‘वेडपट वैदिक’ या अग्रलेखात (१६ जुल) रामदेवबाबा यांच्यावर केलेली टीका त्यांच्या अनेक चाहत्यांना आवडली नसल्याचे स्पष्ट दिसते; परंतु सारासार व निष्पक्षपणे विचार करता अशी टीका अनाठायी वाटत नाही .  रामदेवबाबांसारख्या योगगुरूंनी पत्रकार वैदिक यांच्या कृतीचे समर्थन करताना मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचे हृदयपरिवर्तन व्हावे या हेतूने त्याची मुलाखत घेतली, असे विवादास्पद विधान केले आहे. असे विधान करणे निश्चितच चिंतनीय ठरते. यापूर्वीही रामदेवबाबांनी पत्रकारास उत्तर देताना ‘मी मनात आणले तर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो’ असे बाष्कळ विधान केल्याचे स्मरते. रामदेवबाबांनी त्यांच्या योगविद्येतून उच्च स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे देशाच्या अस्मितेस धक्का पोहोचवणारी विधाने करणे त्यांना शोभत नाही. म्हणूनच त्यांनी त्यांच्या विचारांवर योगसाधनेद्वारे ताबा मिळवणे आवश्यक वाटते व तसे करणे त्यांना अशक्य नाही.

जर्मन फुटबॉलमधील बदलांना वांशिक वैविध्याचा मोठा हातभार
‘बुंदेस्टागच्या बुलंदीचा बोध’ हा अग्रलेख (१५ जुलै) वाचला. जर्मनीच्या आíथक-राजकीय बदलांची फुटबॉलमधल्या तिच्या यशाबरोबर घातलेली सांगड समर्पक आहे. जर्मनीच्या विजयासाठी अजून एक घटक कारणीभूत आहे. मुळात जर्मन नसलेल्या पण आता जर्मनीत स्थायिक झालेल्या लोकांची पुढली पिढी जर्मन संघात प्रकर्षांने दिसते. शतकानुशतके जर्मनीचे ज्या देशाशी हाडवैर होते त्या पोलंडमध्ये जन्मलेला पोडोलस्की असो  वा जर्मनीतल्या मुख्य प्रवाहापासून फटकून राहणाऱ्या तुर्की कामगार समाजातून आलेला ओझील किंवा जर्मन वंशश्रेष्ठत्वाच्या पारंपरिक कल्पनांना छेद देणारा कृष्णवर्णीय बोएतेंग – जर्मन समाजाने या ‘बाहेरच्यांना’ मोठय़ा सामंजस्याने सामावून घेतलेले दिसते.
या बदलांचा आवेग समजून घ्यावयाचा असला तर भारतीय क्रिकेट संघात एक पाकिस्तानात जन्मलेला, एक नेपाळी गुरख्याचा मुलगा आणि एक कॅरेबियन वंशाचा असे खेळाडू खेळताहेत आणि आपली जनता त्यांना डोक्यावर घेतेय असे चित्र डोळ्यांपुढे आणावे लागेल. यामुळे जर्मन फुटबॉलमधल्या क्रांतिकारक बदलांना या वांशिक वैविध्याचा फार मोठा हातभार लागला आहे. अगदी हल्लीहल्लीपर्यंत म्हणजे २००२ पर्यंत ‘कणखर पण कंटाळवाणा संघ’ अशी प्रतिमा असलेला जर्मन संघ आता आकर्षक आणि सुंदर खेळासाठी ओळखला जातोय. (१९७० च्या जगज्जेत्या ब्राझील संघातल्या अनेक खेळाडूंनी जर्मनीचा खेळ पाहून हा संघ आम्हाला आमच्या ‘योगो बोनितो’ शैलीची आठवण करून देतो असे म्हटले आहे). जर्मनीच्या यशस्वी महिला फुटबॉल संघाची आघाडीची खेळाडू फात्मिरे अलुशी हीसुद्धा मूळची कोसोवोची आहे.  ‘या घुसखोरांना बाहेर फेका’, ‘जर्मन भूमिपुत्रांना संघात राखीव जागा ठेवा’ असे जर्मन नारे बíलनमध्ये दुमदुमले नाहीत.  यावरून स्थलांतरित लोकांना जर्मन समाजात कसे आघाडीचे स्थान प्राप्त होत आहे हे दिसते.  हा समज दृढ होण्यास अनेक अनुभव विश्वचषक स्पध्रेच्या वेळी आले.
अंतिम सामन्याच्या दुपारी  म्युनिकच्या ऑलिम्पिक संकुलात होतो. जमलेल्या अफाट गर्दीत  तुर्की यौवना दिसल्या. या मुलींनी गळ्यात जर्मन राष्ट्रीय रंगांच्या फुलांच्या माळा घातल्या होत्य आणि त्यांच्या तोंडातून ‘डॉइश्लॅण्ड, डॉइश्लॅण्ड’ (जर्मनी, जर्मनी) असा घोष अथक चालू होता. गर्दीत घाना आणि नायजेरियन युवक बरेच दिसत होते.  या भागात हॉटेल चालवणाऱ्या व मूळ मुंबईकर असलेल्या कुटुंबाने प्रत्येक जर्मन सामन्याच्या वेळी आपले हॉटेल बंद ठेवले होते. कारण त्यांना ‘त्यांच्या’ जर्मन संघाचा खेळ चुकवायचा नव्हता. स्थलांतरित लोकांचे श्रम आणि कौशल्य फक्त वापरून न घेता त्यांना समाजधारेतसुद्धा सामावून घेण्याचा जर्मन प्रयत्न पाहता अग्रलेखात नमूद केल्याप्रमाणे जर्मनी आíथक-राजकीय महासत्ताच नव्हे, तर फुटबॉल महासत्ता पुन्हा होणार आहे यात शंका नाही.
भूषण निगळे, जर्मनी

राजकीय शेरेबाजीची गरज नव्हती!
‘फुकाच्या फुशारक्या’ हे संपादकीय (१८ जुलै) वाचले. ब्रिक्स संघटना व या संघटनेची होणारी बँक इ. गोष्टी सर्वानाच सविस्तर माहिती नसतात. चीन हा ब्रिक्समधला आíथकदृष्टय़ा सर्वात मोठा भागीदार असल्यामुळे तो जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.  ईशान्य भारतातील प्रकल्पांना आíथक मदत या बँकेकडून मिळण्यास चीन अडथळा आणेल हेही आपणास धक्कादायक नाही. तरीसुद्धा सर्वच भागीदार देशांना फायदा होणारच. दुसरे म्हणजे संपादकीयामध्ये राजकीय शेरेबाजीची गरज नव्हती. एक तर भाजपने याचा डंका पिटलेला नाही. ‘ब्रिक्स’चा शोध त्यांनी लावलेला नाही याचे भान त्या पक्षाला नक्कीच आहे. ‘फुकाच्या फुशारक्या’ हे शीर्षक त्यामुळेच अयोग्य वाटते.
शशिकांत जोशी, नाशिक

यापुढे भारतात कोणालाही फाशी देणे अयोग्य?
‘पल्लवी पुरकायस्थच्या मारेकऱ्याला जन्मठेप’ ही बातमी (८ जुल) वाचली. पल्लवीच्या सदनिकेत घुसून तिच्या इमारतीच्या रखवालदाराने पुन:पुन्हा भोसकून निर्घृण खून केल्याचे कोर्टाने मान्य केले. पण या भयानक गुन्ह्य़ाबद्दल त्याला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या न्यायाधीशांच्या दृष्टीने एखादा गुन्हा दुर्मिळातला दुर्मीळ (रेअरेस्ट ऑफ रेअर) असला तरच त्याला फाशीची शिक्षा सुनावणे योग्य आहे. असा गुन्हा फक्त एकदाच होऊ शकतो. न्यायदानापेक्षा कायद्याचा कीस काढणाऱ्या आपल्या न्यायप्रणालीच्या दृष्टीने दुसऱ्यांदा असा गुन्हा झालाच तर तो ‘अतिदुर्मीळ’ (पुन:पुन्हा होत नाही असा) म्हणता येणार नाही. कारण तसा गुन्हा मागेच एकदा होऊन गेला आहे.
अजमल कसाबला अशा गुन्ह्य़ाबद्दल फाशी देण्यात आली. आता दुसऱ्या कोणी कसाबसारखाच गुन्हा केला, तर तो ‘दुर्मिळातला अतिदुर्मीळ’ गुन्हा होणार नाही. कारण तसा गुन्हा आधी (कसाबच्या हातून) घडला आहे. त्याबद्दल फार तर जन्मठेप देता येईल.
थोडक्यात, या निर्णयानुसार पुढे भारतात कोणालाही फाशी देणे अयोग्य ठरेल! यापेक्षा अधिक वाईट म्हणजे भारतातील दैनंदिन जीवनात असे गुन्हे हे ‘दुर्मिळातले अतिदुर्मीळ’ नाहीत. तो गुन्हेगार बरीच वष्रे म्हणजे अगदी मरेपर्यंत अत्यंत सुरक्षित अवस्थेत (तुरुंगात) जनतेच्या पशावर आरामात जीवन जगू शकतो, हे भारतीय सामाजिक जीवनाचे चित्र आपण जनतेपुढे ठेवणार आहोत काय?
सर्वोत्तम ठाकूर, जुहू, मुंबई</strong>