‘अमेरिकी लेखक’ ही त्यांची ओळख अखेपर्यंत- म्हणजे परवाच्या २१ जुलै रोजी त्यांचं निधन होईपर्यंत- राहिली. एडगर ऊर्फ ई. एल. डॉक्ट्रो यांनी कधीही अमेरिकेबाहेरचे मानसन्मान मिळवले नाहीत. पण अमेरिकेत राहून, अमेरिकेसाठी आणि अमेरिकेपुरतंच लिहिणाऱ्या या लेखकानं जे पाहिलं आणि मांडलं, ते केवळ ‘एका देशाचं’ म्हणून बिनमहत्त्वाचं ठरत नाही. कथाबीजांची सांगड इतिहासाशी घालणारे, म्हणून त्यांचं नाव अमेरिकेत झालं. ‘ऐतिहासिक कादंबरी’ अनेकजण लिहितात, पण ई. एल. डॉक्ट्रो यांनी जे केलं, ते निराळं होतं. मराठी उदाहरण घेऊन सांगायचं तर, डॉक्ट्रो ‘श्रीमान योगी’ किंवा ‘शहेनशहा’ किंवा ‘छावा’ लिहीत नव्हते कधीच.. ते लिहीत होते त्याची जातकुळी दिवंगत वसंत पोतदारांच्या ‘एकोणीसशे एक’ किंवा नंदा खरे यांच्या ‘अंताजीची बखर’ सारखी होती फारतर.. किंवा तेही नाहीच! कसं ते पाहू.. डॉक्ट्रो यांच्या कादंबरीत इतिहास असला, तरी त्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणसं होती. या सामान्य माणसांची मतं त्या-त्या वेळी कशी होती, याबद्दल डॉक्ट्रो यांना जे कुतूहल होतं, त्यानंच त्यांच्यातला लेखक घडवला. शिवाय, संबंधित काळामध्ये जी ऐतिहासिक कर्तृत्वाची (किंवा नंतर ऐतिहासिक ठरलेली) थोर माणसं होती, पण त्यांचा सामान्य माणसांवर होणारा परिणाम काय, याबद्दलही डॉक्ट्रो यांना कुतूहल होतंच. त्यांच्या ‘रॅगटाइम’ या अमेरिकेत प्रचंड गाजलेल्या कादंबरीत एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या काळातला हॉदिनी हा जादूगार न्यूयॉर्कमध्ये येतो. जे पी मॉर्गन आणि हेन्री फोर्ड हे अर्थ-उद्योगाच्या क्षितिजावर (अनुक्रमे) तळपत असतात आणि ‘अमेरिका इज अ मिस्टेक’ असं म्हणणारा मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉइड हाही कार्ल गुस्ताव युंगसह अमेरिकाभेटीस आलेला असतो. ही भरभराट होत असताना कादंबरीच्या बाल-नायकाचा बाप, ‘फादर’ (हेच त्याचं कादंबरीतलं नाव, पण हा ख्रिस्ती पाद्री नव्हे) मात्र अस्वस्थ असतो. ‘परकी मंडळी इथं येताहेत’ ही या फादरची ठसठस असते. यातून अमेरिकेच्या उजव्या विचारांचा आणि भांडवलशाहीचा वेध ई एल डॉक्ट्रो घेऊ पाहातात. ‘तेव्हा महिलावर्गाचे वजन अधिक असे’ अशा (म्हटल्यास मूर्ख) वाक्यांपासून ते फ्रॉइडदेखील खाण्यापिण्याच्या सवयींचा गुलाम होऊनच अमेरिकेबद्दलची मतं बनवत होता, अशा खुसखुशीत किश्शापर्यंत अनेकपरींनी डॉक्ट्रो यांची उपरोधिक शैली उलगडते. ‘ग्रेट डिप्रेशन’ म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकी महामंदीच्या काळाचा (१९३० पासून पुढे) विशेष अभ्यास डॉक्ट्रो यांनी केला होता. डझनभर कादंबऱ्या आणि पाव डझन कथासंग्रह लिहूनही आठ निबंधसंग्रह देखील त्यांनी लिहिले होते. वृत्तपत्रीय स्तंभलेखनापासून दूर राहणाऱ्या लेखकरावांपैकी ते नव्हते. या साऱ्यांतून, मानवी स्वभावाची – किंवा किमान अमेरिकी समाजाबद्दलची त्यांची पक्की समज, आर्थिक विषयांवरली त्यांची जाण आणि ‘थोरपणा’बद्दलची बेफिकिरी, हे त्यांचे गुण यापुढेही दिसत राहातील. ‘इतिहासाचं पुनर्लेखन नेहमी होतच असतं. प्रत्येक वर्तमान काळ, आपापला इतिहास निवडूनच घेत असतो.’ असं विधान करणाऱ्या या वाङ्मयकारानं जॉर्ज बुश यांच्या इराकयुद्धावर टीका करताना ‘ते गोष्ट सांगतायत आपल्याला’ असा आरोप केल होता!