उपासनेचा मुख्य हेतू परमात्मप्राप्ती हाच आहे. प्रत्यक्षात उपासनेबाबतच्या आकलनातील मूलभूत गैरसमजातून परमात्म्याऐवजी स्वतचेच शक्तिमाहात्म्य आणि सिद्धीमाहात्म्य जर बिंबत असेल तर धोक्याचे वळण जवळच आले आहे! ज्ञानयोग, हठयोग हे सारेच मार्ग त्यांच्या शुद्ध स्वरूपात परमात्मऐक्यच बिंबवतात. साधनेच्या कोणत्याच मार्गाला कमी लेखण्याचा हेतू नाहीच. त्या मार्गानेही अनेकांनी अध्यात्माची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली आहेत आणि परमात्मऐक्य साधले आहे. आजही त्याच मार्गाने काही साधक मूकपणे खरीखुरी वाटचाल करीत आहेत. पण बाकी काय स्थिती आहे? साधनेचा  मूळ हेतू ध्यानात न घेता तिच्या बाह्य़ांगाला घट्ट धरून त्या साधनाचाच अनाठायी दुराग्रह बाळगणाऱ्यांना आणि त्यामुळे मूळ हेतूपासून दूर सरणाऱ्यांना सावध करणारे कबीरांचं भजन आहे-
अवधू अक्षर से वो न्यारा।। टेक।।
जो तुम पवना गगन चढमवो, करो गुफा में बासा।
गगना पवना दोनों बिनसे, कहँ गयो जोग तमाशा।।१।।
हे साधका, तो परमात्मा शब्दातीत आहे. तू गुंफेत राहून श्वासाला स्वतच्या खोपडीत चढविलेस आणि अनाहद नाद आणि ज्योतिदर्शनही साधलेस तरी विचार कर, जेव्हा हे शरीर नष्ट होईल, खोपडी फुटून जाईल, श्वास निघून जाईल तेव्हा तुझ्या या योगाचा तमाशा उरेल काय?
कबीरांच्या निर्गुणी भजनांचा आधार घेत काहीजण कबीरांनाही योगमार्गी मानतात. जो एकरसात निमग्न आहे त्याला कुठल्यातरी एका चौकटीत बांधू पाहाण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळेच हे भजन सर्व पूर्वग्रह दूर करणारं ठरावं. इलाहाबादच्या कबीर संस्थानने प्रकाशित केलेल्या ‘कबीर बीजक’ ग्रंथात हे भजन आहे आणि त्याचा जो हिंदूी अर्थ दिला आहे त्याचाच मराठी अनुवाद इथे दिला आहे. या अनुवादातील ‘खोपडी’ आणि ‘योगाचा तमाशा’, हे शब्द एखाद्याच्या हृदयाला धक्का देतील खरे. कबीरजी इतके कठोरपणे हे का सांगत आहेत, याचाही विचार त्यामुळे आवश्यक आहे आणि या भजनाच्या अखेरीस गोरक्षनाथांचा तितकाच भक्कम आधार घेत आपण तो करूच. पण ही योगमार्गावर टीका आहे, असं कुणी मानू नये. उलट योगाच्या वाटचालीत अंतरंगात जी दर्शने घडतात त्यातच गुंतणाऱ्यांना आणि त्यांनाच वाटचालीची परिपूर्ती मानणाऱ्यांना सावध करण्याचा कबीरांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळेच कबीरजी पुढे सांगतात-  
गगनामध्ये ज्योति झलके, पानीमध्ये तारा।
घटि गये नीर विनशि गये तारा, निकरि गयो केहि द्वारा।।२।।
जसं रात्री स्वच्छ जलाशयात ताऱ्यांचं प्रतिबिंब दिसतं तसंच अभ्यासाने ज्योतिदर्शन होतं. पण पाणी आटून गेलं की ताऱ्यांचं प्रतिबिंब कुठून पडणार? त्याचप्रमाणे शरीरच नष्ट झालं की ज्योतीदर्शन कुठलं राहाणार?