खेळ हा फक्त मनोरंजनासाठी असतो, असे म्हटले जाते. पण भारतामध्ये क्रिकेट हा फक्त खेळ राहिलेला नाही, तर त्यापल्याड बहुतेकांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झाल्याचे दिसते. पण जसा क्रिकेटचा विस्तार झाला, क्रिकेटपटू व्यावसायिक झाले, तसा चाहत्यांचा नूर बदलला. पूर्वी एखादा खेळाडू चांगला खेळला तर त्याला डोक्यावर घ्यायचे आणि वाईट कामगिरी झाली की त्याचे लचके तोडायचे, असे व्हायचे. पण यंदाच्या विश्वचषकानंतर मात्र तसे दिसले नाही. एकामागून एका विजयासह भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला, अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताला पराभूत केल्यावर कुठेही जाळपोळ वगैरे झाली नाही, कोणत्याही खेळाडूला पराभवाचा धनी ठरवण्यात आले नाही, याचाच अर्थ भारतीयांनी हा पराभव खेळभावनेने घेतला. ही बदललेली मानसिकता फार महत्त्वाची आहे. खेळ म्हटला की त्यामध्ये जिंकणेही आले आणि पराभूत होणेही, हे प्रसारमाध्यमांच्या महास्फोटात विसरले गेलेले साधे सत्य भारतीयांना बहुधा पुन्हा कळू लागले आहे. नाही तर यापूर्वी भारताने प्रत्येक सामना जिंकायलाच हवा आणि एखाद्या खेळाडूने प्रत्येक सामन्यात शतक ठोकायलाच हवे, अशा बाळबोध स्वप्नीलपणात भारतीय रमायचे. मुळात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आणि त्यामध्ये ट्वेन्टी-२० म्हणजे बिनभरवशाचाच प्रकार. जिथे माजी विश्वविजेत्या इंग्लंडला नेदरलँड्ससारखा संघ पराभूत करतो, तर संभाव्य विजेत्या समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा गाशा झटपट गुंडाळला जातो, तिथे भारत आणि श्रीलंका या दोन्ही तुल्यबळ संघांत कोण जिंकणार, हे सांगणे कर्मकठीणच. अंतिम फेरीत भारत पराभूत झाला तो त्यांच्या दुर्बल कामगिरीमुळेच, हे चाहत्यांनाही कळून चुकले आहे. कोणालाही आपला संघ पराभूत व्हावा, असे वाटत नसते. प्रत्येक खेळाडू संघाला जिंकवून देण्यासाठी प्रयत्नशील असतो. युवराज सिंगवर कूर्मगतीने फलंदाजी केल्याबद्दल टीका झाली, पण ती तेवढय़ापुरतीच होती. काही कंटकांनी त्याच्या घरावर तुरळक दगडफेक केली खरी, पण युवराजला पराभवाचा धनी वगैरे ठरवण्यासाठी हे काहीजण वगळता कोणीही तयार नव्हते. उलटपक्षी, युवराजने आपल्याला आतापर्यंत जिंकवून दिलेल्या सामन्यांची, स्पर्धाची यादीच काही जणांनी मांडली. एखादा दिवस चांगला असला की सहा चेंडूंमध्ये सहा षटकारही बसतात आणि दिवस वाईट असला की २१ चेंडूंत ११ धावाही, आणि हे सारे सुजाण क्रिकेटरसिकांच्या पचनी पडलेले आहे. काही वर्षांपूर्वी क्रिकेट फार कमी देशांमध्ये खेळले जायचे आणि सामनेही मोजकेच व्हायचे. पण गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटचा प्रसार आणि प्रचार मोठय़ा प्रमाणात झाला. जास्त सामने खेळवले जाऊ लागले. नवखे संघ चांगली कामगिरी करत मोठय़ा संघांना धक्केही देऊ लागले. त्याच वेळी पाश्चिमात्य चाहते क्रिकेटकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, हे नव्या पिढीने समजून घेतले आणि आत्मसातही केले. रविवार आणि त्यामध्ये विश्वचषकाची अंतिम फेरी असल्याने जवळपास प्रत्येक गल्लीमध्ये मोठमोठाल्या पडद्यांवर सामने सुरू होते. प्रत्येक चेंडूगणिक उसासे टाकले जात होते, पण भारत पराभूत झाल्यावर कोणीही आक्रमक होऊन नासधूस केली नाही, खिलाडू वृत्तीने हा पराभव स्वीकारत श्रीलंकेच्या संघाचे अभिनंदन केले. कारण विश्वविजयासाठी श्रीलंकेचा संघ भारतापेक्षा लायक होता आणि हे त्यांनी आपल्या कामगिरीच्या जोरावर दाखवून दिले. यापूर्वीही प्रतिस्पर्धी संघ आपल्या कामगिरीच्या जोरावर जिंकायचे तेव्हा भारताचे क्रिकेटपटू टीकेचे धनी ठरायचे, त्यांचे जीणे नकोसे केले जायचे, पण यावेळी असे काहीच घडले नाही. कारण आता काळ बदलला आहे. चाहत्यांमध्ये झालेला हा सकारात्मक बदल पाहून या वेळी क्रिकेट जिंकल्याचीच अनुभूती येत आहे.