आज जे ख्याल गायन आपण ऐकतो, ते अमीर खुस्रोचे नव्हे, हे तर सरळच आहे. त्या मूळ शैलीत गेल्या काहीशे वर्षांत वेळोवेळी बदल झाले. तरीही त्या ख्यालाच्या शैलीचे व्याकरण काही आमूलाग्र बदलले नाही. त्याचा मूळ केंद्रबिंदू तसाच ठेवून अनेक कलावंतांनी त्यात प्रयोग केले. एकाच वेळी कलावंत आणि रसिक यांना एकाच पायरीवर आणणाऱ्या या कलाप्रकाराची भूमिका ‘जुने ते सोने’ अशी नसतेच.  कुणालाही नवा प्रयोग करण्याची पूर्ण मुभा असणारे हे भारतीय संगीत गेल्या काही हजार वर्षांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संचिताचेच प्रतीक आहे.
गेली सुमारे आठशे वर्षे भारतात ‘ख्याल’ हा संगीत प्रकार रूढ होत आला आहे. अमीर खुस्रो या एका प्रसिद्ध कवी आणि संगीतकाराने ख्याल ही संगीत व्यक्त करण्याची नवी कल्पना आणली, असे मानण्यात येते. त्याचा जन्म १२५३ मधला. म्हणजे त्या काळात प्रबंध गायकीतून ध्रुपद गायकी निर्माण होऊन ती स्थिरावलीही होती. एका विशिष्ट पद्धतीने गायनाची क्रिया पार पाडणारी शैली प्रबंध गायकीतून बराच काळ उत्तर भारतावर राज्य करीत होती. सतत नव्याचा शोध घेणाऱ्या असंख्य अनामिक कलावंतांना त्या शैलीत बदल करणे ही गरज वाटली, याचे कारण त्यांना संगीतातून जे काही सांगायचे होते, ते सांगण्यासाठी प्रबंध गायकी पुरेशी वाटत नसावी. त्या व्यक्त होण्याच्या धडपडीला संगीताचा अभ्यास आणि त्यावर होत असलेले सामाजिक आणि राजकीय परिणाम यांची जोड होती. नुसताच नव्याचा छंद बहुतेक वेळा हाती काही लागू देत नाही. चूष म्हणून केलेल्या कोणत्याही बदलात स्थिरता पावण्याचे अंश नसतात. बदलातून नवी शैली निर्माण होणे ही खूप गुंतागुंतीची आणि आव्हानांची असते. गुंतागुंत अशासाठी की, केवळ एखाद्याला वाटले म्हणून काही नवे घडत नाही. जे काही पूर्वसुरींपेक्षा वेगळे आणि नवे आहे, ते कलेच्या आस्वादकांपर्यंत किती प्रमाणात पोहोचले, हेही महत्त्वाचे असते. असे जे काही नवे असते, ते एकदाच घडून उपयोगाचे नसते. ते पुन:पुन्हा आणि काही काळ घडावे लागते. त्यासाठी कलावंताला त्याचे नवे शास्त्र किंवा व्याकरण बनवावे लागते. शास्त्र आणि व्याकरण हे दोन्ही शब्द सामान्यत: कटकटीचे वाटत असले, तरी त्या दोन्ही शब्दांना समानार्थी असलेला, कदाचित त्यांचा अर्थ अधिक प्रवाही करणारा ‘शैली’ हा शब्द मात्र आपण अगदी आपलेपणाने स्वीकारतो. गेल्या काही हजार वर्षांमध्ये संगीतात जे बदल होत आले, ते अतिशय संथ गतीने झाले हे तर खरेच; पण त्यामागे आणखीही काही कारणे असू शकतील. म्हणजे नव्या शैलीमध्ये काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी काही काळ जावा लागतच असणार. जेव्हा संवादाची माध्यमेच नव्हती, त्या काळात तर संगीत एकमेकांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा काळ हाही महत्त्वाचा घटक होता. ते पोहोचल्यानंतर त्याचा परिणाम टिकून राहायलाही बराच वेळ लागत असणार. पुन:पुन्हा ऐकून ते आवडल्याची खात्री पटेपर्यंत कोणत्याही कलेचा रसिक त्या नवेपणावर रसिकतेची मोहोर उठवत नाही. त्यामुळे कावळ्यांच्या छत्र्यांप्रमाणे अनेकांनी अशा नव्या कल्पना तेव्हाही पुढे आणल्या असतील. त्यातल्या सगळ्याच काळाच्या कठोर कसोटीवर टिकल्या नाहीत आणि काहीच नवे बदल रसिकांनी स्वीकारले याचे कारण, त्या बदलांमध्ये सातत्याचा गुणधर्म होता.
नवे म्हणून जे काही असते, ते काळाच्या कसोटीवर टिकून राहिल्यानंतरच त्याची शैली होते. म्हणजे ते नवेपण एकाच वेळी अनेक जण स्वीकारतात आणि त्यातून ती शैली विकास पावू लागते. तेराव्या शतकातील अमीर खुस्रो नेमके काय नवीन करीत होता, हे आता कळण्यास मार्ग नाही; पण त्याने जी नवी शैली तयार केली, ती तेव्हाच्या रसिकांना आवडली, म्हणूनच इतरांनीही ती आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. आज जे ख्याल गायन आपण ऐकतो, ते अमीर खुस्रोचे नव्हे, हे तर सरळच आहे. त्या मूळ शैलीत गेल्या काहीशे वर्षांत वेळोवेळी बदल झाले. तरीही त्या ख्यालाच्या शैलीचे व्याकरण काही आमूलाग्र बदलले नाही. त्याचा मूळ केंद्रबिंदू तसाच ठेवून अनेक कलावंतांनी त्यात प्रयोग केले. ध्रुपदातील नोमतोम ख्यालाने नाकारली आणि थेट शब्दांचा उपयोग करीत, संगीतातून नवा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केला. ख्यालाचे जे गीत, ते म्हणजे बंदिश; पण बंदिश म्हणजे केवळ शब्द नव्हेत; त्यात शब्दांपेक्षाही स्वरांच्या रचनेला आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावालाच अधिक महत्त्व. ख्यालाने संगीताचा विचार भावनांच्या पातळीवर अधिक केला असावा, याचे कारण त्याआधीपासून अस्तित्वात असलेल्या संगीत परंपरा भावना व्यक्त करण्यासाठी अपुऱ्या पडत आहेत, असे कलावंतांना वाटले असावे. मनातील भावना आणि त्यामागील विचार व्यक्त करण्यासाठी साचा (मोल्ड) तयार करणे ही आवश्यकता बनते. हा नवा साचा तयार झाल्यानंतर त्यातून एकसारख्या कलाकृती निर्माण होण्याचीही भीती असते. त्यामुळे हा साचाही लवचीक असणे अत्यंत आवश्यक असते. ख्याल गायनाचा हा साचा गेली सातआठशे वर्षे टिकला, याचे कारण त्यातील लवचीकता हे आहे. किती तरी अज्ञात कलावंतांनी ही नवी शैली विकसित करण्यासाठी हातभार लावला. सगळ्यांची इतिहासाने आदरपूर्वक नोंद ठेवली नसली, तरीही त्यांच्या योगदानामुळेच ही शैली इतकी दीर्घ काळ टिकून राहिली. प्रत्येक कलावंताची प्रज्ञा या शैलीला सातत्य मिळवून देण्यासाठी उपयोगाला आली. या शैलीतून निघालेले अनेक उपप्रवाह आज टिकून राहिले आणि त्यातून संगीताला प्रवाही राहता आले.
ख्याल गायकीवर वेगवेगळ्या विचारांचे संस्कार होत असताना, अनेक कलावंतांनी त्यातील रुळलेली वाट मोडून वेगळी वाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेगळ्या वाटा ‘घराणे’ या संकल्पनेत स्पष्ट झाल्या. ख्याल ही मूळ शैली आणि तिचा आविष्कार करण्यासाठी निर्माण झालेल्या एकाहून अधिक वेगवेगळ्या शैली तयार झाल्या. सगळे जण रागसंगीतच व्यक्त करीत होते. म्हणजे सगळ्यांचा यमन राग एकच होता; त्याचे स्वर तेच होते आणि त्या रागातील स्वरांच्या ठेवणीचे नियमही तेच होते; पण या सगळ्यांना स्वत:चा वेगळा भासणारा यमन किंवा भैरव किंवा मालकंस सादर करायचा होता. असे करण्याचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कलावंतांना ख्याल गायकीची मोडतोड करावी लागली नाही. याचे कारण, ख्याल गायनाच्या पद्धतीत प्रत्येक कलावंताला पुरेसे स्वातंत्र्य होते. ज्याला जसे हवे, तसे त्याने या गायकीतून आपले विचार व्यक्त करण्यास हरकत नव्हती. ख्यालाची ही चौकट पोलादी नसल्यामुळे आणि त्यात नवा विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असल्यामुळे कलेच्या क्षेत्रातील बंडखोरांनाही त्यात सहज सामावून जाता आले. जगातील सगळ्याच संगीत पद्धतींमध्ये कलावंताचा नवा विचार व्यक्त करण्यासाठी आधीच्या शैलींची मोडतोड झालेली दिसते. अनेक ठिकाणी नव्याने तयार झालेली शैली अधिक पोलादी असते. त्यामुळे तिच्यापासून फटकून जाणारी पूर्ण नवी शैली निर्माण करण्याशिवाय गत्यंतरच उरत नाही. भारतीय संगीतात हे असे घडले नाही, याचे कारण या संगीताला कलावंताच्या स्वातंत्र्याची कमालीची बूज आहे. त्याच्या प्रतिभेचा हे संगीत आदर करते आणि त्याच्या कलात्मकतेला आव्हानही देते. त्यामुळे आणखी काही नवे सुचण्याच्या शक्यताही वाढतात आणि मूळ शैलीची लवचीकताही वाढीस लागते. भारतीय संगीतातील या अभिजाततेला सलामच करायला हवा. ती कुणा एकाची मक्तेदारी नसते आणि कुणी तिला वेठीलाही धरू शकत नाही. कदाचित त्यामुळे भारतीय संगीतात आजवर झालेले अनेक प्रयोग पचवूनही ते सतत कात टाकून नवे रूप घेण्यासाठी सज्ज असते.
कोणत्याही कलेत असलेल्या अनेक प्रवाहांचे एकत्र गाठोडे बांधले, म्हणजे त्या कलेचा आत्मा समजला असे घडत नाही. कलावंताच्या नव्या प्रयोगांना आस्वादकांकडून प्रतिसादच मिळाला नाही, तर ही बदलाची प्रक्रियाही खुंटेल. त्यामुळे केवळ कलावंतांना आवडले, म्हणून नवनिर्माण झाले नाही. त्याला रसिकांनी दाद दिली म्हणून तर हे नवे पुन:पुन्हा समोर येत राहिले. एकाच वेळी कलावंत आणि रसिक यांना एकाच पायरीवर आणणाऱ्या या कलाप्रकाराची भूमिका ‘जुने ते सोने’ अशी नसतेच. नवे ते सोने कसे होईल आणि ते टिकून कसे राहील, याची काळजी संगीतच घेत राहते. कुणालाही नवा प्रयोग करण्याची पूर्ण मुभा असणारे हे भारतीय संगीत गेल्या काही हजार वर्षांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संचिताचेच प्रतीक आहे. अनेकदा बदल न होता, परंपराच पुढे चालू राहिल्याचा अनुभव या कलेने घेतला; पण त्या परंपरांमधूनच नव्या निर्माणाची साद देण्याची क्षमता त्याने अद्याप गमावलेली नाही.
कलावंत आणि रसिक यांच्यासाठी याहून अधिक महत्त्वाचे काय असू शकते?