संगीत ही अखिल विश्वाची भाषा, असे मानतानाच कंठय़संगीत आणि त्यातही जनप्रिय गीतगायन हे प्रकार त्या-त्या भाषेचा परीघ ओलांडताहेत, याचे अप्रूपही आपल्याला असते. आपल्याला म्हणजे, अगदी इंटरनेटयुगातल्या संगीतप्रेमींनासुद्धा. पण रेकॉर्डची तबकडी हीदेखील जेव्हा नवलाईची होती, अशा १९४० च्या सुमारास गाऊ लागलेले अनेक जण १९६० पर्यंत जागतिक कीर्ती मिळवणारे ठरले होते, हे लक्षात घेतल्यास या भाषेचा अंगभूत जागतिकपणा अधिकच ठसतो. सबा ही अरबी गायिका बुधवारच्या पहाटे काळाच्या पडद्याआड गेली,  तिने अरबी संगीताच्या जागतिक प्रसाराचा आरंभ काळ केवळ पाहिला नव्हता, तर खुद्द घडवलादेखील होता.
लंडनचे पिकॅडली थिएटर, न्यूयॉर्कचा कान्रेजी हॉल, पॅरिसचे ऑलिम्पिया प्रेक्षागार आणि सिडनीचे ऑपेरा हाऊस अशा सर्व प्रतिष्ठित रंगमंचांवर गायलेली ती पहिलीच अरब गायिका.
जेनेट जेíगस अल-फेगाली या मूळ नावाची सबा १९२७ मध्ये जन्मली. १९४० पासून गात राहिली. १९४३ पासून तिने चित्रपटांत अभिनय करणेही सुरू केले. आयुष्यभरात ५० गीतसंग्रह आणि ९० हून अधिक चित्रपट, ही चाहत्यांसाठी तिने उधळलेली दौलत. जन्माने बदाउन असली, तरी त्या काळच्या लेबनॉनमध्ये वाढल्याने तिच्यावर पाश्चात्त्य संस्कार झाले. कालौघात लेबनॉनसह इजिप्त, कॅनडा आदी चार देशांचे नागरिकत्व मिळवून ती मुक्त राहिली. नऊ लग्ने केली तिने, त्यापकी पहिले (५ वष्रे) व नववे (१७ वष्रे) हीच अधिक टिकली.
 शांतपणे जगाचा निरोप घेताना तिचे वय होते ८७ आणि देशोदेशी- चारही खंडांत तिची कीर्ती पसरू लागली तेव्हा ती विशीचीसुद्धा नव्हती.. तब्बल सहा दशके तिने चाहत्यांना स्वरानंद दिला. वय झाले, ऐंशी पार केली तरी मेकर करून, ग्लॅमरस वस्त्रे लेवून चाहत्यांसमोर आल्यावर ती तरुण होत असे. असे चिरतरुण स्वर आपल्या भारतात, महाराष्ट्रात, अगदी मुंबईत आहेत.. तेही एक नव्हे दोन!  पण सबाचा आवाज त्या दोघींपेक्षा निराळा. गोडमंजूळ नव्हेच, उलट काहीसा घोगरा. चढय़ा सुरांच्या अरबी संगीतासाठी उत्तम. सबाच्या आवाजाची फिरत आणि दमसास हे कानांनी अनुभवावेत- अगदी गाण्यातील एकही शब्द कळत नसला तरीही ऐकत राहावेत, असे होते. हे असे ऐकत राहण्याची कल्पना ज्यांना पटते, त्यांना संगीताची विश्वभाषा आपसूक कळू लागलेली असते!