परमार्थाच्या मार्गावर खऱ्या अर्थानं ज्यानं पहिलं पाऊल टाकलं त्या पावलामागे खरी कळकळ होती. परमात्मप्राप्तीची खरी आस होती. भले ती क्षीण असेल. जे होतं ते अत्यंत आत्मिक होतं. आपण आणि भगवंत यापेक्षा दुसरं काही मनात नव्हतं. मग कुणी स्वतला नामोपासनेत झोकून दिलं, कुणी योगयागात झोकून दिलं, कुणी ज्ञानोपासनेत झोकून दिलं.. आपापल्या परीनं जो-तो साधनारत झाला. मग असं असताना, दुनियेपासून मनानं दुरावल्यावरही पुन्हा दुनियेकडेच तीव्र ओढ का निर्माण व्हावी? ज्याला आपल्यापर्यंत येऊ द्यायचं त्याची अखेरची परीक्षा भगवंत पाहातोच पाहातो. रामकृष्ण म्हणत ना? सिद्धी म्हणजे खेळणी आहेत. भगवंतासाठी व्याकुळ होऊन आक्रंदन करणाऱ्यापुढे भगवंत प्रथम सिद्धींची खेळणी टाकून पाहातो. या खेळण्यांत अडकून जे त्यातच रमतात ते भगवंतापासून तितका काळ दुरावतातच. सद््गुरूकृपांकित साधकालाही ही परीक्षा द्यावीच लागते. मोडक्यातोडक्या उपासनेनंही वर्तणुकीत, बोलण्यात, विचारात गोडवा येऊ शकतो, स्पष्टता येऊ शकते, निर्भयता येऊ शकते. अशा साधकाचा आजूबाजूच्या लोकांवर थोडाफार प्रभाव पडतो आणि मग लोकांकडून होणाऱ्या स्तुतीला तो साधकही बळी पडतो. काहींची उपासना तीव्र होते. त्यातून सिद्धी लाभतात. त्यांचा प्रत्यय आजूबाजूच्यांना येतो आणि मग लोकस्तुतीच्या धबधब्यात हा वाहूनच जातो! अशा स्वयंघोषित सिद्ध, स्वयंघोषित तारणहारांची मांदियाळीच निर्माण होते. कुणाचंच नाव घ्यायची इच्छा नाही. आपलं हे सदर अंतर्यामीचा भाव विकसित करण्यासाठी आहे, भावतंतू तोडण्यासाठी नव्हे. तरी काही बाबतीत आपल्याकडून अशी चूक होऊ नये, हे साधकाने जाणून घेतलंच पाहिजे. एक असेच फकीरवृत्तीची प्रारंभी शुद्ध ओढ असलेले साधक होते. नर्मदातीरी त्यांनी घेतलेले अनुभव शब्दबद्ध झाले तेव्हा लोक भारावून गेले. दुसऱ्या पुस्तकात २००६ च्या आवृत्तीत त्यांनी अखेरच्या परिच्छेदात लिहिलं, ‘‘चारेक महिने पुण्यात राहाण्याची आज्ञा आहे. घरी शेवटचा मुक्काम. मग पुन्हा नर्मदामाईच्या उत्तर तटावर कुठंही शरीर पडेपर्यंत साधनेच्या मस्तीत आनंदात राहायचं..’’ चार महिन्यानंतर गाठभेट होणार नाही, असेच जणू सूचित करीत पुस्तकात लेखकाचा पत्ता, संपर्क क्रमांकही आहे. भावनेच्या भरात लेखक असं लिहून जातो, असं एकवेळ मानता येईल पण आता सहा र्वष उलटून गेली, पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. तरी चार महिन्यांचा अखेरचा मुक्काम असल्याचा हा शेवटही पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीत कायम आहे! अनेकानेक पुस्तकं, त्यांच्या अनेकानेक आवृत्त्या, वाहिन्यांवर मुलाखती अशा पसाऱ्यात हा शेवट बदलणं कुणाच्या लक्षात राहाणार? तर साधनेच्या सुरुवातीला स्वतला नगण्य मानणारा साधक अखेरीसही आपण नगण्य असल्याचं तोंडदेखलं सांगतो पण स्वतला नगण्य मानतही नसतो. दुनिया अशी कब्जा करते!