इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री मोशे दायान यांची आठवण व्हावी अशा पद्धतीने एका डोळ्याला काळा गॉगल, पांढराशुभ्र पायघोळ पायजमा, तेवढाच शुभ्र सदरा, संथ पण स्पष्ट आवाज हे ब. ना. ऊर्फ बाळासाहेब जोग यांचे बाह्य़ व्यक्तिमत्त्व त्यांच्या अंतरंग व्यक्तिमत्त्वावर खूपच अन्याय करणारे होते. प्रथमदर्शनी त्यांच्याबद्दल एक दरारा, भीती जाणवे. यांच्याशी कसे बोलावे, असा प्रश्न पडे; पण ही भीती त्यांच्याशी पहिले वाक्य बोलेपर्यंतच टिके. कारण बाळासाहेबांच्या वागण्यात अंशभरही कठोरपणा नव्हता.
गावंढळपणाकडे झुकणाऱ्या त्यांच्या साध्यासीध्या आणि काहीशा खडबडीत बाह्य़ावतारामुळे त्यांची विद्वत्ता, विचारांची झेप, प्रखर ज्ञानलालसा, एखाद्या क्षुल्लक संदर्भासाठीही अफाट परिश्रम करण्याची तयारी, लेखनासाठी भक्कम पुरावे गोळा करण्याची तळमळ आणि महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण संघशरणता याची सुतराम कल्पना येत नसे. बाळासाहेबांनी कोणतेही लिखाण कधीही भरभक्कम आधाराशिवाय केले नाही. मग ते ‘साप्ताहिक विवेक’मधील अग्रलेख अथवा अन्य लेख असोत, नंतरच्या काळातील सदरलेखन असो, की भारतातील मुस्लीम प्रश्न, चीनचा धोका, काश्मीर, हिंदूंचे संघटन आदी विषयांवरील त्यांची गाजलेली अनेक पुस्तके असोत. एखाद्या मुद्दय़ावर त्यांना माघार घ्यावी लागली, स्पष्टीकरण देता आले नाही, असे कधी झाले नाही. याला कारण लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संघमुशीचे नियोजनबद्धतेचे संस्कार हे होते. आपल्या प्रदीर्घ आयुष्याचा आर्थिक ताळेबंद त्यांनी चोख मांडला होता. तेच नियोजन त्यांच्या लेखनातही दिसून येते. ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य : सत्य आणि भ्रम’ हा जाडजूड ग्रंथ त्यांनी पदराला खार लावून प्रसिद्ध केला. मात्र तो त्याच्या गुणवत्तेवर विकला जावा, माझ्यासाठी तो कुणी विकत घेऊ नये, असे त्यांचे सडेतोड सांगणे असे. हिंदुत्वाविषयी आणि त्याअनुषंगाने रा. स्व. संघाविषयीचे चिंतन हे बाळासाहेबांचे मुळी जीवनकार्यच होते. त्यामुळेच अनेक मतभेद होऊनही संघाविषयीची त्यांची धारणा कधीच बदलली नाही. संघाने दिलेले प्रत्येक काम त्यांनी पराकोटीच्या प्रामाणिकपणे  केले.  त्यांची ठाम मते पचवणे अनेकांना झेपत नसे; पण म्हणून बाळासाहेबांचे शत्रू निर्माण झाले नाहीत. मागील शतकात संघविचारांना अनुल्लेख, हेटाळणी, विरोध अशा क्रमाने विरोध सहन करावा लागला. नेमक्या याच काळात बाळासाहेब संघविचार अत्यंत तर्कशुद्धपणे हिरिरीने मांडत राहिले. आज भाजपच्या रूपाने संघविचार समाजात प्रस्थापित झाल्याचे बघताना त्यांना समाधान नक्कीच होते. मात्र त्याचबरोबर त्यासाठी झालेल्या आणि होत असलेल्या ‘तडजोडी’ त्यांना अस्वस्थ करीत होत्या.