्हायची. आपल्या तपाला तर मेनका प्रत्यक्ष अवतरण्याची गरज नसते. स्वप्न पाहणेसुद्धा आपल्या तपाला भंग करू शकते. साधनेविना स्वप्ने पाहण्याचा हा धोका टाळायलाच हवा. अयोग्य विचारांना थाराच न देण्याची काळजी घेऊन!

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…
issue is Indians who went to work for a lot of salary and got caught up in Israel and Hamas war
युद्ध कुणाचं, लढणार कोण आणि मरणार कोण…